वाकडीच्या खंडोबा मंदिरात खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा उत्साहात साजरा
जय मल्हार"चा जयघोष, भंडाऱ्याची उधळण करीत देवाच्या मिरवणुकीत शेकडो भक्तांचा सहभाग
वाकडी
राहाता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिरात पौष पौर्णिमेला परंपरेनुसार खंडोबादेवाचा व म्हाळसादेवीचा विवाह सोहळा जय मल्हारच्या जयघोष्यात, पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
पौष पौर्णिमेला खंडोबादेवाचा व म्हाळसादेवीचा विवाह संपन्न झाला होता त्या परंपरेनुसार खंडोबा देवाचे मंदिर असलेल्या सर्व ठिकाणी हा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.
या भक्तिमय विवाह सोहळ्याच्या एक दिवस अगोदर वाकडी गावातील गोरक्षनाथ साबदे,हरिभाऊ जाधव,सावळेराम आहेर, ज्ञानेश्वर कोते या मल्हारी भक्तांसह मंदिरातील पुजारी संजय घोडके यांनी सपत्नीक वाकडी येथील खंडोबा मंदिरातील म्हाळसा देवीचे मुखवटे म्हाळसादेवीचे माहेर असलेल्या नेवासा येथील म्हाळसा मंदिरात नेऊन हळद लावून पूजा करून पुन्हा वाकडी येथील मंदिरात आणले.पौष पौर्णिमेला म्हणजेच 13 जानेवारी रोजी खंडोबा मंदिर पासून ते गावातील हनुमान मंदिर व पुन्हा खंडोबा मंदिर पर्यंत खंडोबा देवाच्या मुखवट्याची सजविलेल्या रथातून बँड पथक लावून, खंडोबाची गाणी वाजवत, पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत शेकडो मल्हारी भक्त वाघे मंडळी उपस्थित राहून देवाच्या रथासमोर नाचून खंडोबा देवाच्या विवाह सोहळ्याचा आनंद घेतला.
मिरवणूक झाल्यावर मंदिरासमोर खंडोबा देवाचा व म्हाळसा देवीचा विवाह सोहळा पवित्र मंगलास्टकमध्ये संपन्न झाला
या विवाह सोहळ्यादरम्यान गावातील महिलांनी विवाह सोहळा परिसर फुलांनी सजवीला होता.गावातील महिलांनी म्हाळसा देवीच्या व खंडोबा देवाच्या मुखवट्यांना साजशृंगार करून मंडूळ्या बांधून सजविले होते. विवाह सोहळा झाल्यावर रीतीरिवाज प्रमाणे जागरण गोंधळ कार्यक्रम देखील करण्यात आला. यावेळी गावातील संजय एलम, गोरक्षनाथ जाधव, विकास जाधव,ताराचंद लहारे, बबन पुंड आदी वाघे मंडळींनी जागरण गोंधळ कार्यक्रम सादर केला.
खंडोबादेवाच्या व म्हाळसादेवीच्या विवाह सोहळ्यास वाकडी गावातील व परिसरातील शेकडो महिला पुरुष लहान थोर भाविक उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यानंतर सर्व उपस्थित मल्हारी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. वाकडी येथील जय मल्हार आरती मंडळच्या संकल्पनेतून खंडेराय देवस्थान ट्रस्ट, रामनाथ कोते बाबा भक्त परिवार व वाकडी ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा