४० वर्षांचे ओझे उतरले… आता गळा मोकळा आणि श्वासही मोकळा!
शिर्डी :
तब्बल ४० वर्षे गळ्यातील प्रचंड वाढलेली गाठ घेऊन जीवन जगणाऱ्या ७० वर्षीय आजीची जवळपास ७०० ग्रॅम वजनाची आणि तब्बल २० सेंटीमीटर आकाराची महाकाय थायरॉईड ग्रंथी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे काढण्यात आली. ही अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. अजिंक्य बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १२/०८/२०२६ रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी येथे पार पडली.
रुग्ण गेल्या जवळपास ४० वर्षांपासून गळ्यातील या प्रचंड गाठीमुळे त्रस्त होती. कालांतराने ही गाठ एवढी मोठी झाली की तिने गळ्याचा बहुतांश भाग व्यापला होता. अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेबाबत तिला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. वाढते वय, गाठीचा प्रचंड आकार आणि श्वासनलिकेशी असलेला जवळचा संबंध यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.
तपासणीमध्ये दोन्ही बाजूंच्या थायरॉईड ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असून त्यामध्ये अनेक गाठी व कॅल्सिफिकेशन दिसून आले. महाकाय ग्रंथीने श्वासनलिकेला पूर्णपणे वेढले होते आणि श्वासनलिकेवर दोन्ही बाजूंनी दाब निर्माण झाला होता.
अशा परिस्थितीत डॉ. अजिंक्य बापूसाहेब पानगव्हाणे यांनी हे आव्हान स्वीकारत शस्त्रक्रियेचे योग्य नियोजन केले. अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने जवळपास २० × १० सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे ७०० ग्रॅम वजनाची महाकाय थायरॉईड ग्रंथी ३ ते ४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे काढण्यात आली.
या आव्हानात्मक शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून तिचा आवाज टिकून आहे. श्वासोच्छवास व्यवस्थित असून ती पुढील उपचार घेत आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेमागे जनरल सर्जरी ऑपरेशन थिएटरच्या संपूर्ण टीमचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. नर्सिंग ऑफिसर सुनीता एरंडे सिस्टर, जयश्री चोळके सिस्टर, ओटी टेक्निशियन बाळासाहेब डांगे आणि गौतम मोकळ यांनी शस्त्रक्रियेच्या काळात मोलाची भूमिका बजावली.तसेच रुग्णाच्या उपचार प्रक्रियेत आणि आवश्यक समन्वयामध्ये सोशल वर्कर नागपूरे मॅडम ,गाडेकर मॅडम यांचेमहत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा प्र से ) वैद्यकीय संचालक प्रीतम वडगावे यांनी जनरल ओटी टीमचे अभिनंदन केले आहे
४० वर्षांपासून गळ्यातील एवढी मोठी गाठ घेऊन जगणाऱ्या या महिलेच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रियेनंतर दिसलेला आनंद हा डॉ. अजिंक्य पानगव्हाणे, डॉ. संतोष सुरवसे आणि संपूर्ण वैद्यकीय टीमसाठी अत्यंत समाधानाचा क्षण ठरला.
ही केवळ एका मोठ्या गाठीची शस्त्रक्रिया नव्हती;
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा