रविवार, ३१ मे, २०२६

आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील

आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील 

एकीकडे कर्डीले विजयी, दुसरीकडे तनपुरे भाजपमध्ये; विखेंचा डबल स्ट्राइक

मुंबई (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते, माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील पक्षकार्यालयात पार पडला.

भाजपमध्ये प्रवेशासोबतच प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषद उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेले तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 

पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल ११ पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधी तब्बल सहामहिन्यांपासून डॉ सुजय विखे पाटील प्राजक्त तनपुरे  यांच्या संपर्कात होते

याच राजकीय रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली आणि त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. 

एकीकडे अक्षय कर्डीले यांना आमदार करण्यात यश मिळवताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती त्यांनी यशस्वीपणे राबवली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यामागे आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आज रंगली आहे.

श्री साईचरणी १५ लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण

श्री साईचरणी १५ लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण

श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करत असतात. अशाच प्रकारे आज एका साईभक्ताने अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा, ७६ ग्रॅम २७० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हिरेजडित मोरपिसाच्या आकाराचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला.
ही मौल्यवान देणगी श्री साईबाबांप्रती असलेल्या श्रद्धा व भक्तीभावाचे प्रतीक आहे. देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

शनिवार, ३० मे, २०२६

डॉ संजय उबाळे झोन चेअरमन यांना इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले

डॉ संजय उबाळे झोन चेअरमन यांना इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले
राहता 
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बहुप्रतिक्षित झोन सोशल 
16 हा भव्य आणि दिमाखदार कार्यक्रम दिनांक 22 मे रोजी राहता येथील साई विठ्ठला लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन  अहिल्यानगर झोनचे चेअरमन डॉ. संजय उबाळे* यांनी केले होते.

या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2026 ते 27 लायन श्रेयस दीक्षित, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र गोयल, सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुनीता मालपाणी, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीशभाऊ मालपाणी, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश कोठावडे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा तसेच को कन्व्हेनर लायन प्रकाश सदाफळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सात लायन्स क्लब आणि दोन लिओ क्लबमधील प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, कॅबिनेट ऑफिसर्स, वरिष्ठ पदाधिकारी आणि जवळपास 150 हून अधिक लायन सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह, एकात्मता आणि सेवाभावाचे वातावरण निर्माण झाले होते
राहता शहरासाठी अभिमानाचा क्षण

राहता शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि भव्य स्वरूपात झोन सोशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. संजय उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाला सर्व स्तरांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने लाभलेली उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. त्यामुळे राहता शहराच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षमतेचे दर्शन घडले असून हा क्षण संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा ठरला आहे.

*मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी झाला गौरव*

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे* यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांनी इंटरनॅशनल प्रेसिडेंट पिन आणि इंटरनॅशनल प्रेसिडेंट सर्टिफिकेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संपूर्ण झोनसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. डॉ संजय उबाळे यांनी 2018 मध्ये लायन्स क्लब राहता मध्ये काम सुरू केले.त्यानंतर 3 वर्षातच आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवून दिली क्लब प्रेसिडेंट असताना अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली.लायन्स क्लब चे नाव केले.त्यानंतर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश कोठावडे,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी यांनी डिस्ट्रिक्ट चेअरमन कॅन्सर म्हणून संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोने केले पुणे, नगर.नाशिक. मालेगाव , मनमाड येथे जाऊन कॅन्सर बाबत जनजागृती व तपासणी शिबिरे घेतली .खूप मोठ्या प्रमाणात केलेल्या कामाची दखल घेऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल व गिरीश मालपाणी यांनी झोन चेअरमन अहिल्यानगर पूर्ण जिल्ह्यात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली संपूर्ण अहिल्यानगर जिल्यातील प्रत्येक क्लब ला भेटू देऊन सर्वांशी चांगले संबंध निर्माण केले अनेक वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम काम केले त्याची दखल इंटरनॅशनल प्रेसिडेंट पिन व इंटरनॅशनल प्रेसिडेंट सर्टिफिकेट देऊन गौरवन्यात आले 
अतिशय मनाचे अवॉर्ड त्यांना देण्यात आले व बेस्ट झोनल चेअरमन म्हणून गौरविण्यात आले.
लायन राजभाई मुछाल इंटरनॅशनल डायरेक्टर,राजेश अग्रवाल,लायन श्रेयस दीक्षित,सुनीता मालपाणी,लायन राजेंद्र गोयल,गिरीश मालपाणी, राजेंद्र कोठावडे, डॉ एकनाथ गोंदकर, महेश वैद्य, कल्याण कासट, अक्षय गिरमे,राहुल आरबटी,लायन सुधीर डागा,लायन प्रवीण गुलाटी लायन धनंजय धुमाळ,लायन संदीप गोंदकर व अनेक सिनियर मेंबर्स यांचे मार्गदर्शन लाभले.

मारलेली मिठी आणि आजोबा नातवांच्या इतिहासाला उजाळा तनपुरेंच्या पक्षप्रवेशात रंगला दोन दादांचा आलिंगन सोहळा




भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज शरद पवार पक्षाचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांचा मुत्सद्दीपणामुळेच तनपुरेंचा भाजप प्रवेश झालाय, यावर या कार्यक्रमात शिक्कामोर्तब झाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंसारखा प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता पक्षात आल्यामुळे पक्षाला फायदाच होईल, हे आवर्जून सांगितलं. पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी अगोदर चव्हाण यांचा व त्यानंतर डाँ. सुजय विखेंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याच सत्कारानंतर दोन दादा एकत्र आले, आजोबानंतर आता नातूही एक झाले याची आठवण आवर्जून काढली. त्यावेळी एकच हाशा पिकला. सुजय विखे व प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभेला एकमेकांच्या विरोधात काम केलं होतं. परंतु आता तनपुरे-विखे ही नवी युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशा विश्वास तनपुरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तनपुरे यांना मिठी मारण्याची कार्यकर्त्यांची इच्छाही सुजय विखेंनी पूर्ण केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. हे सगळा पक्षप्रवेश पाहिल्यावर तनपुरेंना विखेंनीच भाजपमध्ये आणलंय, यावर शिक्कामोर्तब झालं. या पक्षप्रवेशानंतर राहुरीची गणिते नक्कीच बदलतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

गुरुवार, २८ मे, २०२६

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून सलग सातव्‍या वर्षी सेंद्रिय केशर आंब्याची देणगी

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून सलग सातव्‍या वर्षी सेंद्रिय केशर आंब्याची देणगी

शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. रवी नारायण करगळ यांनी श्री साईबाबा संस्थानसाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला ३५०७ किलो केशर आंबा साई चरणी अर्पण केला आहे. 
श्री. करगळ हे गेल्या १५ वर्षांपासून केशर आंब्याची शेती करत असून त्यांच्या बागेत सुमारे १२५० आंब्याची झाडे आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी संपूर्ण बागेत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. गावरान गायीच्या शेणापासून तयार होणारे सेंद्रिय खत व जीवामृताचा वापर करूनआंबा उत्पादन करत असल्‍याची माहीती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे, श्री. करगळ हे मागील सहा वर्षांपासून नियमितपणे श्री साईबाबा संस्थानला आंब्याची देणगी देत आहेत. 
देणगी मिळालेल्‍या आंब्‍यांच्‍या रसाचा श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईप्रसादालयात प्रसादभेजनामध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.

शनिवार, २३ मे, २०२६

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 
शिर्डी, 

संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कंपन्यांकडून होणारे संशोधन हे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांना अधिक मजबूत करीत असल्याने केंद्र सरकारनेही खासगी उद्योगांना पाठबळ देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. खासगी उद्योगाचे सामर्थ्य जेवढे वाढेल तेवढी सुरक्षा अधिक मजबूत होईल. यातून भारत देश संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 'निबे उद्योग समूहा'च्या वतीने विकसित करण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन आणि सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनुप सिंघल, डीआरडीओचे सेक्रेंटरी डॉ.समीर कामत, केंद्रीय सचिव संजीव कुमार, ब्रह्मविहारीजी महाराज, आ.राणाजगजितसिंह, आ.मोनिका राजळे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ.आशुतोष काळे, आ.अक्षय कर्डिले यांच्यासह संरक्षण आणि उद्योग विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे प्रवर्तक गणेश निबे उपस्थित होते.

आपल्या भाषणात गणेश निबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करून मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "येथे आल्यानंतर या प्रकल्पाचे महत्त्व आपल्याला समजले. भारतामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाही. असलेल्या साधनांचा उपयोग करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशाला निर्यातदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही." हे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. सुशासन आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचे मॉडेल शिवाजी महाराजांनी निर्माण करून दाखविले. लढाईसाठी लागणारे साहित्यही त्यांनी स्‍थानिकांकडून बनवून नवे साम्राज्य उभे करून दाखविले. हीच भूमिका लोकमान्य टिळकांची होती. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा संदेश देणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीने आता संरक्षण व्यवस्थेतही खासगी उद्योगांच्या माध्यमातून एक नवा विश्वास निर्माण केला आहे.

संरक्षण उद्योग मजबूत होण्यासाठी खासगी उद्योगाला केंद्र सरकारने पाठबळ देण्याचे धोरण घेतले आहे. यामुळे धोरणात्मक सुधारणा होत असून थेट परकीय गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळत आहे. परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशी नीतीला चालना मिळत असल्यामुळेच खासगी उद्योग समूहांचा सहभाग संरक्षण उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढला आहे. हा वाटा आता २५ ते ३० टक्क्यांवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.  आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेचा वापर करून, खासगी उद्योग समूह करीत असलेली वाटचाल ही ऊर्जा निर्माण करणारी असून, यातूनच विकासाचा रोडमॅप तयार होत आहे. निबे उद्योग समूह यासाठीचे मोठे उदाहरण असून, या उद्योग समूहातून निर्माण होणारे संरक्षण साहित्याचे उत्पादन पाहता हा उद्योग समूह देशासाठी अनेक वर्षांचा माईलस्टोन ठरेल.

भारताचे सामर्थ्य हे आता शिर्डीच्या भूमीतूनही सिद्ध होणार आहे. हा उद्योग केवळ उत्पादनासाठी मर्यादित नाही, तर यातून अर्थव्यवस्था मजबूत होईलच, पण औद्योगिक स्थिरताही मिळेल. अनेक खासगी कंपन्या आता संरक्षण उत्पादनामध्ये भागीदारी करण्यासाठी पुढे येत असल्यामुळे एक 'इको सिस्टिम' निर्माण होत असून, संरक्षण उद्योगही मजबुतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 'ऑपरेशन सिंदुर मध्ये भारताने आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखविले आहे. भविष्यातही खासगी क्षेत्राच्या माध्यमातून संरक्षण उत्पादनाची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "आजचा दिवस देशाकरिता ऐतिहासिक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' हे जे संदेश दिले होते, ते संरक्षण क्षेत्राने प्रत्यक्षात अमलात आणले आहेत. त्यामुळे देश आता स्वदेशी पद्धतीने बनविलेल्या उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे." राज्यात चार डिफेन्स कॉरिडॉर तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य संरक्षण उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे संरक्षण उद्योग समूह विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. "गणेश निबे यांच्यासारखे युवक या क्षेत्रात करीत असलेले काम भूषणावह आहे. नवीन तंत्रज्ञान आणून देशासाठी काहीतरी निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आत्मनिर्भर भारताकरिता नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम 'निबे उद्योग समूह' करीत आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी गणेश निबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शनाला संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. निबे उद्योग समुह आणि विविध अंतराष्‍ट्रीय कंपन्‍यांमध्‍ये महत्‍वपूर्ण करार करण्‍यात आले. ऑप्‍टीकल सॅटेलाईट आणि ब्‍लॅक स्‍काय कंपनी तसेच सीप्‍लेन निर्मितीसाठी कॅनेडीयन कंपनी हॅवीलॅन्‍ड सोबत स्‍वाक्षरी करण्‍यात आली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्घाटन सोहळ्यापूर्वी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांच्या लेफ्टनंट जनरलनी विद्यार्थी, नागरिक आणि विज्ञानप्रेमींशी संवाद साधला.

शुक्रवार, २२ मे, २०२६

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

अहील्यानगर 

खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण  केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला चिंचोडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार याचा जामिन अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांनी फेटाळला आहे.

   सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोस्ट केल्‍याचे कारणाने किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करुन, त्‍यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहान केल्‍याची घटना घडली होती. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्‍यावर ४ मे २०२६ रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्‍याबाबत सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोष्‍ट केल्‍याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती.

      या घटने संदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक करुन, अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांच्या  न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पवार हा कोठडीत असताना तपासी अधिका-यांना या संदर्भात उडवा उडवीचे उत्‍तर देत समाधानकारक माहीती न दिल्‍याने पोलिसांनी त्‍यास पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. 

जामीन मिळावा म्‍हणून, शरद खंडू पवार याने न्‍यायालयात प्रयत्‍न केले होते. याबाबतची सुनावणी अहिल्‍यानगर येथील अतिरिक्‍त  न्‍यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे कोर्ट क्रमांक 17 यांच्‍यासमोर झाली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड.आनंद व्‍यवहारे यांनी बाजू मांडली तर, सरकार पक्षाच्‍या वतीने अॅड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्‍मण वाडेकर यांनी बाजू मांडून शरद पवार यांच्‍या जामीण अर्जास विरोध केला.

       न्‍यायालयाने दोन्‍हीही बाजूचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यानंतर शरद खंडू  पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता या घटनेत शरद खंडू पवार याच्‍या चौकशीतून बरेच कारनामे समोर येण्‍याची शक्‍यता आहे.

गुरुवार, २१ मे, २०२६

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी  संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन

 विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!


शिर्डी, 

 शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या  उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी आणि नागरीकांसाठी  संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये  राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण असणार आहेत.
 देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सावळीविहीर येथील औद्यगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. अहील्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे  अहील्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल.या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे.संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. 

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून  यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. 

 उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.यासाठी मोठे स्टाॅल प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी  विज्ञानप्रेमी, नागरिक, महीला  या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.

बुधवार, २० मे, २०२६

१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण


अहिल्यानगर 

 शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन २३ मे रोजी सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या शुभहस्ते हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप,महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे,१६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष  संपतदादा बारस्कर,१६ वे संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनीताई तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष व माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष  सुरेश बनसोडे व शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
     उद्घाटनापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.यामध्ये शाहीर कल्याण काळे,भारुड सम्राट हमीद सय्यद, शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, डॉ.शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, दिगंबर गोंधळी, हौसीनाथ बोर्डे व शब्दगंधची टीम सहभागी होणार आहे.दुपारी २  वाजता "आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण" या विषयावर निलिमाताई बंडेलु यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यां निलीमा क्षत्रिय, मॅक्सवुमन मुंबईच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे सहभागी होणार आहेत. 

दुपारी ३ ते ५ कवयित्री माधुरीताई मरकड यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन ( कवी कट्टा)होणार असून यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे,प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा.शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ५ वाजता " बदलते ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती " या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये प्राचार्य डॉ.संजय नगरकर, लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके,साथी शिवाजी नाईकवाडी, प्रा.डॉ.गणेश मोहिते सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे कोषाध्यक्ष,गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल काव्य संमेलन होणार असून यामध्ये माधव सावंत, हनुमंत येवले, संजय पठाडे, रज्जाक शेख ,साहेबराव घुले, सरिता कलडोणे, प्रशांत वाघ, विक्रम कांबळे, राम गायकवाड, बबन धुमाळ,इकबाल काकर, बाळासाहेब गिरी, अरुण कटारिया, धनंजय तांदळे, सुहास घुमरे, हुमायून आतार,अजय त्रिभुवन, कुणाल शिरोडे, राजू आठवले, अंजली दीक्षित सहभागी होणार आहेत. 

   रविवारी सकाळी ९/३० वा.कथा व काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा.डॉ.संजय पाईकराव, संदीप रोहकले यांच्या हस्ते होणार असून प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे,प्राचार्य बाळासाहेब सागडे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर, अभिनव खानदेश चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहेत.प्रारब्ध - सौ.एस.एम. मिर्झा, अंतरी - सुरेखा घोलप, माणसं असे अन तसेही - बाळासाहेब देशमुख, निशब्द भावना - विनय पिंपरकर इत्यादी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. 

सकाळी १०/३०  वा.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कविवर्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे काव्य संमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य प्रकाश घोडके, हनुमंत चांदगुडे उपस्थित राहणार आहेत.या काव्य संमेलनात बाळ पाटील, चंद्रकांत कर्डक, भास्कर निर्मळ,दशरथ शिंदे, शारदा घोडके, डॉ.कैलास दौंड, अर्जुन देशमुख, शुभांगी राऊतमारे, लक्ष्मण खेडकर, वर्षा चौबे,डॉ.स्वाती पाटील, वसंत मुरदारे,अशोक निंबाळकर,माधुरी चौधरी, डॉ.प्रवीण जाधव, प्रवीण घुले, संदीप राठोड, नागेश शेलार, स्नेहल डाडर,नवनाथ केंदळे, अनिल कुमार होळकर,रिता जाधव इत्यादी महाराष्ट्रातील कवी यामध्ये सहभागी होणार आहेत.
      दुपारी २  वा. असा मी घडलो... हे चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरे,वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ.सचिन पांडुळे इत्यादी सहभागी होणार आहेत. 
दुपारी तीन वाजता ग्रंथविक्रेत्यामुळे वाचन चळवळीला पाठबळ मिळते का या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये लेखक प्रकाशक वाचक साहित्यिक ग्रंथ विक्रेते सहभागी होणार आहेत.
रविवारी दुपारी ४ वा.१७ व्या शब्दगंध संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप अहिल्यानगर चे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून यावेळी माजी आमदार कविवर्य लहू कानडे, पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अभयराव आव्हाड,सीएसआडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, कॉ. बाबा आरगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या संमेलनात प्रा.डॉ.गणी पटेल, छत्रपती संभाजीनगर व आयु. अशोकराव गायकवाड, अहिल्यानगर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार ॲड रंजनाताई गवांदे यांना देण्यात येणार आहे.तसेच विविध साहित्य कृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आत्तापर्यंत झालेल्या शब्दगंध संमेलनाध्यक्षांची भाषणे " शब्दसंचित " या सुनील गोसावी संपादित ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांसाठी साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे,शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,संयोजन समिती सदस्य संजय खामकर,परिमल निकम,जयंत गायकवाड, भगवान राऊत, डॉ.अशोक कानडे, भारत गाडेकर, जयश्री झरेकर, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, प्रा.डॉ. अनिल गर्जे,स्वाती ठुबे, बबनराव गिरी,सुभाष सोनवणे,हर्षल आगळे, मकरंद घोडके, शर्मिला गोसावी,राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी व राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

मंगळवार, १९ मे, २०२६

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार - डॉ. विखे पाटील

गोदावरी वसाहत आणि 340 गट नंबर मधील जागा रहिवाश्यांच्या नावावर करणार - डॉ. विखे पाटील 


राहाता 
 राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर येईल. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. .

  राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे जागेच्या संदर्भात विशेष पाठपुरावा करून तेथील रहिवाश्यांच्या नावावर जागा करण्याबाबत डॉ. विखे पाटील यांनी रहिवाशी व स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक राहाता बाजार समितीत घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहन सदाफळ, संजू सदाफळ, डॉ स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष, विजय सदाफळ उपनगराध्यक्ष नगरसेवक कैलास सदाफळ, मुन्ना शहा, राजेंद्र निकाळे, सुधाकर दंडवते, कानीफ बावके, संदिप दंडवते, भारत बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन,सतिश बावके, विकास बावके, हरिश श्रीखडे, रमेश गायकवाड, पप्पू बनसोडे, बबन बनसोडे, अक्षय रोहोम, बाबासाहेब डांगे, रावसाहेब बनसोडे, पुंडलिक बावके, नंदा माळी, चंद्रकांत बनसोडे, बाळू जाधव, सुनील लोखंडे, दीपक शिंदे, दीपक दंडवते, शहा, किशोर दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. 
       आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, राहाता येथील 340 आणि साकुरीची गोदावरी वसाहत या जागेबाबत अनेक मोठ्या तंत्रिका अडचणी निर्माण झाल्या होत्या. जागा वनविभागाची आहे आणि अनेक अडचणी येतील अशी काहींनी शंका उपस्थित केली होती. परंतु सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पूर्ण करतात, हा सर्व सामान्य जनतेला विश्वास होता. आणि आपण या बाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून विश्वास सार्थ ठरवला. या जागेच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण सातबाऱ्यावर सरकार असे नाव लागले होते. गुंतागुंत वाढली होती. परंतु दोन दिवस आधी आपण महाराष्ट्र शासन असे नाव लावून घेतले. त्या मुळे आता कायदेशीररित्या स्थानिक नागरिकांच्या नावावर जागा करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या मुळे तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे च करू शकतो! असे सांगून डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून जागा नावावर करण्याचा संघर्ष 340 व गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे संपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा प्रश्न सोडविला. विधानसभेच्या निवडणुकीत तुमची जागा तुमच्या नावावर करून देतो हा शब्द आपण पाळला. याचा आपल्याला अभिमान आहे. आपण राजकारणात ऐश्वर्य कमावले, वैभव कमावले परंतु आपण विश्वासाहर्ता कमावली हा मोठा आनंद आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील आपल्या शब्दावर काढले. पोलिस फाटा लागला नाही. त्या मुळे आता प्रत्येकाच्या नावावर 25 लाख रुपये किमतीची जागा झाली आहे. 
      सर्वांच्या विश्वासामुळे पालिकेत निर्विवाद सत्ता मिळाली. साकुरीतही आपण 5 कोटींचे कामे करू शकलो. अंतर्गत गटारी, रस्त्यांचे कामे मार्गी लागली. तुम्ही सर्वजण मतभेद विसरून एकत्र आला म्हणून हे शक्य झाले. राहाता शहराला किती निधी दिला. हे मी आत्ता सांगणार नाही. 
    मतदार संघात धर्म, जात याला थारा देणार नाही. गुन्हेगारीला साथ देऊ नका. आपल्याला मतदार संघातील गुन्हेगारी मोडीत काढायची आहे. मुलींची कुणी छेड काढत असेल तर त्याच्या घरावर बुलडोझर चालविण्यास मागे पुढे पाहणार नाही. असा इशारा डॉ. विखे पाटील यांनी गुन्हेगारांना दिला.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर झोन SOCIAL 2026

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, झोन 16 अहिल्यानगर झोन SOCIAL 2026 


राहता येथील साई विठ्ठला लॉन्स येथे दिनांक 22 मे रोजी अहिल्यानगर झोनचा बहुप्रतिक्षित “झोन SOCIAL” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2026-27 लायन श्रेयस दीक्षित, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र गोयल, सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुनीता मालपाणी, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीशभाऊ मालपाणी, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश कोठावडे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा व को-कन्व्हेनर लायन प्रकाश सदाफळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 9 लायन्स क्लब व 3 लिओ क्लबमधील प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, कॅबिनेट ऑफिसर्स, सिनियर पदाधिकारी व जवळपास 200 लायन सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

या “झोन SOCIAL” मध्ये विविध आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये — 📸 फोटो कॉन्टेस्ट
🎨 बॅनर प्रेझेंटेशन
🎶 समूह गायन स्पर्धा
🎵 धमाल संगीत संध्या

यांचा समावेश आहे.

संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अंध-अपंग सेवा व समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या क्लबचा गौरव झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. विविध क्लबच्या उत्कृष्ट कार्याची माहिती सर्वांसमोर मांडून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

राहता येथे प्रथमच डॉ. संजय उबाळे यांच्या रूपाने इतक्या मोठ्या स्तरावर झोन SOCIAL चे आयोजन होत असून, त्यामुळे राहता शहरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे. राहता क्लबचे सर्व सदस्य एकदिलाने कार्य करून क्लब वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमासाठी लायन एकनाथ गोंदकर, लायन श्रीनिवास भंडारी, लायन तुलसीदास खुबानी, प्रविण गुलाटी, हरजितसिंग वाधवा, संदीप रोहमारे, आशिष बोरावके, आनंद ठोळे, कल्याण कासट, राहुल अरबटी, अक्षय गिरमे, महेश वैद्य, संजय असावा, संतोष माणकेश्वर, संदीप गोंदकर, धनंजय धुमाळ, सचिन शहा व इतर अनेक लायन सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन डॉ. संजय गायकवाड, प्रकाश सदाफळ, ॲड. गोरखभाऊ दंडवते, दीपक दंडवते, ॲड. संतोष घोडके, ॲड. दिनेश कारले, मुन्नाभाई शहा, व्यंकटेश अहिरे, राजेंद्र बांगर, सुनील हासे, नीलेश चोरडिया, डॉ.लीना उबाळे,संतोष उबाळे, साहेबराव गायकवाड, डॉ.जयंत घोडेराव,सुरेश गायकवाड ,अंजली उबाळे, सोहन उबाळे, सरला तायडे, स्मिता मुरादे, उमेश शेटे, लता जाधव,डॉ मनाली उबाळे, डॉ. शर्वरी कुलकर्णी, संध्याताई कारले, श्वेता कारले, अर्चना दंडवते, रतन चौधरी, खिजर शहा, आसावरी बेंद्रे तसेच राहता क्लबचे सर्व पदाधिकारी व सभासद परिश्रम घेत आहेत.

🌟 हा कार्यक्रम आनंद, मैत्री, सेवा आणि उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. 🌟
झोन कार्यक्रमासाठी झोन चेअरमन डॉ संजय उबाळे, कन्व्हेनर लायन सुधीर डागा, झोन सेक्रेटरी लायन ॲड कल्याण कासट, ट्रेजरर लायन संदीप  राशीनकर यांनी उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे

सोमवार, १८ मे, २०२६

फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

(राहाता)
 : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
गोगलगाव येथील रहिवासी शेतकरी विनायक चौधरी यांच्या संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील शेतातील फळबागेला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर मोठ्या प्रमाणावर कच्ची फळे गळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाहणीदरम्यान प्रभावती घोगरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानाचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
“अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने विलंब न करता तातडीने मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,” असे त्या म्हणाल्या.
तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, पीक विमा योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पाहणीवेळी विलास गुळवे, शेतकरी विनायक चौधरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीबाबत माहिती देत शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ! 

जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना !

१५५ मिली मीटर‌‌ क्षमतेचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार

शिर्डी, दि.. १८ :- अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून, या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वांत मोठी क्षमता मानली जात असून, संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन पंधरा टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे सहाशे एकर जागेवर भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलात टीएनटी, आरडीएक्स, एचएमएक्ससारखी विविध स्फोटके व प्रणोदक तयार करणारे कारखाने उभारले जात असून, त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरवर्षी वीस हजार टन टीएनटी उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होणार असून, सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वांत मोठी क्षमता ठरणार आहे. टीएनटी व आरडीएक्स निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यांचे उद्घाटन व सादरीकरण लवकरच होणार आहे.

शिर्डी येथे तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. नव्या प्रकल्पांमुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्याने प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आला आहे.

स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत असून, त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमआयडीसीकडूनही पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर एमआयडीसी परिसरात करण्यात आले असून, भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातून नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी ठरणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

उत्कृष्ट समाज घडवण्यासाठी ‘पंच परिवर्तना’ची गरज : अतुल अग्निहोत्री

उत्कृष्ट समाज घडवण्यासाठी ‘पंच परिवर्तना’ची गरज : अतुल अग्निहोत्री

श्रीरामपूर
 "राष्ट्राचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर केवळ विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आजचा समाज अधिक प्रगल्भ, संवेदनशील आणि सुदृढ बनवण्यासाठी 'पंच परिवर्तन' ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'संघशताब्दी मंथन - परिवर्तनाच्या दिशेने' या जिल्हास्तरीय प्रमुखजनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. १७) श्रीरामपूर येथील निर्मळ संकुलात करण्यात आले होते. या वेळी मुख्य वक्ते म्हणून अतुल अग्निहोत्री ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला (दिल्ली) आणि उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा संघचालक किशोर निर्मळ उपस्थित होते.
अग्निहोत्री यांनी आपल्या संबोधनात पंच परिवर्तनातील सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, स्व-बोध (स्वत्वाचा भाव) आणि नागरी शिष्टाचार या पाच मुख्य सूत्रांवर प्रकाश टाकला. हे विषय केवळ उपदेशाचे नसून, दैनंदिन जीवनात आणि समाजात त्यावर प्रत्यक्ष कृती कशी करता येईल, याची उदाहरणे त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत विविध शंकांचे निरसन केले.

ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला यांनी संघाच्या कार्यपद्धतीचा आणि विविध आयामांचा आढावा घेतला. भारतीय संस्कृतीतील 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या उभारणीसाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

प्रारंभी, दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा प्रचार प्रमुख मंगेश भिडे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. श्रीरामपूर तालुका प्रचार प्रमुख महेश तारगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. या 'शताब्दी मंथन' कार्यक्रमाला उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार, संपादक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत, कायदेतज्ज्ञ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. प्रणव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश भिडे यांनी आभार मानले. जिल्हा सह बौद्धिक प्रमुख विजयराव ढोले व वाद्यवृंदाच्या सामूहिक 'वंदे मातरम' गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

रविवार, १७ मे, २०२६

प्रथम भीमशब्द साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी साही. राजेंद्र फंड यांची निवड :

प्रथम भीमशब्द साहित्य संमेलनाचे  स्वागताध्यक्ष पदी साही. राजेंद्र फंड यांची निवड :

नाशिक 

                     तेजस बहूउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांचे वतीने  नाशिक येथील रमाई सभागृह डॉ. आंबेडकरनगर येथे एकदिवसीय प्रथम भीमशब्द साहित्य संमेलनाचे आयोजन दि. 31 में रोजी करण्यात आले असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे सहसंपादक साही. राजेंद्र फंड यांची निवड केल्याची घोषणा तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा डोळस यांनी जाहीर केले आहे.
              तेजस या संस्थेबद्दल सांगायचे झाले तर   जिथे गरज, तिथे तेजस!जिथे वेदना, तिथे आधार!जिथे प्रतिभा, तिथे संधी! तसेच गरजू मुलांना अन्न, शिक्षण, आधार,नवोदित कलाकारांना रंगमंच,कवींना व्यासपीठआणि समाजाला दिशा देणे.हे काम साधं नाही, हे खऱ्या  अर्थाने “भीमकार्य” आहे! 
              आजच्या या संमेलनात नामवंत साहित्यिक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. त्यामध्ये संमेलनाध्यक्ष आचार्य श्री. शंकर अंदानी, दंगलकार कवी नितीन चंदनशिवे, उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सौ. जयश्री सोनकवडे, आ. महेश हिरे, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका सौ. सविता काळे व इतरही मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. 
                 साही. राजेंद्र फंड  हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या 15 वर्षापासून  ते " ग्रामसेवा संदेश " हा दिवाळी अंक प्रकाशित करतात. महाराष्ट्रभर त्यांचा दिवाळी अंकामुळे खूप मोठा  साहित्यिक परिवार आहे.  यांची या वर्षात महाराष्ट्रातील पुणे , कोल्हापूर, सातारा, भंडारा, वडाळा, निमगाव वाघा , श्रीरामपूर, दाभे मोहन, शिर्डी, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात व वेगवेगळ्या  ठिकाणी 5 वेळा संमेलनाध्यक्ष, दोन वेळा स्वागताध्यक्ष, 4 वेळा कविसंमेलनाध्यक्ष, एक वेळा विशेष एक वेळा विशेष अतिथी, एक वेळा पुस्तक प्रकाशन समारोह अध्यक्ष, 14 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजक सदस्य होते. नुकतेच त्यांनी शिर्डी येथे आयोजित केलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन खूप गाजले आहे.
               त्यांच्या या निवडीबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव श्री. सुनील गोसावी व शब्दगंध परिवार, ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, लायन्स क्लब ऑफ राहाताचे संस्थापक ला. विनोद गाडेकर, प्रेसिडेंट ला. सागर रोकडे, व्हाइस प्रेसिडेंट ला. डॉ. स्वाधीन गाडेकर, सेक्रेटरी ला. अमोल उगले, ट्रेझरर ला. सुनील धाडगे, डेबूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनील निकम, श्री. माधवराव देसाई, श्री. सुधाकर वाघ, अनिल देसाई, विलासराव रोकडे, रेशीमगाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल हुपरीकर, श्री. योगेश रोकडे, श्री महेश यादव, श्री. साईनाथ हजारे, श्री. कृष्णा शिंदे, सौ. सुषमा अमृतकर , सौ.सुनीता राक्षे यांनी अभिनंदन केले आहे.

शनिवार, १६ मे, २०२६

शनि जयंती व शनि आमवश्या निमित्त भर उन्हात ८लाख भाविकांनी घेतले शनि दर्शन.

शनि जयंती व शनि आमवश्या निमित्त भर उन्हात ८लाख भाविकांनी घेतले शनि दर्शन.

नेवासा ( प्रतिनिधी)-

दि. १६ शनि जयंती व शनि आमावश्या एकत्र येण्याचा योग २०१३ नंतर सुमारे १३ वर्षा नंतर जुळून आल्याने शनिशिंगणापूर येथे सुमारे ८लाख भाविकांनी शनि दर्शन घेतले. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त झाल्याने प्रथम ६३वर्षानंतर शासन पातळीवर शनि जयंतीचे नियोजन केले गेले.

शनिवारी सकाळी ५वाजून ११मिनिटांनी शनि आमावश्या सुरुवात झाली असल्याने शुक्रवारी मध्यरात्री नंतरच भाविकांनी शनिशिंगणापूर येथे गर्दी केली होती. पहाटे ४.३० वाजता संभाजीनगरचे माजी खा.चंद्रकांत खैरे, श्रीनाथ भिमाले, पंकज पटेल यांच्या हस्ते प्रांत:आरती झाली.दुपारची आरती राकेश कुमार, सौरभ बोरा,सौरभ गाडगीळ व कावडी धारकांच्या हस्ते आरती झाली. सायंकाळीची आरती पद्मश्री झिम्बाबेचे उद्योगपती जयेश शहा यांच्या हस्ते झाली.तसेच दिवसभरात नांदेडचे आ.आनंदराव पाटील भोंढारकर, संगमनेरचे आ.अमोल खताळ,आ.विठ्ठलराव लंघे, खेडचे आ.बाबाजी काळे,माजी मंत्री शंकरराव गडाख, लोकनेते सुनिल गडाख आदीनीं शनिजयंती निमित्त शनि दर्शन घेतले.

