सोमवार, १३ जुलै, २०२६

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील


 सावळीविहीर 


नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली

संत निवृत्तीनाथ-ज्ञानोबारायांच्या भेटीचा अहिल्यानगर शहरात अनोखा संगमगुरु शिष्य बंधू पुन्हा भेटले ! पादुकांच्या माध्यमातून संतबंधूंचा मिलन सोहळा

संत निवृत्तीनाथ-ज्ञानोबारायांच्या भेटीचा अहिल्यानगर शहरात अनोखा संगम


गुरु शिष्य बंधू पुन्हा भेटले ! पादुकांच्या माध्यमातून संतबंधूंचा मिलन सोहळा


नगर/ नेवासे
  - अहिल्यानगरच्या भूमीवर रविवार १२ जुलै रोजी इतिहास नव्याने लिहिला गेला. संतपरंपरेतील दोन तेजस्वी अध्याय, दोन संतबंधू आणि दोन पालख्या आणि पादुका एका ठिकाणी एकत्र आल्या आणि अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
खरंतर प्रथम नाशिक येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे अहिल्यानगरमध्ये आगमन झाले. त्यापाठोपाठ ज्ञानेश्वरी रूपात श्रीक्षेत्र नेवासा येथून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीचे देखील नगरमध्ये आगमन झाले. 
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा अहिल्यानगर शहरात दाखल झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा दरम्यान प्रशासनाच्या वतीने आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण अहिल्यानगर शहरात तोफांची सलामी देत फटाके वाजवून पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान पालखी सोहळा त्रिंबकेश्वर यांच्या वतीने ज्ञानेश्वर मंदिर संस्थांचे ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, अहिल्यानगर शहराचे आ.संग्राम भैया जगताप यांचा श्रीफळ व निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या भेटी प्रसंगी ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास जाधव कृष्णा पिसोटे,आप्पासाहेब होन, चोपदार आरगडे महाराज, योगेश रासने अनिल शिंदे, जालिंदर गवळी, शंकर नाबदे, आशिष कावरे, अक्षय टेकाळे, सुजित पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्म पाटील शहर पोलीस उपअधीक्षक डॉ दिलीप टिपरसे,
नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
दोन्ही पालख्यांच्या आगमनानंतर पाहायला मिळाला दोन्ही भावांच्या भेटीचा अनोखा संगम. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी नेवासेत "ज्ञानेश्वरी" ग्रंथरचना केली. त्यांच्या कर्मभूमीवरून सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात भक्तांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला. आज त्याच नगरीत, त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीशी झाली ही विलक्षण भेट. जणू साक्षात दोन्ही संत एकत्र आले आहेत, अशी अनुभूती हजारो भाविकांनी घेतली.
पालखी मार्गावर उसळलेलं भक्तिरसाचं पवित्र वातावरण, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात गुंजणारे "ज्ञानोबा-तुकाराम" या सर्वांनी वातावरणाला अधिकच पावन केले. वारकऱ्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत, "माऊली-माऊली" च्या गजरात ही ऐतिहासिक भेट घडून आली.
या भेटीने भक्तांचे हृदय भरून आले. कारण ही होती फक्त दोन पालख्यांची नव्हे, तर दोन संतबंधूंच्या आत्म्यांची पवित्र भेट होती. इतिहासाच्या पानांवर कायमचा कोरला जाणारा हा सोहळा, संतांच्या विचारांनी समाजाला जोडणारा आणि भक्तीची अखंड परंपरा अधिक दृढ करणारा ठरला.

शनिवार, ११ जुलै, २०२६

इमामपूर घाट आता हजारो माऊलींच्या भक्तांचा उपस्थितीत ज्ञानेश्वरी घाट नामकरण

इमामपूर घाट आता हजारो माऊलींच्या भक्तांचा उपस्थितीत ज्ञानेश्वरी घाट नामकरण
 - 
बाळासाहेब नवगिरे 

नेवासा  
 अहिल्यानगर- संभाजीनगर राज्यमार्गावरील इमामपूर घाट आता झाला ज्ञानेश्वरी घाट उद्धव महाराज व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थित नामकरण
उद्धव महाराज मंडलीक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इमामपुर घाटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट असे करण्यात आले असून 
यावेळी हभप राम महाराज झिंजुर्के, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख यांच्यासह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इमामपुर घटाचे नामकरण ज्ञानेश्वरी घाट करण्यात आले. या प्रसंगी हजारो वारकरी उपस्थित होते. यावेळी घाटाच्या पायथ्याला ज्ञानेश्वर महाराजांचे शिल्प व पैस खांबाची प्रतिकृती साकारण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
ज्ञानेश्वरी रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा ज्ञानोबा,तुकारामाचा जय घोष करत मोठ्या भक्तिमय वातावरणात
  शनिवारी सकाळी शिंगवेतूकाई फाट्यावरून पालखी निघाल्यानंतर पांढरीपुल येथे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत पालखीचे स्वागत केले. याप्रसंगी बोलतांना देविदास महाराज म्हस्के म्हणाले कि,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकत्र येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीच्या धर्तीवर नेवासा संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या दिंडींला शासनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पांडुरंगाच्या आशीर्वादाने उत्तरोत्तर वाढत जाणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या जगाला तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी जेथे लिहिली त्या ठिकाणचा असणारा हा सोहळा आता संत ज्ञानेश्वर 
 घाटातुन मार्गस्थ होत असताना मन आनंदाने भरून आले. ज्या प्रमाणे माऊलींची पालखी दिवे घाटातून जाते.त्याच प्रमाणे ज्ञानेश्वरीचे रचना स्थान आलेले श्री क्षेत्र नेवासा येथे पालखी संत ज्ञानेश्वर 
 घाटातून जात आहे. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत,राम महाराज झिंजुरके,वारकरी व परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. 
 दिंडी सोहळा मार्गस्थ होत असताना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख व कार्यकर्ते हे दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते
इमामपूर घाट आता झाला ज्ञानेश्वरी घाट; उद्धव महाराज व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थित नामकरण करण्यात आले.

मंत्री विखेंच्या पुढाकाराने जिल्ह्यात वारी नियोजनाचा पॅटर्न. वारकरी व्यक्त करीत आहे समाधान

मंत्री विखेंच्या पुढाकाराने जिल्ह्यात वारी नियोजनाचा पॅटर्न

वारकरी व्यक्त करीत आहे समाधान

अहील्यानगर 

आषाढी वारीच्या अध्यात्मिक सोहळ्याच्या निमिताने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने तयार केलेला नियोजनाचा पॅटर्न वारकरी सांप्रदायाला दिलासा देणारा  ठरला आहे.अहील्यानगरसह अन्य  जिल्ह्यातील पालख्याही रवाना होत असल्याने पालखी मार्ग विठ्ठलमय झाला आहे.

अध्यात्माचा वारसा असलेल्या अहील्यानगर जिल्ह्यातून मानाच्या पालख्यांसह असंख्य गावातील वारकरी पंढरपूरला जात असतात.यापुर्वी वारकरी सांप्रदायाचा एवढा गांभीर्यपुर्वक विचार झाला नव्हता. त्यामुळे पालखी मार्गावर वारकार्यांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागत होता.मंत्री विखे पाटील सोलापूर आणि अहील्यानगरचे पालकमंत्री झाल्यानंतर आषाढी वारी करीता येणार्या वारकर्यांसाठी सुविधा निर्माण करून देण्याच्या हेतूने प्रथमच दोन्ही जिल्ह्यात योग्य तो समन्वय घडवून त्यांनी वारकर्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना कृतीत उतरवली त्यानूसार सलग तिसर्या वर्षी मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिंडी जात असलेल्या मार्गावर वाॅटरफ्रूप मंडप,पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छता गृह,महीला व पूरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीची व्यवस्था आणि विशेष म्हणजे आरोग्य आणि सुरक्षा पथक देखील चांगल्या पद्धतीने नियुक्त केले आहेत.विशेष म्हणजे रस्ते दुरूस्त झाल्याचे मोठे समाधान वारकरी व्यक्त करीत आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  अहील्यानगर प्रशासनाने आषाढी वारीसाठी निर्माणए केलेला पॅटर्न जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची नवी ओळख ठरली आहे.जिल्ह्यातून चार मानाच्या पालख्यासह नासिक जळगाव धुळे या जिल्ह्यातील  अनेक देवस्थांच्या पालख्या मार्गस्थ होत असतात.यंदा ही संख्या तिनशेहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जात असून विठ्ठल नामाच्या जयघोषाने जिल्हा दुमदुमून गेला आहे.जिल्हा प्रशासन मार्गावर सतर्कतेने वारकर्यांच्या स्वागतासाठी सज्ज असून प्रत्येक तालुक्यात एक समन्वय अधिकारी नेमून देण्यात आल्याने दिंडी प्रमुखांना संपर्क साधण्यात कोणतीही अडचण येत नाही.सध्या पाऊस थांबला असला तरी मुक्कामासाठी भव्य मंडप उभारल्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील तीन वर्षापासून सुरू झालेला पॅटर्न जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची नवी ओळख ठरलाच पण यापेक्षाही महत्वाचे म्हणजे मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिले आहे.राज्य सरकारने यंदाच्या वर्षी तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

वारकर्यांसाठी रुग्ण सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजना असलेल्या रूग्णालयांना मोफत सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यंदा प्रथम मुख्यमंत्री सहाय्यता कक्षानेही वारीच्या सेवेत योगदान देण्याचा निर्णय केला असून जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या मदतीने वारकरी चरणसेवेचा उपक्रम नव्याने सुरू झाला आहे.पावसाळी अधिवेशन सुरू असतनाही मंत्री विखे पाटील यांनी वारीसाठी केलेल्या नियोजनाचा सातत्याने आढावा अधिकार्याकडून घेत होते.यंदाच्या वर्षी झालेल्या नियोजनाबद्द्ल वारकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

कै श्री वाल्मीक धापटकर यांचे निधन


राहता तालुक्यातील साकुरी येथील  वाल्मीक भाऊसाहेब धापटकर यांचे दुःखद निधन झाले असून  त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी बहिण आहे तसेच 

वाल्मीकच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

शुक्रवार, १० जुलै, २०२६

प्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार एक कोटी लिटर पाणी - डॉ. सुजय विखे पाटील

प्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार एक कोटी लिटर पाणी - डॉ. सुजय विखे पाटील 


आश्‍वी 

“निळवंडे लाभक्षेत्रातील अनेक भागाला अद्याप पाण्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पाणी वाटपासाठी लवकरच स्वतंत्र ‘पाणी वाटप संस्था' स्थापन केली जाणार आहे. या संस्थेच्या चेअरमनपदी त्या क्षेत्रातील सर्वात मोठे क्षेत्र असणारा शेतकरी असेल. तसेच आठ-आठ हेक्टरचे तीन गट करून एका आवर्तनात प्रत्येक गटाला ३० लाख लिटर पाणी दिले जाईल. अशा प्रकारे २४ हेक्टरला एका आवर्तनात पाईपद्वारे तब्बल एक कोटी लिटर पाणी पुरवण्यात येईल.” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. १०) शिर्डी विधानसभा मतदारसंघ स्तरीय आढावा व समन्वय बैठक तसेच मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) बैठक पार पडली. यामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. विखे पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, कैलास तांबे, मच्छिंद्र थेटे, आर. डी. कदम, विजय म्हसे, भगवान इलग, कांचनताई मांढरे, रोहिनीताई निघुते, तबाजी मुन्तोडे, अजय ब्राम्हणे, गोकुळ दिघे, दिलिप मुन्तोडे, सतिश जोशी, शिवाजी इलग, भारत गिते, अशोक जऱ्हाड यांच्यासह २८ गावातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बीएलओ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, निळवंडे धरणाचे पाणी प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनचे जाळे विणावे लागेल. ऑटोमेशनची योजना रद्द करून त्यातून वाचणारे ६० कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या थेट उपयोगासाठी वळवले असून यातून शेततळ्यांचे आच्छादनासाठी लागणाऱ्या प्लास्टिक कागदासाठी शेतकऱ्यांना ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे आवर्तन संपल्यानंतरही शेततळ्याच्या माध्यमातून दोन महिने शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. तसेच, मॅन्युअल व्हॉल्व्हच्या तीन पाईपामध्ये आणखीन एक पाईप जोडून ओव्हरफ्लोचे पाणी प्रत्येक गावातील शेततळ्यात सोडण्याचे नियोजन मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

निमगावजाळी येथे उभारण्यात येणाऱ्या 'बिबट सफारी' प्रकल्पासाठी सुरवातीला १५ कोटी मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच, निझर्णेश्‍वर मंदिर परिसरात प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रस्तावही सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले. यामुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि यातून अर्थकारणाला मोठी चालणा मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी​ प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी दीडशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच कालवा आणि पोटचाऱ्याच्या कामांना गती मिळणार असल्याचे देखील सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “विखे पाटील परिवाराचे अस्तित्व भाजपमुळे आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व कार्यक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नियमितपणे पार पाडावेत अशा सूचना दिल्या. तसेच भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. असे आवाहन केले.

दरम्यान, डॉ. विखे पाटील यांनी ​यावेळी मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाबाबतही मार्गदर्शन केले. ते म्हणाले “२००२ आणि २०२४ च्या यादीतील नावे आणि मतदारांची समांतर पडताळणी पूर्ण झाली असून, सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मध्ये सर्वांनी नोंदणी करावी. यामधून कोणीताही पात्र व्यक्ती सुटणार नाही अपात्र व्यक्ती फॉर्म भरणार नाही. याची खबरदारी बीएलओ आणि कार्यकर्त्यानी अचूक पार पडावी, यासाठी योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.@⁨all⁩

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक पाटील,मोरे, गोसावी,सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक पाटील,मोरे, गोसावी,सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

नेवासा (तालुका प्रतिनिधी):-
      श्रीरामपूर                   उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी धर्मराज पाटील यांची मुंबई पश्चिम,  योगेश मोरे यांची बोरिवली, सुनिल गोसावी यांची मीरा भाईदर तर विकास सूर्यवंशी यांची उदगीर येथे नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भावुक आणि सत्कारमय निरोप समारंभात उपस्थित सहकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते  शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
           यावेळी बोलताना अनंता जोशी यांनी सांगितले की, बदली झालेल्या या अधिकाऱ्यांनी "त्यांच्या कार्यकाळात  घेतलेले कठोर निर्णय आणि पारदर्शक कारभारामुळे विभागाच्या कामात मोठी प्रगती झाली. "सत्कार स्वीकारताना हे चार हि अधिकारी भावुक झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभवांना उजाळा दिला. तसेच, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
    याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक विशाल मोरे, गणेश पाटील, विशाल बटूळे, अमर शेवाळे तसेच मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक अशोक वारे, राणी सोनवणे, सागर पुंड, निरंजन परदेशी, सागर ननवरे, निकिता खंडिझोड, गोरक्ष कोरडे यांच्यासह कर्मचारी अमोल मुंडे, दिनेश सोनवणे, विलास नागरे, दर्शन सोनवणे, शैलेंद्र दोंदे, सुनिल शेवरे, संतोष औटे, महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर सह विभागातील कर्मचारी नागरिक व चालक मालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक राणी सोनवणे यांनी केले तर आभार मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक सागर पुंड यांनी मानले.

आमची लढाई प्रवरेच्या सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी : डॉ. सुजय विखे पाटील गणेश कारखान्या बाबत डॉ. सुजय विखे पाटील यांची मोठी घोषणा; निवडणूक न लढवण्याचा निर्णय

आमची लढाई प्रवरेच्या सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी : डॉ. सुजय विखे पाटील

गणेश कारखान्या बाबत डॉ. सुजय विखे पाटील यांची मोठी घोषणा; निवडणूक न लढवण्याचा निर्णय, 
न्यायालयीन लढा सभासदांच्या हितासाठीच
राहाता : 
गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट घोषणा केली की,

 आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत. कारखाना तुमचाच आहे.मात्र, गणेश कारखान्याशी संबंधित न्यायालयीन वादाबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नाही. कर आमची लढाई प्रवरा कारखाना सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे ना. राधाकृष्ण विखे पाटील किवा डॉ सुजय विखे पाटील यांचे नाहीत, तर प्रवरा कारखान्याचे सभासदांचे आहेत. सभासदांनी उभे केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत.

राहाता येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राहाता व गणेश परिसरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाचे मुद्द्यांवर चर्चा करावी,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राहाता शहराच्या विकासाबाबत विश्वास व्यक्त करताना डॉ. विखे म्हणाले, आजचे राहाता आणि दोन वर्षांनंतरचे राहाता शहर यात मोठा फरक दिसेल.शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलून जाईल. विकासकामांवरच आमचा भर राहणार आहे.

भाजपच्या संघटन शक्तीवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकत नाही.”

शेवटी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत  विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. आपले राजकारण विकास, प्रगती आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. शांत राहा आणि विकासाची कामे करत राहा.असे आवाहन यावेळी त्यांनी केले

बुधवार, ८ जुलै, २०२६

नेवासे संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीचे मोठ्या उत्साहात पंढरपूर कडे प्रस्थान.

नेवासे संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीचे मोठ्या उत्साहात पंढरपूर कडे प्रस्थान.

नेवासा 
एसटी आगारात पार पडले पहिले रिंगण 
नेवासा (तालुका प्रतिनिधी):- नेवासे येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी दिंडी बुधवार (८ जुलै)  मोठ्या उत्साहात विठुरायाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केले. नेवासे शहरात माऊलींच्या राजाचं आगमन होताच सडा रांगोळी तोफांची सलामी, फटाक्यांची आतषबाजी जेसीबी मधून पुष्प वृष्टी करण्यात आली. पहिले रिंगण नेवासा एस.टी डेपोच्या आगारात पार पडले.यंदा प्रथमच या दिंडी सोहळ्यासाठी राज्य शासनाकडून वारकऱ्यांच्या सुरक्षितता आणि सोयी-सुविधांसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. देहू-आळंदी पालखी सोहळ्याप्रमाणेच विविध शासकीय सुविधा या दिंडीला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने वारकरी संप्रदायात समाधानाचे वातावरण आहे. संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य महंत देवीदास महाराज म्हस्के,राऊत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, युवा नेते उदयन गडाख पाटील,शिवसेना नेते प्रभाकर शिंदे, सौ.रत्नमाला लंघे ,नेवासा नगरपंचायत अध्यक्ष डॉ. करण घुले, उपाध्यक्ष शालिनी सुखधान, माऊली पेचे, बाळासाहेब शिंदे,दिलीपराव पवार , बाळासाहेब पवार प्रतापराव चिंधे, 
​ संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग , विश्वस्त कैलास जाधव, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान जनसंपर्क अधिकारी आशिश चावरे, सुनिल मोरे,खासदार भाऊसाहेब वाकचौरे नेवासा जनसंपर्क प्रमुख धनंजय पाटील,  नेवासा तहसीलदार डॉ संजय बिरादार, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सपोनि अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल आदीं सह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.हा दिंडी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सर्व सोयी-सुविध उपलब्ध असून तंतोतंत पालन होणार आहे.
------ माऊलींच्या पादुका घेवून जाणारी रथाची बैलजोडी संत ज्ञानेश्वर देवस्थान विश्वस्त कैलास आप्पासाहेब जाधव यांची बैलजोडी आकर्षक ठरत आहे. सजावट बघून डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
 ------ प्रशासनाच्यावतीने सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नेत्रदीपक सोहळा पार पडणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांचा मागदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक एम सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मै पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी  नियोजन केले आहे.

जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचे तातडीने सर्व्हेक्षण करा-ना.विखे पाटील

जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचे तातडीने  सर्व्हेक्षण करा-ना.विखे पाटील

अहील्यानगर 

जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने एकत्रित सर्व्हेक्षण करून  एक महीन्यात प्रस्ताव सादर करण्याचा सूचना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जायकवाडी प्रकल्पात पुर्नवसित झालेल्या शेवगाव नेवासा आणि गंगापूर तालुक्यातील गावांच्या समस्याबद्दल मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,आ.मोनिका राजळे आ.रमेश बोरनारे आ.विठ्ठलराव लंघे आ.अक्षय कर्डीले जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्यासह जलसंपदा आणि मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुर्नवसित गावात बुडीत क्षेत्र किती आहे.असलेल्या किती जमीनीमध्ये पाणी जाते याबाबतचा ड्रोण  सर्व्हे करून घेण्याचे सूचित करून,जलसंपदा व महसूल विभागाने गावांमध्ये जनसुनावणी घेवून ज्यांच्या जमीनी आहेत त्या शेतकऱ्यांची माहीती  महीना भरात  संकलित करून त्याचा प्रस्ताव शासनाने पाठवावा. 

जमीन अदलाबदल, भोगावटा वर्ग एक  करणे,तसेच पुर्नवसित गावात नसलेल्या सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घ्यावा यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जमीनीचा सर्व्हे आल्यानंतर त्या गावातील प्रश्नाच्या संदर्भात निर्णय करण्याची ग्वाही दिली.
शेतकऱ्यांच्या समस्या मांडतांना आ.मोनिका राजळे यांनी जायकवाडी प्रकल्प आधी झाला.त्यानंतर झालेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची मोठी समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.आ.विठ्ठलराव लंघे यांनी पुर्नवसित गावांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.या गावांना न्याय मिळेल असे निर्णय व्हावेत आशी अपेक्षा व्यक्त केली.@all

सोमवार, ६ जुलै, २०२६

भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील ग्राऊंडवर; विकासकामांचा घेतला आढावा लोणी व कोल्हार येथे विकासकामांची पाहणी करत जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी

भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील ग्राऊंडवर; विकासकामांचा घेतला आढावा

लोणी व कोल्हार येथे विकासकामांची पाहणी करत जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी

लोणी/कोल्हार |
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोल्हार–नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून कामाचा दर्जा, वाहतुकीची सुविधा आणि पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.

लोणी खुर्दयेथे सुरू असलेल्या महामार्गाचे व गटर बांधकामाचीही त्यांनी ग्रामस्थांसोबत पाहणी केली. नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी येथील एका पंक्चर दुकानातच जनता दरबार भरविला. मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या. प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित विभागांशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी तात्काळ सूचना दिल्या.

त्यानंतर कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचीही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. तसेच कामातील त्रुटी निदर्शनास आणून देत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्या.

भर पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विकासकामांचा आढावा घेणे, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणे आणि कामांच्या गुणवत्तेबाबत ठाम भूमिका घेणे, यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केले

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

पुणे नासिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, तज्ञ समितीचा अहवाल मागवणार**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाला ग्वाही**राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाचे निवेदन सादर*

पुणे नासिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, तज्ञ समितीचा अहवाल मागवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाला ग्वाही

राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाचे निवेदन सादर
अहिल्‍यानगर, 

पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्‍यासाठी राज्‍यसरकार सकारात्‍मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्‍तावित रेल्‍वे  मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली.

पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्‍हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या मार्गाबाबत सविस्‍तर चर्चा केली. माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील, आ.डॉ.किरण लहामटे, आ.सरोज अहिरे, आ.अमोल खताळ, आ.शरद सोनवणे, आ.बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते.

शिष्‍टमंडळाने पुणे-नाशिक रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्‍यानगर या जिल्‍ह्यांच्‍या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्‍यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या  आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता करण्‍यात आल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली.

या रेल्‍वे मार्गाबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असून, यासाठी निधीचीही तरतुद केलेली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्‍याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्‍पाची तांत्रिक अचुकता व कालबध्‍द अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍यासाठी तज्‍ज्ञांची उच्‍च्‍स्‍तरीय समिती स्‍थापन करुन, याबाबतचा अहवाल मागविण्‍यात येईल. समितीकडून येणा-या अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत आपण स्‍वत: पाठपुरावा करु अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्‍टमंडळाला दिली.

राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपुर्ण बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्‍दारे करण्यात आली. यावेळी आ.प्राजक्त तनपुरे, आ.विठ्ठलराव लंघे पाटील व आ. अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.

गुरुवार, २ जुलै, २०२६

शिक्षणप्रेमी प्रा श्री संतोष कोल्हे साहेब यांनी एकरुखे येथील जिल्हा परिषद शाळेत भेट दिली



आमचे मित्र शिक्षणप्रेमीं प्रा श्री संतोष कोल्हे साहेब छ संभाजी नगर यांचं प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले त्या एकरखे शाळेस त्यांनी भेट दिली व येणाऱ्या काळात भव्य माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचं ठरवलं व तशी सकारात्मक चर्चा आम्ही सर्व मित्र मंडळी यांनी मुख्याध्यापक श्री दळवी सर यांच्याशी यावर चर्चा केली 
सोबत श्री संतोष कोल्हे साहेब  बाबासाहेब पाटील सातव  खंडेराव गाढवे पा अप्पासाहेब शेटे पा वाल्मीकराव सातव पा

तरुणांनी व्यसनाच्या विळख्यापासून दूर रहावे – पो.नि. संभाजी गायकवाड

तरुणांनी व्यसनाच्या विळख्यापासून दूर रहावे – पो.नि. संभाजी गायकवाड

पोहेगाव :
- रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान साजरे करण्यात आले.
 जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती आवश्यकता याविषयक सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच सायबर गुन्हेगारी , सोशल मिडीयाचा अति वापर केल्यामुळे होणारे संभाव्य धोके , भारतीय दंड संहिता मधील विविध कायदे, विद्यार्थी दशेत व्यायाम, शिस्त यांचे महत्त्व  सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच संकटसमयी ११२ क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोहेगाव गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. 
याप्रसंगी प्रारंभी स्थानिक स्कूल  कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री नंदकुमार औताडे पाटील यांनी पो.नि. संभाजी गायकवाड यांचे तर मा. श्री मधुकरराव औताडे पाटील यांनी  पोहेगावचे पोलीस पाटील जयंत रोहमारे यांचे व उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री महेंद्र काळंगे यांनी केले विद्यालयाचे प्राचार्य श्री विजयजी भोसले यांनी मान्यवरांचे आभार मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुनील वाघमारे श्री. राठोड, श्री सांगळे ,श्री पवार, श्री. लहिरे , श्री.सूर्यवंशी , श्री.पाटील, श्री पडवळे, श्री भारमल , श्री वराडे श्रीमती बागुल, श्रीमती वायाळ,यांचे सह सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.

बुधवार, १ जुलै, २०२६

साईयोग फाउंडेशनच्या वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात....

साईयोग फाउंडेशनच्या वृक्षारोपण सप्ताहाची 
सुरुवात....

वृक्षारोपण करत केला डॉक्टर्स डे साजरा...
सालाबादप्रमाणे राहाता येथील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या साईयोग फाउंडेशन द्वारे वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात आज बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. खटकळी परिसर दहेगाव येथे राहाता परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य डॉ पी जी गुंजाळ यांच्या हस्ते १०-१२ फुटी झाडांचे रोपण करण्यात आले. डॉक्टर्स डे च्या निमित्त डॉ पी जी गुंजाळ व साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांना शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ मार्गदर्शक विलासराव वाळेकर यांचाही वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.राहाता परिसरात ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉ पी जी गुंजाळ यांच्या रुग्णसेवेतील अतुलनीय कार्याचा गौरव करत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर डॉक्टरांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.योगशिक्षक सुरेश भिंगारदिवे म्हणाले डॉक्टर आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत तर झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत.निवृत्त कृषी अधिकारी अनिल सातव यांनी वृक्षारोपण हे सप्ताह पुरते न ठेवता साईयोग फाउंडेशन चा आदर्श घेत वर्षभर सुरू ठेवावा.तसेच आपल्या घरासमोर न लावणाऱ्या झाडांबद्दलचा गैरसमज दूर केला.शेवटी ॲड दत्तात्रय धनवटे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी दहेगाव च्या लोकनियुक्त सरपंच सौ पूनमताई संदिप डांगे, निलम चेणुके, उज्वला गाडेकर, डॉ पी जी गुंजाळ,योगगुरू सुरेश भिंगारदिवे,डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,ॲड गोरखनाथ दंडवते, ॲड दत्तात्रय धनवटे,भाऊसाहेब बनकर,विलास वाळेकर,मनोज पिपाडा,मोहन तांबे,बाळासाहेब गाडेकर,संजय बाबर,संदीप डांगे,अनिल सातव,न्यानेश्वर आरणे, रंगनाथ सदाफळ, सिताराम बावके, सुभाष दंडवते,पांडुरंग गायकवाड,कैलास चेणुके,बाळासाहेब तारगे,अशोक वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय राहाता येथील डॉक्टर यांचा आज जागतिक डॉक्टर डे निमित्त सत्कार करण्यात

ग्रामीण रुग्णालय राहाता येथील डॉक्टर यांचा आज जागतिक डॉक्टर डे निमित्त सत्कार करण्यात 
 रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गोकुळ घोगरे,, डॉ . संजय गायकवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी कान्हे, डॉ. संदीप बनसोडे, डॉ.विजय म्हस्के, डॉ.शर्वरी कुलकर्णी,डॉ. वाल्मीक नेहे , डॉ. स्नेहा मोकळ, डॉ. ज्योती पाचरे , डॉ संजय उबाळे यांचा सन्मान लायन्स क्लब ऑफ राहता प्रेसिडेंट लायन उमेश शेटे, सेक्रेटरी, लायन ॲड. दिनेश कारले, ट्रेजरर लायन खिजर शहा, पीआरओ ॲड.गोरखभाऊ दंडवते, डायरेक्टर डॉ. शर्वरी कुलकर्णी.
सह सेक्रेटरी लायन सरला तायडे, सह ट्रेजरर लायन सोहन उबाळे, डायरेक्टर लायन स्मिता मुरादे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील श्री. सत्यवान कोल्हे, श्री. घनश्याम शिंदे, श्री.बाबासाहेब गाडेकर, श्री.योगेश धावणे सर्व स्टाफ उपस्थित होते.त्याच प्रमाणे कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप यांचा सत्कार क्लब चे अध्यक्ष ला.उमेश शेटे डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ संजय उबाळे व सर्व टीम च्या  वतीने करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ संजय उबाळे यांनी केले 
आभार डॉ. शुभांगी कान्हे यांनी मानले

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...