घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा -
- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची कार्यालयात भेट घेऊन जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिमपणे निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करण्याची मागणी केली, याची गंभीर दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयानी तात्काळ माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून माहिती मागवली आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात.
शिवसेना नेते तथा अध्यक्ष खा.अनिल भाऊ देसाई आणि सरचिटणीस विजय मालणकर यांच्या सुचनेवरून शिर्डी येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कांही ग्राहकांच्या लेखी तक्रारी आल्याने त्याची दखल घेत सर्वं पदाधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांची तात्काळ भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, एका बाजूला राज्यकर्ते सांगतात की भारत देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे आणि वास्तविकतेत आपण साधा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेवर करू शकत नाही, हे भीषण सत्य आहे. यातच शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असून आपल्या जिल्ह्यातील गॅस वितरणामध्ये मोठा काळाबाजार सुरु असल्याचे आमच्याकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट जाणवते आहे. अनेक गॅस एजन्सी कृत्रीम तुटवडा भासवून ऑनलाईन बुकिंग बंद करणे, बुकिंग नसेल तर वाढीव पैसे आकारणे, घरगुती गॅस वाढीव दराने व्यावसायिकांना देणे असे प्रकार सुरु आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आमच्या जवळच्या कार्यालयात अथवा संबंधित शाखा संघटक यांच्याशी संपर्क साधून लेखी तक्रार देणेबाबत आवाहन करत सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सतत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले यांनी शासनाच्या परिपत्रकाची माहिती देत कायदेशीर मार्गाने प्रत्येक ग्राहकाला न्याय मागण्याचा अधिकार असून चुकीचा प्रकार दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, जिल्हा कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जावळे, तालुका संघटक रिंकेश जाधव, उपतालुका संघटक श्रीराम कदम, कक्ष शहर संघटक रवि सोनवणे, कक्ष उपशहर संघटक हृषीकेश भोळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा