महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल
नेवासा (तालुका प्रतिनिधी):-
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावून महिलेवर अत्याचार करणे, तिच्यावर चाकूने वार करून जबर जखमी करणे आणि सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या नराधम आरोपीला नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. माननीय जिल्हा व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी आरोपी बाबासाहेब किसन क्षीरसागर (वय ४५, मूळ रा. राहाटणी फाटा, (ता. हवेली) जि. पुणे, सध्या रा. धामणगाव, ता. जामखेड) याला आयपीसी (IPC) कलम ३०७ अन्वये ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यातील २८ वर्षीय पीडित महिला (फिर्यादी) आणि आरोपी बाबासाहेब क्षीरसागर हे दोघे एकत्र जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत असल्याने त्यांची ओळख होती. २४ जून २०२४ रोजी सकाळी, फिर्यादी तिच्या आई-वडिलांच्या घरी फत्तेपूर येथे असताना आरोपीने तिला फोन केला. कुकाणा व वडाळा येथे जागरण गोंधळाचे कार्यक्रम आहेत, तू लवकर ये, मी फत्तेपूर बस स्टॉपवर थांबलो आहे.असे त्याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी बस स्टॉपवर आली. तेथून आरोपीने तिला घोडेगाव रस्त्याने पायी चालत फिरण्याच्या बहाण्याने नेले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाजवळील कठड्यावर दोघे बसले असताना, आरोपीने फिर्यादीच्या खांद्यावर हात ठेवला. फिर्यादीने त्याचा हात झटकून तीव्र विरोध केला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने ओढत नेऊन रस्त्याशेजारील शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने प्रतिकार केला असता, आरोपीने चाकूची भीती दाखवून तिच्या मानेवर वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच तिच्या शरीरावर इतरही जखमा केल्या. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून,कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल केले. ती शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांसमोर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यावरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६७/२०२४, भादवि (IPC) कलम ३७६, ३२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी तपासाचे चक्र तातडीने फिरवत आरोपीला अटक केली. पीडिता व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवून सबळ पुराव्यांसह नेवासा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. मा. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित महिला, वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि तपास अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला आयपीसी कलम ३०७ खाली दोषी ठरवत ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास शनिशिंगणापूर तत्कालीन पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांनी व पोलीस पथक ASI माळवे, ASI कारखेले, HC मोकाटे, घोडके, लबडे, , PC ठुबे, हिवाळे, पोंधे झिने, LPC गर्जे व गोरे यांनी कामकाज केले असून या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विष्णुदास के. भोर्डे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना महिला पोलीस कर्मचारी स्वाती तडूलकर यांनी न्यायालयात मोलाचे सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा