‘24 Hours Inside the Temple, Shirdi’ लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘Certificate of Merit’; शॉर्ट डॉक्युमेंटरी विभागात द्वितीय क्रमांक
शिर्डी :
श्री साईबाबांच्या शिकवणुकीस अनुसरून श्री साईबाबा संस्थानच्या विविध सेवाकार्याचा आढावा घेणाऱ्या तसेच भाविकांची श्रद्धा आणि मंदिरातील विविध घडामोडींचे प्रभावी चित्रण करणाऱ्या ‘24 Hours Inside the Temple, Shirdi’ या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जयपुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व आर्यण राज फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजीत Aryan International Children’s Film Festival – AICFF 2026 मध्ये या लघुपटाला ‘Certificate of Merit’ प्रदान करण्यात आले असून, Short Documentary या विभागात द्वितीय क्रमांकाचा (Top 2nd Film) सन्मान मिळाला आहे.
हर्ष पांड्या व शेखर झा यांनी तयार केलेल्या या लघुपटातून श्री साईबाबांच्या मंदिरातील चोवीस तासांत प्रशासनामार्फत केले जाणारे भक्ताभिमुख कार्ये, भाविकांची श्रद्धा, मंदिरातील धार्मिक विधी व परंपरा, संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेले विविध सेवाकार्य तसेच दिवसभरातील विविध क्षणांचे वास्तवदर्शी आणि प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. शिर्डीच्या आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले, “श्री साईबाबांच्या पवित्र मंदिरातील आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाचे तसेच संस्थानच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध सेवाकार्याचे प्रभावी चित्रण करणाऱ्या ‘24 Hours Inside the Temple, Shirdi’ या लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला सन्मान ही श्री साईबाबा संस्थान व शिर्डीसाठी अभिमानाची बाब आहे. शिर्डीतील साईभक्ती, मंदिराची परंपरा आणि येथील वैशिष्ट्यपूर्ण वातावरण चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.” यावेळी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे श्री साईबाबा संस्थानचे वतीने अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा