गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ यादव गोदा ते नर्मदा यात्रा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेची-मंत्री बावनकुळे


--
जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ यादव 

गोदा ते नर्मदा यात्रा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेची-मंत्री बावनकुळे
गोदा ते नर्मदा यात्रेतून जलसंवर्धानाचे मंधनझाले-ना.विखे पाटील 

महेश्वर /शिर्डी  


‘‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अद्भुत आणि उज्ज्वल होते म्हणूनच आपल्यासाठी आदर्शवत आहे.महाराष्ट्राच्या महापुरुषांनी देशाला दिशा दिली.त्यांचे सुशासन आणि जीवनकार्य अनेक शतकांपर्यत सर्वाना प्रेरणादायी ठरेल.त्यांच्या आशीवार्दानेच सरकारचे काम सुरू असून, गोदा ते नर्मदा यात्रमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले असल्याचे भावोद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मभूमीतून आणि गोदा मातेचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मधून निघालेली गोदा ते नर्मदा जलयात्रा पाच दिवसांच्या प्रवासानंतर काल बुधवारी महेश्वर येथे पोहोचली. अतिशय भारलेल्या मंगलमय वातावरणात  मंत्रघोषाच्या जागरात नर्मदा घाटावर डॉ. यादव यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप महाराष्ट्रातील १३०नद्यामधून आणलेले जल नर्मदेमध्ये विसर्जित करण्यात आले.गोदामातेची महाआरती करून चौंडी येथील मातीचा कलश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आणि अहील्यादेवीचे सोळावे वंशज श्रीमंत युवराज यशवंत होळकर बहाद्दूर यांच्याकडे मंत्री विखे पाटील यांच्यासह जलयात्रेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी सुपूर्त केला.
 
अहिल्यादेवींच्या राजवाड्यासमोर असलेल्या प्रशस्त घाटावर जलयात्रेचा समारोप सोहळा रंगला. नर्मदेच्या विशाल पात्रातून वाहणाऱ्या पाण्यावरचे हलके तरंग, आकर्षक प्रकाशयोजना महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूंचा वारकरी सांप्रदायाचा  उत्साह, छत्रपती शिवराय व अहिल्यादेवी यांच्या जयजयकाराच्या घोषणा, नर्मदाष्टकमचा नाद आणि नर्मदेची आरती यामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पणनमंत्री जयकुमार रावल, होळकर घराण्याचे युवराज यशवंतराव होळकर, खासदार शंकर लालवाणी (इंदूर) व रामराव वडकुते, महेश्वरचे आमदार राजकुमार मेव, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, श्री. उद्धव महाराज मंडलिक, महेश्वर नगरपालिकेचे पदाधिकारी, जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मुख्यमंत्री डॉ यादव म्हणाले की,राज्यकर्त्याच्या नात्याने अहिल्यादेवींची भूमिका अद्भुत म्हणावी अशीच आहे. त्या आमच्यासाठी सदैव आदर्श आहेत. आमच्या सरकारला त्यांचाच आशीर्वाद आहे, ‘‘परकीय आक्रमकांचा सामना करण्यास लोक घाबरत होते, त्या काळात अहिल्यामाता लढल्या. त्यांचे राज्य छोटे असेल कदाचित; पण लढण्याचा, लोकहितासाठीच राज्य करण्याचा निर्धार मोठा होता.’’
‘‘श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मवाद पुण्यश्लोक अहिल्याबाई जगल्या. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याला आदर्श घ्यायला लावणारा आहे. भारतात पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा चारही दिशांना त्यांनी नदीकिनारी घाट बांधले. असंख्य देवस्थानांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. असे प्रत्येक देवस्थान त्यांची गौरवगाथा गात आहे,’’ असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

‘महाराष्ट्र-मध्य प्रदेश जुळे भाऊ’
‘‘महाराष्ट्राचे नुसते नाव घेतले तरी मी रोमांचित होतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जणू जुळे भाऊ आहेत,’’ असे सांगून डॉ. यादव म्हणाले, ‘‘लोकमाता अहिल्याबाईंमुळे आपले नाते होतेच. गोदा ते नर्मदा जलयात्रेमुळे ते अधिक दृढ झाले. सिंहस्थामुळे नाशिक आणि उज्जैन हे तिसरे नाते आहे. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, शिंदे, होळकर असे अनेक महापुरुष देशाला दिले. त्या सर्वांनी देशाला नवी दिशा दिल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
जलयात्रेची माहिती देताना श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘जलयात्रेच्या माध्यमातून एक लोकचळवळ तयार झाली, ही यात्रेची मोठी फलश्रुती आहे. जलव्यवस्थापन, लोककल्याण, सुशासन यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळखल्या जातात. राज्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेले काम आजही आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.’’जलयात्रेमुळे जागरूकता’
‘पाण्याच्या प्रत्येक थेंबागणिक अधिक उत्पादन’ यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही जलयात्रा यशस्वी झाली, असे सांगून श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘जलयात्रेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील १३० नद्यांचे पाणी एकत्र केले. त्यातून जलसंवर्धन, पाण्याचा वापर याबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाली. त्यामुळेच ही जलयात्रा केवळ धार्मिक वा आध्यात्मिक स्वरूपाची सांकेतिक यात्रा बनली नाही. त्यातून पर्यावरणाचे संरक्षण, जलसंवर्धन यावर मंथन झाले.पाणी हे जीवन आहे आणि ऊर्जाही आहे, हे या यात्रेमुळे अनेकांपर्यंत पोहोचले.’’

*चौदा कोटी जनतेची जलयात्रा*
श्री. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा जलयात्रेचे ऐतिहासिक आयोजन झाले, असे कौतुकोद्गार काढून श्री. बावनकुळे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री. विखे पाटील यांनी आम्हां सगळ्यांसमोर जलयात्रेची कल्पना मांडली, तेव्हा ती एवढी मोठी होईल, असे वाटले नव्हते. तथापि ही यात्रा व्यापक झाली, महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची ती आपली यात्रा बनली. या माध्यमातून पर्यावरण आणि जलसंधारण याबाबत मोठी जागरूकता निःसंशयपणे झाली.’’संपूर्ण जग पाणीटंचाईच्या चिंतेने ग्रासले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंस्कृती वर्धिष्णू करण्याबाबत बोलतात, विचार करतात. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव त्याच रांगेत येतात. त्यांनी आखलेल्या जलगंगा समर्थन यासह अन्य मोहिमा पाहिल्या तर त्यांना मध्य प्रदेशचे ‘जलक्रांतिदूत’ म्हटले पाहिजे, असे श्री बावनकुळे म्हणाले. अध्यात्म, लोककल्याण आणि संस्कृती यांचा पवित्र संगम म्हणजे अहिल्याबाई, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.


श्री. पडळकर म्हणाले, ‘‘लोकमाता अहिल्यादेवींनी जलव्यवस्थापनातून लोकशाही सुरू केली. त्यांनी प्रजेला ऊर्जा दिली. आज येथे दोन नद्यांचा महासंगम झाला आहे. त्याला तिसरी नदीही मिळाली. ही नदी म्हणजे अहिल्यादेवी!’’ मंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.

 सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करून आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा बुधवारी दुपारी महेश्वर येथे पोहोचली, तेव्हा नागरिकांनी तिचे उत्साहात स्वागत केले. यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून प्रमुख पाहुण्यांसह यात्रा मिरवणुकीने समारोपस्थळी आली. मिरवणुकीच्या मार्गावर सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या लोककला, खेळांनी महेश्वकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.
-------
(क्षणचित्रे)

 डॉ. मोहन यादव म्हणाले, ‘‘यात्रेच्या समारोपाला मी उपस्थित राहावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मला फोन केला. देवाभाई जो कहे वह हमेशा सुनेंगे। त्यातून यात्रेचे नेतृत्व करणारे आहेत मंत्री विखे पाटील. ज्यांच्या नावात ‘राधा’ आहे, ‘कृष्ण’ आहे आणि ते स्वतः पाटील! शिवाय यात्रा अहिल्यादेवींचे आदर्श जपणारी. म्हणून मी आनंदाने आलो.’’

 गोदावरी नदी ही संस्कृतीची संजीवनी आहे, असे संत एकनाथ महाराज यांनी म्हटल्याचे सांगून श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘वारकरी आणि जलसंपदा खात्याचे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळे पाच दिवसांची जलयात्रा यशस्वी झाली. अहिल्यादेवींचे दैवत असलेल्या श्री शंकराला प्रिय असलेल्या महेश्वरमधील बेलवृक्षाला आम्ही श्री क्षेत्र चौंडी येथील माती आणि गोदावरीचे पाणी घालून वाढवू. या जलयात्रेचा स्मृतिफलकही अहिल्यादेवींच्या राजधानीत लावू.’’
 श्री. पडळकर यांनी नेहमीच्या दिलखुलास शैलीने महेश्वरकरांना जिंकले. ते म्हणाले, ‘‘मोदी देशाचे आणि देवाभाऊ महाराष्ट्राचे वॉटरमॅन आहेत.
--------------------------------------

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

राहता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी साजरी

Rahata

राहाता नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राहता नगर परिषदेच्या कार्यालयात पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
  यावेळी डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा करून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सहकार चळवळीला एक वेगळी दिशा दिली. शेतकरी सभासद हा देखील एका उद्योगाचा मालक असू शकतो ही संकल्पना त्याकाळी मांडणे ही मोठी बाब आहे. आज माझ्यासारखा तरुण जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात काम करत असताना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना आदर्श मानून एका पतसंस्थेचा कारभार करत आहे याचा मला अभिमान आहे.
   यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, गटनेते मुन्ना शहा, नगरसेवक प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, ॲड. मयुर पाळंदे, नितीन गाडेकर, नगरसेविका सविता सदाफळ, अंजली सदाफळ, मंगल डांगे, अनिता शेळके, शीतल बनकर,  विजय गिधाड, सुरेश माळी, प्रभाकर आरणे, योगेश डांगे, सुयोग शेळके, प्रदीप बनकर, अरुण गाडेकर, कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

शिवाजी कोन होता या पुस्तकाचे प्रकाशक कॉ. प्रशांत अंबी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांस त्वरीत अटक करा. = प्रभावती घोगरे.

शिवाजी कोन होता या पुस्तकाचे प्रकाशक कॉ. प्रशांत अंबी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांस त्वरीत अटक करा. = प्रभावती घोगरे.

Rahata
 
शिवाजी कोन होता या कॉ. गोविंद पानसरे लिखीत पुस्तकाचे प्रकाशक कॉ. प्रशांत अबी यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करून त्याना अटक करावी अशी मागनी महीला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटनीस प्रभावती घोगरे यांनी केली आहे.

गोविंद पानसरे यांना जसे मारले तसे तुला मारू असे संजय गायकवाड प्रशांत अंबी यांना म्हणाले या वरून गोविंद पानसरे यांच्या खुनात यांचा सहभाग होता का ? याची चौकशी करून आमदार संजय गायकवाड यांना सह आरोपी करा अशी मागनी कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी केली.
शिव शाहु फुले आंबेडकर यांच्या महाराष्टात असे लोक प्रतिनिधी आहे हि लाजीरवानी गोष्ट आहे असे शिर्डी शहर कॉंग्रेसचे अध्यक सचिन चौगुले म्हणाले.
आ. संजय गायकवाड यांना त्वरीत अटक करावी अन्यथा या पेक्षा तिव्र आंदोलन संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात केले जाईल असे कॉ. प्रा. एल एम डांगे यांनी आपल्या भाषनात सांगीतले
सदर निदर्शने आंदोलनात कॉ. श्रीधर आदीक कॉ. कानिफ तांबे महामानव फौन्डेशनचे सिमोन जगताप कॉ. रघुनाथ तांबे कॉ. बाबा शेख कॉ. लक्ष्मन पानसरे ईत्यादी कार्यकर्ते हजर होते .
शेवटी तहसीलदार अमोल मोरे यांनी निवेदन स्विकारून आपल्या भावना शासनापर्यंत लवकरात लवकर पोहच करतो असे सांगीतले.

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

शिर्डीत राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य संमेलनाचा रंगलेला हा प्रेरणादायी सोहळा; राजेंद्र फंड.

शिर्डीत राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य संमेलनाचा रंगलेला हा प्रेरणादायी सोहळा; राजेंद्र फंड.

शिर्डी 
: राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित 28 व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष राजेंद्र फंड यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. 26 एप्रिल 2026 रोजी शिर्डी येथील हॉटेल जे. के. पॅलेस येथे हा एकदिवसीय सोहळा उत्साहात पार पडला.

संमेलनाध्यक्ष राजेंद्र फंड यांनी आपल्या  समारोपीय भाषणात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत त्यांच्या "दशसूत्री जीवनमार्गदर्शन" या विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. साधेपणा, स्वच्छता, सेवा, सत्य आणि समाजोपकार ही मूल्ये आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गाडगेबाबांनी शिक्षण, स्वच्छता, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगताना त्यांनी गरीब, अनाथ आणि वंचित घटकांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. “देव दगडात नाही, तो माणसात आहे” आणि “गाव स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा” या त्यांच्या संदेशांचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना हे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.

या संमेलनात डेबूजी प्रतिष्ठाणच्या वतीने राष्ट्रीय डेबूजी संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री एकनाथराव बोरसे व सहा भारतीय पेटंटचे मानकरी तथा संदीप विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रसाद बाविस्कर , 28 व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साही. राजेंद्र फंड,व ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते डॉ. पांडुरंग गुंजाळ, श्री. एकनाथराव बोरसे, श्री. गणेश दळवी, डॉ. मोहन गायकवाड, राष्ट्रीय भारुडकर हमीद सय्यद, चित्रकार रवी भागवत, श्री. अनिल हुपरीकर, श्री. मनोज म्हस्के, राष्ट्रीय कीर्तनकार खंडोजी गायकवाड यांना मरणोत्तर  प्रदान करण्यात आला. याशिवाय डॉ. प्रसाद बाविस्कर, सुषमा अमृतकर, रजनी लुंगसे, डॉ. एकनाथराव ढाकणे, विलास रोकडे, राजेंद्र देसाई,व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. साहित्य, समाजसेवा, शिक्षण, उद्योग आणि कला क्षेत्रातील पुरस्कारांद्वारे गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, सन्मानार्थींना समर्पित टपाल तिकीटाचे अनावरणही करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद समाजाच्या स्मरणात राहील.
 राजेंद्र फंड यांच्या  "जीवनदीप गाडगेबाबांचा" या कवितासंग्रहासह इतर आठ कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.   संमेलनातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांची नव्याने उजळणी झाली असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
          संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजक श्री. सुनील निकम, कवी सरकार, सुधाकर वाघ, अनिल देसाई, विलास रोकडे, रोहित रोकडे, सौ . राजश्री फंड यांनी केले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प जलयात्रेच्या निमित्ताने पूर्ण जलसंपदा मंत्री विखे पाटील


शिर्डी 


संपूर्ण जगाला श्रध्दा आणि सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या भूमीत पुण्यश्लोक अहील्यादेवीचा जयजयकार करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही  यात्रा शिर्डीत दाखल झाल्या.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प जलयात्रेच्या  निमिताने पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे  त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नमर्दा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गोदा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथून यात्रेची सुरूवात करण्यात आली.दोन्ही यात्रा शिर्डी मध्ये एकत्रित होवून मध्यप्रदेशकडे सोमवारी रवाना होणार आहेत.राज्यातील सर्व नद्यामधून आलेल्या जलकलशाचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील खा.वडतुके आ.गोपीचंद पडळकर आ.सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदीरात पूजन करून यात्रेचे स्वागत केले.शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला.

पूण्यश्लोक अहील्यादेवींचा पुतळा आणि कलशाचा रथ जलयात्रेचे मुख्य आकर्षण आहे.धनगर नृत्य तसेच मंत्री विखे पाटील यांच्यासह सर्व सहभागी आमदारांचा बस मधून चाललेला प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.

यात्रेच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलसंवर्धनाची चळवळ महत्वपूर्ण होतीच पण सांस्कृतिक परंपरेचा वारसा सुध्दा त्यांच्याकडून आपल्याला मिळाला.श्री दासगणू महराजांनी  श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी  ग्रंथ महेश्वर येथे लिहीला त्यामुळे शिर्डी आणि महेश्वर नगरीच नात हे अध्यात्माने जोडले गेले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला

श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला

श्रीरामपूर 
  शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026’चे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहरात या यात्रेच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी, फलक, फुलांची सजावट आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जलजागृती यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथून प्रारंभ झालेली ही जलयात्रा राज्यभर प्रवास करत असून, जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ या संकल्पनेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश देत ही यात्रा पुढे सरकत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून ही यात्रा चौंडी ते महेश्वर असा महत्त्वपूर्ण प्रवास करत आहे. या यात्रेमुळे पाणी वाचवा, पाणी साठवा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करा, असा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचत आहे.

श्रीरामपूरमध्ये आगमन होताच यात्रेचे हनुमान मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि जलसंवर्धनाच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांसह आरती करून यात्रेचे स्वागत केले. यानंतर यात्रेने शहरातील विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच गुरुद्वार येथे दर्शन घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी यात्रेचा सन्मान करण्यात आला आणि जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 या स्वागत सोहळ्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर  तसेच भाजप नेते संजय फंड, गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, दिपक चव्हाण, मा नगराध्यक्षा अनुराधा आदिक, संजय छल्लारे, बंडुकुमार शिंदे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड,रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे ,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले,  महिलांची आणि युवकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. दरम्यान, या जलयात्रेचा पुढील मुक्काम शिर्डी येथे असणार असून, त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या दुसऱ्या यात्रेसोबत एकत्रितपणे ही यात्रा पुढे घृष्णेश्वरकडे प्रस्थान करणार आहे. या यात्रेचा समारोप महेश्वर येथे होणार असून, त्याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही जनजागृती आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेत अहिल्याबाई होळकर यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.
एकूणच, ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरात जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये पाणी वाचवण्याची भावना दृढ होताना दिसून आली. ही यात्रा पुढील प्रवासातही अशाच प्रकारे जनजागृती करत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रविवार, २६ एप्रिल, २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जलसंवर्धनासाठी मोठे योगदान- खासदार सुजय विखे पाटील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जलसंवर्धनासाठी  मोठे योगदान- खासदार सुजय
 विखे पाटील

नेवासा



-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्हयाचे पालकमंत्री व  राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदर्शी व कल्पकतेतून व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर संस्थान महेश्वर अशी काढण्यात आलेल्या गोदा-नर्मदा जलजागृती यात्रेचे रविवारी नेवासा नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अहिल्यादेवींचे जलसंवर्धनाविषयी असलेले योगदान मोठे असून त्यांचे हे कार्य नव्या पिढीला कळावे म्हणून गोदा नर्मदा जलजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन सुजयदादा विखे पाटील यांनी यावेळी बोलतांना केले
   भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या जलजागृती यात्रेमध्ये जलयात्री मोठ्या संख्येने सहभागी झाले होते  जलजागृती यात्रेचे श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात धनगर समाजाच्या वतीने भंडारा उधळीत क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.सदरची जल जागृती यात्रा नेवासा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर येथील स्मारक प्रांगणात आली याठिकाणी गोदावरी,प्रवरा,मुळा या तीन नद्यांच्या कलशातील पाण्याचे पूजन माजी खासदार सुजयदादा विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी कलश यात्रेसाठी सुपूर्त करण्यात आला.
                  यावेळी नगरपंचायत चौकात झालेल्या सभेच्या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य समाजासह पुढच्या पिढीला कळावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी जलजागृती यात्रेची धुरा जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांच्याकडे सोपवली त्या नुसार ही यात्रा चौंडी येथून सुजयदादा विखे पाटील यांची नेतृत्वाखाली येथे आली असल्याचे सांगत त्यांनी  जल जागृतीचे महत्व विषद केले.
            यावेळी बोलतांना खासदार सुजयदादा विखे पाटील म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासह देशात केलेले जलसंवर्धनाविषयी असलेले कार्य मोठे असून त्यांचे हे कार्य नव्या पिढीला कळावे म्हणून अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त ही गोदा नर्मदा जलजागृती यात्रा काढण्यात आली असून यानिमित्ताने गोदावरी व नर्मदा या दोन नद्यांचा संगम या यात्रेमध्ये झालेला आहे जलजागृतीचा हा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला विचारांसह दिशा देण्याचे काम केले त्यांच्या या कार्याला अनुसरून या जिल्हयाचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले यासाठी मी राज्य सरकारचे आभार मानतो असे सांगून या जलजागृती यात्रेचा संदेश व पाण्याचे महत्व समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.नेवासकरांच्या वतीने नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी यात्रेतील सहभागी झालेल्या जलयात्रीचे व नेवासकरांचे आभार मानले.
           यावेळी झालेल्या जलजागृती यात्रा स्वागत कार्यक्रम प्रसंगी भाजपनेते लक्ष्मण सावजी,जेष्ठ नेते किसनराव गडाख,शंकरराव लोखंडे,रामभाऊ खंडाळे,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,मुळा पाटबंधारे  विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील, शिवसेनेचे तालुका विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा, ज्ञानेश्वर  पेचे,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतापदादा चिंधे,जलमित्र व्याख्याते सुखदेव फुलारी,शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ.शोभाताई आलवणे, कान्हूअण्णा दाणे,अशोकराव मिसाळ,बापूसाहेब नजन,नामदेव खंडागळे,महायुतीचे सर्व नगरसेवक,भाजप शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक,शेतकरी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते


चौकट:-अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावावर जागा करून देणार-सुजय विखे पाटील
यावेळी बोलतांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की नगरपंचायतच्या निवडणूकीच्या वेळेला मी बोलल्याप्रमाणे दिलेला शब्द पाळणार असून लवकरच पुढच्या महिन्यात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या उपस्थितीत बैठक लावून सर्वांना विश्वासात घेऊन
जेवढे लोक अतिक्रमणधारक आहे त्या सर्वांना त्यांच्या नावे जागा करून देणार असल्याची ग्वाही सुजयदादविखे पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले
  

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

प्रवरानगर येथील जिल्हा सहकारी बँकेमध्ये सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध.

प्रवरानगर येथील जिल्हा सहकारी बँकेमध्ये सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध.


लोहगाव 
 राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सोनेतारण कर्ज सुविधा सुरू करण्यात आली .असल्याची माहिती .शाखा अधिकारी सौ अपेक्षा जोंधळे.यांनी दिली आहे.प्रति तोळा जास्तीत जास्त कर्ज व कमीत कमी व्याजदरात तसेच कमीत कमी कागदपत्रात खातेदारांना ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी एक टक्का व्याजात सुट देणार असल्याचे. त्यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकेत ही सुविधा सुरू झाली आहे .असे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले.  या योजनेमुळे शेतकरी व परीसरातील नागरिकांनी 
 चेअरमन चंद्रशेखर घुले, व्हा. चेअरमन माधवराव कानवडे. ‌संचालक  माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचे अभिनंदन केले.

शिर्डी : श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये 15 किलो वजनाची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया

शिर्डी : श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये 15 किलो वजनाची गाठ काढून यशस्वी शस्त्रक्रिया

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सुमारे 32 सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे 15 किलो वजनाची पोटातील गाठ रुग्णाच्या शरीरातून सुरक्षितपणे काढण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जळगाव येथील मायाबाई राठोड (वय 46) या गेल्या तीन वर्षांपासून पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्यांनी शिर्डी येथे उपचारासाठी धाव घेतली. जनरल सर्जन डॉ. रणजीत भोजने यांनी तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
डॉ. रणजीत भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ, बाळू डांगे या प्रशिक्षित वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली.
सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक तसेच उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य संमेलनात " जीवनदीप गाडगेबाबांचा " या कविता संग्रहाचे प्रकाशन:

राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य संमेलनात  " जीवनदीप गाडगेबाबांचा " या कविता संग्रहाचे प्रकाशन:

       28 वे राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन यावर्षी शिर्डी येथे संमेलनाध्यक्ष श्री. राजेंद्र फंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आचार्य सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी (पुणे) उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार मा. डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील घुणकी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर उपसंघटक मा. सौ. सुमन गजानन देसाई (मुंबई), डॉ. शिवाजी शिंदे, डॉ . प्रसाद बाविस्कर , प्राध्या. किसनराव कुऱ्हाडे, सौ. माया नवथर या उपस्थित राहतील.
                या संमेलनात विविध पुस्तकांचे प्रकाशन होणार असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष तथा डेबूजी प्रतिष्ठाणचे संस्थापक कवी राजेंद्र फंड यांचा  "गाडगेबाबा यांच्या  जीवनपट दर्शविणारा " जीवनदीप गाडगेबाबांचा" या  कवितासंग्रहाचे प्रकाशन भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय वरिष्ट उपाध्यक्ष श्री. एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र राज्य धोबी,परीट,वरठी सर्व भाषिक समाज महासंघचे संस्थापक अध्यक्ष श्री. देवरावजी सोनटक्के , 
ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव श्री. सुनील गोसावी , प्रसिद्ध कादंबरीकार श्री श्रीकांत पाटील यांचे हस्ते संपन्न होणार असून  या कविता संग्रहातील काही कवितेचे गायन राष्ट्रीय भारुडकर हमीद सय्यद हे करणार आहेत. 
                  या संमेलनाच्या आयोजनासाठी कवी सरकार , डेबूजी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. सुनील निकम, श्री. माधवराव देसाई, श्री. सुधाकर वाघ , श्री. अनिल देसाई, श्री. विलासराव रोकडे , सौ. राजश्री फंड हे नियोजन करत आहेत.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश; डॉ. सुजय विखे पाटलांची डॉ. कल्याणी आरणे यांच्या घरी सदिच्छा भेट

राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश; डॉ. सुजय विखे पाटलांची डॉ. कल्याणी आरणे यांच्या घरी सदिच्छा भेट

शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास मी तयार - डॉ. कल्याणी आरणे

शिर्डी 

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांनी स्थानिक राजकारणात एक सकारात्मक आणि घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत विरोधात उभ्या राहिलेल्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत संवाद आणि सहकार्याचा नवा संदेश दिला.

या भेटीत डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, राजकारण हे वैयक्तिक द्वेषासाठी नसून विकासासाठी असते. प्रचारादरम्यान डॉ. आरणे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा उल्लेख केला होता, याचा संदर्भ देत त्यांनी समविचारी व्यक्तींना पुन्हा एकत्र आणणे ही संघटनात्मक जबाबदारी असल्याचे नमूद केले. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक राजकारण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, सामान्य कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात आणि राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या प्रवासाचे त्यांनी कौतुक केले. समाजातील कष्टकरी घटकांमधून नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची ताकद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा अधिक मजबूत होत असल्याचा उल्लेखही यावेळी डॉ विखे यांनी केला.

डॉ. कल्याणी आरणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “दादा” अचानक घरी आल्याने आश्चर्य वाटले, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार पाहुण्याचे आदरातिथ्य करत त्यांनी जेवणाचा आग्रह केला. मोठ्या पदावर असूनही डॉ. विखे यांनी घरच्या साध्या जेवणाचा स्वीकार केल्याबद्दल त्यांनी त्यांच्या साधेपणाचे विशेष कौतुक केले.

या भेटीत केवळ औपचारिकता न राहता नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान समोर आलेले विकासाचे मुद्दे त्यांनी मांडले असून, ते मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकीय भूमिकेबाबत बोलताना डॉ. आरणे यांनी भारतीय जनता पक्ष हा विचारधारेवर चालणारा आणि संस्कृती जपणारा पक्ष असल्याचे सांगितले. शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भाजप एकच आहे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी भविष्यातील सहकार्याचे संकेत दिले.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

राहाता नगरपालिकेमध्ये नागरी सेवा दिन साजरा

राहाता 
 पोलादी पुरूष वल्लभाई पटेल यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागरी सेवेतील अधिका-यांना मार्गदर्शन केले. त्याची स्मृती कायम ठेवण्यासाठी नागरी सेवा दीन साजरा केला जातो. राहाता पालिकेतील मुख्याधिकारी आणि कर्मचा-यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पालिकेत नागरी सेवा दीनाचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन नगराध्यक्ष डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी केले.
या निमीत्ताने मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह विविध खाते प्रमुख व कर्मचा-यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष डाॅ.विजय सदाफळ, गटनेते मुन्ना शाह यांच्यासह पालिकेतील नगरसेवक यावेळी उपस्थीत होते. ़

डाॅ.गाडेकर म्हणाले,  पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय  विखे पाटील यांच्या सुचनेवरून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांनी जनतेची कामे तत्परतेने करावीत आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी असा हेतू या उपक्रमा मागे आहे.      बांधकाम सभापती अजय आग्रे, पाणीपुरवठा सभापती नितीन गाडेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती अर्चना निकाळे, महिला व बालकल्याण सभापती अनिता शेळके, गटनेते मुन्ना शाह, नगरसेवक राहुल सदाफळ, दशरथ तुपे, नगरसेविका सविता सदाफळ, ॲड. मयुर पाळंदे, प्रविण रुणवाल, अक्षय बोठे, विजय गिधाड,साहेबराव निधाने, मनिष चितळकर  आदि यावेळी उपस्थित होते 

नेवासा पोलीस* स्टेशनचे पाटील नियंत्रण कक्षात सायबरचे ढिकले पाटील नवे ठाणेदार*तडकाफडकी* *बदलीने जिल्हा पोलिस दलात खळबळ

नेवासा पोलीस* स्टेशनचे पाटील नियंत्रण कक्षात सायबरचे ढिकले पाटील नवे ठाणेदार
*तडकाफडकी* *बदलीने जिल्हा पोलिस दलात खळबळ 
नेवासा 
  दि २१ रोजी  नेवासा पोलीस ठाण्यात सायबर सेल येथे कार्यरत असणारे  पोलीस निरीक्षक सागर ढिकले पाटील यांनी चार्ज घेतला. नेवासाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे*

       सागर ढिकले हे नगर  सायबर सेल आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात सक्रिय अधिकारी आहेत. सागर ढिकले हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यांचा छडा लावण्यात माहीर आहेत. शनी शिंगणापूर मंदिर देणगी* *घोटाळ्याचाही तपास त्यांच्याकडे होता.ढिकले हे सायबर सेल येथे* *पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. सायबर* *सेलमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे
*महेश पाटील यांनी जामखेड सारखंच काम नेवासा* *पोलीस ठाण्यात सर्व समावेशक लोकाभिमुख कार्य केले. असून सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम केले. पाटील यांची तडकाफडकी बदलीने पोलीस दलात खळबळ उडाली असून नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन बदली स्थगिती करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे कळते*
*पाटील यांचे लोकप्रतिनिधीचे सुत जुळले होते परंतु येथील उद्योजकाला का नको होते महेश पाटील जवळपास तीन महिन्यांपासून पाटील यांची बदली व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते अशी चर्चा सुरू होती*

सोमवार, २० एप्रिल, २०२६

खोट्या गुन्ह्याचा विरोधात नेवासकर एकवटले ॲड,संजय सुखधान यांच्यावर दाखल कथित खोट्या गुन्ह्याविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार.

खोट्या गुन्ह्याचा विरोधात नेवासकर एकवटले ॲड,संजय सुखधान यांच्यावर दाखल कथित खोट्या गुन्ह्याविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार.
शहर  बंद ठेवत भव्य मोर्चा 
नेवासा
नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय सुखधान यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याविरोधात नेवाश्यात सर्वपक्षीयांनी एकत्र येत तीव्र आंदोलन दि.२० सोमवारी सकाळी ११ वा.छेडले. नगरपंचायतीच्या कथित अवैध कारभाराविरोधात सुखधान यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर खर्च दाखवलेल्या रकमेतील व प्रत्यक्ष कामातील तफावत उघड केल्याने सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांवर थेट आरोप करत कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधित घटना नेवासा बसस्थानक परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद असतानाही शहरातील कोणत्याही नागरिकाने ती पाहिली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, नेवासा पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ घटना घडल्याचा दावा असूनही पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही, तसेच घटना 13 एप्रिलची असताना फिर्याद 18 एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये का दाखल करण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या निषेधार्थ नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवत नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणातून या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला.
याप्रसंगी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव,उपनगराध्यक्षा सौ शालिनी संजय सुखधान,भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे,भाजप नगरसेवक निरंजन डहाळे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब पटारे,व्यापारी संघटनेचे कुणाल मांडण,युवा नेते गणेश चौगुले,शांताराम गायके,आरपीआयचे  संजय बनसोडे, नगरसेवक स्वप्नील मापारी,संतोष राजगिरे,येदुभाऊ सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नेवासा नगरपंचायत नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, महिला तरुण भर उन्हात मोठ्या संख्येने हजर होते.
उपनगराध्यक्षा सौ शालिनी संजय सुखधान या आंदोलनात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या.
मोर्चानंतर तहसीलदार डॉ. संजय बिरादार  पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर काढण्याचे आश्वासन दिले तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
दरम्यान, लवकरात लवकर संबंधित गुन्हा मागे घेऊन दोषींवर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
चौकट:-
13 एप्रिल रोजी सायंकाळी नेवासा पोलीस स्टेशनपासून जवळच गोळीबार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे
नेवासा पोलिसांना त्याची माहिती का मिळाली नाही? तसेच घटना नेवाशात घडल्याचे सांगितले असताना फिर्याद 5 दिवसांनी अहिल्यानगर येथे का दाखल करण्यात आली? या प्रश्नांमुळे प्रकरण अधिकच संशयास्पद ठरत आहे.

शिर्डीत २८ व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे संमेलाध्यक्षपदी साही . राजेंद्र फंड.

शिर्डीत २८ व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे संमेलाध्यक्षपदी साही . राजेंद्र फंड.


​शिर्डी 
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने, डेबूजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय, इंगळी (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथील हॉटेल जे.के. पॅलेस येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे.
​दिग्गजांची उपस्थिती आणि उद्घाटन:
या संमेलनाचे अध्यक्षपद श्री. राजेंद्र सुंदरदास फंड (राहता) भूषविणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून आचार्य सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी (पुणे) उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार मा. डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील घुणकी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर उपसंघटक मा. सौ. सुमन गजानन देसाई (मुंबई) उपस्थित राहतील.
​दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम:
संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता 'राष्ट्रसंत गाडगे महाराज कवी कट्टा' ने होईल. त्यानंतर दुसऱ्या सत्रात उद्घाटन सोहळा, प्रतिमा पूजन आणि पुस्तक प्रकाशन पार पडणार आहे. दुपारी कवी राजेंद्र फंड यांच्या  'जीवनदीप गाडगेबाबांचा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  श्री. एकनाथराव बोरसे, श्री. देवरावजी सोनटक्के संस्थापक अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य धोबी,परीट,वरठी सर्व भाषिक समाज महासंघ. श्री. सुनील गोसावी संस्थापक सचिव शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, व ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते होईल. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या निवडक गीतांचे 
सादरीकरण राष्ट्रीय भारुडकर हमीद सय्यद यांनी केले 

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

डॉ. सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द; ३ महिन्यात उभा राहणार बाबासाहेबांचा भव्य पुतळा!

डॉ. सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द; ३ महिन्यात उभा राहणार बाबासाहेबांचा भव्य पुतळा!

श्रीरामपूर - 
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्त्वाची ग्वाही दिली – "येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णआकृती पुतळा उभा करू," असा शब्द त्यांनी यावेळी दिला. 

त्याच बरोबर डॉ बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयावादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतुन समाचार घेतल. यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णआकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा," अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली.

 श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल, असे सांगताना ते म्हणाले, "हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. आमचा उद्देश स्वच्छ आहे – बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता आहे." पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणाऱ्याचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो. 

आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड,रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे ,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

मैत्रीची वीण गुंफत सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपने सर केले अनेक गडकिल्ले : हेमंत पाटील.

मैत्रीची वीण गुंफत सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपने सर केले अनेक गडकिल्ले :      हेमंत पाटील.

              माणसाला या धकाधकीच्या जीवनात काहीतरी विरंगुळा असावा. आणि तो चांगला आरोग्यदायी असावा. असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशाच भावनेतून राहाता येथील उद्योजक श्री. विनोद गाडेकर यांच्या संकल्पनेतून तयार झाला तो ग्रुप म्हणजे सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप. या ग्रुपचे सदस्य गावातील व्यापारी, तरुण मुले ,शासकीय अधिकारी,  कर्मचारी वय वर्षे 17 ते 70 वयोगटातील आणि कुठल्याही जातीजमातीचे बंधन नसलेले. उद्देश एकच दर महिन्यातून एक दिवस या सर्वांनी एक गड किल्ला सामुहिकपणे शिस्तीने जाऊन चढायचा. आणि याच भावनेतून राहाता शहरातील 30 ते 35 व्यक्ती यांनी आतापर्यंत 5 वर्षात 55 गड, किल्ले मोहिमा सर केल्या आहेत हे ऐकून आनंद वाटला असे उद्गार राहाता नायब तहसीलदार श्री. हेमंत पाटील यांनी काढले.
             सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याचबरोबर दुसरे प्रमुख मान्यवर राहाता नगरपालिकेचे नगरसेवक श्री. दशरथ तुपे म्हणाले की कुठल्याही गटातटाचे राजकारण न करता हा ग्रुप सकाळी एकत्र येऊन योगा करतो, ग्रुपने सर्व जण गड किल्ले चढाई मोहिमेस जातात. या ग्रुपच्या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे सह्याद्रीचे सामाजिक काम हे अतिशय चांगले आहे. यांच्यासोबत राहणारा माणूस कायम तंदुरुस्त रहात असेल अशा यांच्या ऍक्टिव्हिटी आहेत. 
            अहिल्यानगर जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्री. नितीनभाऊ कापसे म्हणाले की या ग्रूपमध्ये येऊन मी दररोज सकाळी योगा  व हास्यविनोद करत असल्याने माझी तब्येत आता ठीक झाली आहे. यांच्यासोबत गडकिल्ले मोहिमेत फिरल्याने मनाला आनंद मिळत आहे.
              गुड मॉर्निंग ग्रूपचे अध्यक्ष श्री. मोकळं सर म्हणाले की हा ग्रुप 20 वर्षाच्या तरुणापासून 70 वर्षांच्या   योग साधकाला तरुण व निरोगी करतात. समाज हित जोपसताना विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप,आरोग्य तपासण्या, आरोग्य साहित्य पुरविणे, गरजवंतांना आवश्यक मदत करत हा ग्रुप मोठा होत आहे. सगळ्या समूहाचा प्रतिनिधित्व करणारा हा शहरातील एक चांगला ग्रुप आहे. 
                   यावेळी श्री. सुनील लोंढे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन श्री. सुनील धाडगे , श्री. महेश गाडेकर, गणेश गाडेकर, केतन कुंभकर्ण, विजय पठाडे  श्री. हरीभाऊ गाडेकर, गंगाराम भुजबळ, सिराज शेख, विजय बनकर  श्री. गणेश गाडेकर, सुनील धाडगे, विजय पठाडे, केतन कुंभकर्ण यांनी केले. 
                 तर कार्यक्रमास उपस्थित गंगाराम भुजबळ, सिराज शेख, विजय बनकर ,श्री. नवनाथ बनकर,श्री. प्रकाश निधाने,श्री. अमोल गाडेकर, श्री. गोवर्धन गाडेकर, श्री. भानुदास सोनवणे, श्री. सचिन गाडेकर, हरीभाऊ गाडेकर,श्री. नंदू गाडेकर,श्री. सुधीर बोठे,श्री. बापूसाहेब गायकवाड,श्री. विजय बनकर,श्री. ज्ञानेश्वर नळे,श्री. सुनील काळोखे,श्री. सागर रोकडे,श्री. सिराज शेख,श्री. नितीन दिवटे,श्री. सागर भुजबळ,श्री. सागर घोगळ,श्री. विठ्ठल तांबे, श्री. केतन कुंभकर्ण,श्री. रविन्द्र ( दादा) कोळपकर,श्री. हृषिकेश गव्हाळे ,
श्री. गंगाराम भुजबळ, श्री. विक्रम देसाई, श्री. रविन्द्र शिवरकर,श्री. विजय पठाडे,श्री. तानाजी चुळभरे,शरद कुदळे,राहुल निधाने, दादासाहेब चौधरी हे उपस्थित होते. सूत्रसंचलन श्री. राजेंद्र फंड तर आभार प्रदर्शन श्री. विनोद गाडेकर यांनी केले.

शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न...

शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न...

अंधश्रद्धेविरोधी ठाम संदेश


शिर्डी 
– साईबाबांच्या पावन भूमीत आज शिर्डीत ‘नेबूला फिल्म’ निर्मित सालबर्डी या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्वी आयोजित या कार्यक्रमाला दिग्दर्शक, निर्माता तसेच चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, चित्रपटाचे निर्माता देवडे पाटील हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या आग्रहास्तव हा सोहळा शिर्डीत आयोजित करण्यात आला. सालबर्डी चित्रपटाची पार्श्वभूमी नेवासा तालुक्यातील चांदा येथे घडलेल्या बालहत्याकांडाशी संबंधित असून, समाजात वाढत चाललेल्या जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधात ठोस संदेश देणारा हा चित्रपट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि जादूटोणा यांसारख्या प्रवृत्ती थांबवण्यासाठी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी परमार्थावर आणि देवावर विश्वास ठेवावा, भोंदू बाबांच्या आहारी जाऊ नये,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच विखे पाटील परिवाराचा पाठिंबा राहिल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, शिर्डी परिसरात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे. चला हवा येऊ द्या आणि अजय-अतुल यांच्या कार्यक्रमांचे उदाहरण देत त्यांनी मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांनी सालबर्डी हा चित्रपट आवर्जून पाहावा, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन द्यावे आणि स्थानिक निर्मात्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी साईबाबांचे दर्शन घेऊन सालबर्डी चित्रपटाच्या टीमने पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला. यावेळी शिर्डी ग्रामस्थ व विखे पाटील परिवाराच्या वतीने दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...