शनि जयंती निमित्त शनिशिंगणापूर येथील युवकांनी काशी व प्रवरासंगम येथून आणलेल्या कावडीच्या पाणी शनि चौथऱ्यावर जाऊन अर्पण केले. तसेच झिम्बाबे येथील उद्योगपती जयेश शहा व मुंबई येथील व्यापारी सोनी साहेब यांनी शनिजयंती व आमवश्या निमित्त शनिशिंगणापूर येथे शनि मंदिरात विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते.शनि जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिवसभर शनि मंदिरात सुरक्षा व दर्शन व्यवस्था थांबून बघितली. शनि मंदिर परिसरात बाटल्या कचरा स्वतः उचलत त्यांनी स्वच्छता केली.अहिल्यानगर पोलीस दल, सोनई व शनिशिंगणापूर पोलीसांनीं दिवसभर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी शनि जयंतीच्या यात्रेचे चोख नियोजन केले होते. शनि मंदिरात मंदिरात भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गारव्यासाठी तुषार कारंजे सोडण्यात आले होते. शनिशिंगणापूर येथे हरियाणा, शिरसा,दिल्ली येथील शनिभक्तांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर अन्नदान सेवा केल्याने देवस्थानचे भोजनालय बंद असल्याची उणीव भासली नाही.भाविकांना दिवसभर पिण्याचे पाणी, बॉटल, चहा, सरबत, नाश्ता व जेवनाची सोय केली होती.
देवस्थान प्रशासनाने प्रथमच खाजगी जमीनी मालकाशी समन्व्यय साधून मोफत पिण्याच्या पाण्याची सोय व विश्रांती कक्ष, वाहन तळ उभारले होते.सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिवसभर आरोग्य पथक भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत होते.
जनसंपर्क कार्यालयामध्ये दिवसभर येणाऱ्या भाविकांचे स्वागत जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले व पोलीस पाटील सयाराम बानकर यांनी केले.

चौकट -भुयारी दर्शन मार्गात पूणे येथील शनिभक्त अतुल धोत्रे यांना उन्हामुळे चक्कर आल्याने तातडीने प्रशासनाने त्या रुग्णाला उपचार केंद्रात दाखल केले. यानंतर देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष दिपक दरंदले यांना लटकूच्या मोटार सायकलने धडक दिल्याने पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले

मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची सांगता उत्साहात

मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची सांगता उत्साहात

शिर्डी, 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तथा सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट, म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
दि. ११ ते १४ मे दरम्यान आयोजित या शिबिरामध्ये सुमारे १२०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. विविध त्वचारोगांवरील सुमारे २५० प्रोसिजर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सुमुखा लक्ष्मी ट्रस्ट, म्हैसूर येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शिवानी तसेच प्लास्टिक सर्जन डॉ. चंदन कुमार यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर श्री साईनाथ रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दादासाहेब कांबळे, डॉ. श्रद्धा कोते आणि डॉ. विवेकानंद पाटील यांचाही उत्कृष्ट सेवेसाठी गौरव करण्यात आला.
“जागतिक नर्सिंग डे” निमित्त रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफचा “फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रणाली सोमन, अनिता कडूस, सुरेखा गायकवाड, तेरेसा गायकवाड, प्रीतम कुमार बोधक, सिताराम डांगे, उषा बोधक, किरण धोटे, सारिका गावडे, सीमा आहेर, शारदा जाधव, निलेश गाडेकर, कविता पंडित आणि प्रसाद पाबळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक अधिसेविका मंदा थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. यावेळी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, सर्जन डॉ. राम नाईक, कार्यालयीन अधीक्षक काकासाहेब ढेमरे, अधिसेविका नजमा सय्यद यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी व नर्सिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार, १४ मे, २०२६

ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दिनांक 23 मे 2026 रोजी होणार

शिर्डी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि 'मेक इन इंडीया' या भारताच्या दूरदर्शी संकल्पनांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलांचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथसिंह  यांच्या उपस्थितीत दि.२३ मे २०२६ रोजी  होणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे गृपचे गणेश निबे यांनी दिली.

शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या माध्यमातून भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर निर्माण होत आहे.

शिर्डीची भूमी भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे.श्री साईबाबांचा श्रध्दा आणि सबुरीचा संदेश आणि दुसरीकडे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहील्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट करून, कार्यान्वित होणार्या प्रकल्पातून तीन हजार  रोजगार  निर्मिती होईल. यासाठी शिर्डीची निवड केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  आभार मानले.

निबे उद्योग समुहाचे गणेश निबे प्रकल्पाची माहीती देताना म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आमच्या स्टार्टअपला मिळालेली संधी खूप मोठी आहे. शिर्डी येथील प्रकल्पात एक हाजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आतापर्यत  केली आहे.भविष्यात ही गुंतवणूक अधिक वाढेल.अत्याधुनिक प्रणालींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि एकत्रीकरण करणारी भारतातील आघाडीचा निबे गृप असून,शिर्डी येथील प्रकल्पातील  बाॅम्ब शेलच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि  बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमीपूजन संरक्षण मंत्री राजनाथसिंह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

शिर्डी येथील प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षा अर्थिक विकास लघु सूक्ष्म उद्योगाचे सक्षमीकरण रोजागार निर्मीती आणि पर्यावरणीय जबाबदारी आशा एकात्मिक दृष्टिकोनातून कार्यान्वित होणार असून,प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने देशभरातील  विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंते,लघु सूक्ष्म उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे गणेश निबे यांनी सांगितले.

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...