28 वे राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन शिर्डी यांचे विविध पुरस्कार जाहीर:
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून डेबूजी प्रतिष्ठाण व कवी सरकार इंगळी यांच्या वतीने शिर्डी येथे हॉटेल जे. के. पॅलेस येथे रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी 28 वे राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून या संमेलनात उद्घाटन समारोह, कथाकथन, दोन कविसंमेलने व गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन व त्यांचे माय स्टँप अंतर्गत टपाल तिकीट काढून सन्मान करण्यात येणार आहे.
समाजातील गुणवंत व वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. यात धुळे येथील परीट धोबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा शिंदे, श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजेंद्र देसाई, अचलपूर जिल्हा अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अमृतकर यांना राष्ट्रीय राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. तर साहित्यामध्ये ज्यांनी आपल्या साहित्याचा ठसा समाज मनावर उमटवला आहे. असे शिरपूर येथील माजी प्राचार्या डॉ. रजनी लुंगसे यांच्या गाडगेबाबा यांच्या जीवनावर पीएचडी प्राप्त केल्याबद्दल, पंढरपूर येथील कृषी ,पशुपालन व गाडगेबाबा यांच्या साहित्याचे साहित्यिक डॉ. उद्धव रसाळे यांना राष्ट्रीय राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्यरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
तर ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेतकरी, कामगार व जनतेसाठी आतापर्यंत सहा भारतीय पेटंट मिळवले आहेत. असे चांदवड येथील कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. प्रसाद बाविस्कर यांना राष्ट्रीय राष्ट्रसंत गाडगेबाबा शिक्षकरत्न पुरस्कार तर ज्यांचे कृषी तंत्रज्ञानावर आधारित , शेतकरी वर्गाच्या पसंतीचे दणकट शेतीअवजारे बनविणारे पाथरे येथील श्री. विलास रोकडे यांना उद्योगरत्न पुरस्कार तर महात्मा गांधीजींच्या आवाहनाप्रमाणे खेड्याकडे चला म्हणून खेडे समृद्ध बनविण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे ग्रामसेवकांचे माजी राज्याध्यक्ष श्री. एकनाथरावजी ढाकणे यांना राष्ट्रीय राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामसेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अशी माहिती या संमेलनाचे आयोजक श्री. सुनील निकम, श्री. राजेंद्र फंड, श्री. माधवराव देसाई, श्री. सुधाकर वाघ, श्री. अनिल देसाई व सौ. राजश्री फंड व कवी सरकार इंगळी यांनी दिली आहे. पुरस्कारार्थी यांचे समाजातील विविध मान्यवर व नागरिकांच्या वतीने अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा