सोमवार, २० एप्रिल, २०२६

खोट्या गुन्ह्याचा विरोधात नेवासकर एकवटले ॲड,संजय सुखधान यांच्यावर दाखल कथित खोट्या गुन्ह्याविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार.

खोट्या गुन्ह्याचा विरोधात नेवासकर एकवटले ॲड,संजय सुखधान यांच्यावर दाखल कथित खोट्या गुन्ह्याविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार.
शहर  बंद ठेवत भव्य मोर्चा 
नेवासा
नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय सुखधान यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याविरोधात नेवाश्यात सर्वपक्षीयांनी एकत्र येत तीव्र आंदोलन दि.२० सोमवारी सकाळी ११ वा.छेडले. नगरपंचायतीच्या कथित अवैध कारभाराविरोधात सुखधान यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर खर्च दाखवलेल्या रकमेतील व प्रत्यक्ष कामातील तफावत उघड केल्याने सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांवर थेट आरोप करत कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधित घटना नेवासा बसस्थानक परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद असतानाही शहरातील कोणत्याही नागरिकाने ती पाहिली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, नेवासा पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ घटना घडल्याचा दावा असूनही पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही, तसेच घटना 13 एप्रिलची असताना फिर्याद 18 एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये का दाखल करण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या निषेधार्थ नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवत नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणातून या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला.
याप्रसंगी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव,उपनगराध्यक्षा सौ शालिनी संजय सुखधान,भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे,भाजप नगरसेवक निरंजन डहाळे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब पटारे,व्यापारी संघटनेचे कुणाल मांडण,युवा नेते गणेश चौगुले,शांताराम गायके,आरपीआयचे  संजय बनसोडे, नगरसेवक स्वप्नील मापारी,संतोष राजगिरे,येदुभाऊ सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नेवासा नगरपंचायत नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, महिला तरुण भर उन्हात मोठ्या संख्येने हजर होते.
उपनगराध्यक्षा सौ शालिनी संजय सुखधान या आंदोलनात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या.
मोर्चानंतर तहसीलदार डॉ. संजय बिरादार  पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर काढण्याचे आश्वासन दिले तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
दरम्यान, लवकरात लवकर संबंधित गुन्हा मागे घेऊन दोषींवर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
चौकट:-
13 एप्रिल रोजी सायंकाळी नेवासा पोलीस स्टेशनपासून जवळच गोळीबार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे
नेवासा पोलिसांना त्याची माहिती का मिळाली नाही? तसेच घटना नेवाशात घडल्याचे सांगितले असताना फिर्याद 5 दिवसांनी अहिल्यानगर येथे का दाखल करण्यात आली? या प्रश्नांमुळे प्रकरण अधिकच संशयास्पद ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...