उन्हाळ्यामध्ये एकाच वेळी प्रवरा आणि निळवंडे कालवा वाहता झाला
राहाता
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे लाभक्षेत्रातील प्रत्येक गाव तळे पाण्याने भरतील यांची काळजी घेतली जाणार आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील लाभार्थ्यांना या पाण्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे.शेवटच्या घटकाला पाणी मिळेपर्यंत हे आवर्तन सुरू राहील.यासाठी कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केले.
निळवंडे लाभक्षेत्रातील तालुक्यातील लोणी खुर्द मधील बिरोबा लवण येथील तळ्याच्या जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारत घोगरे, सचिन आहेर, बंटी आहेर, रोहित जगधने, राहुल जगधने, बाबासाहेब राऊत, शशिकांत आहेर, जालिंदर मापारी, शरद आहेर, काळू राऊत आदींसह लाभ क्षेत्रातील व भागातील शेतकरी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले, उन्हाळ्यामध्ये एकाच वेळी प्रवरा आणि निळवंडे कालवा प्रथमच वाहता झाला. उन्हाळ्यामध्ये आज भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रातील लाभार्थ्यांना या पाण्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येकाला पाणी मिळणार आहे. शेवटच्या घटकाला पाणी मिळेपर्यंत हे आवर्तन सुरू राहील. पाण्याचा वापर जपून करा.आवर्तन काळात पाण्याचा अपव्य होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन मिळाल्याने शेतकऱ्यांचा आनंद आपल्यासाठी मोठा असल्याचेही डॉ. विखे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा