गुरुवार, १९ मार्च, २०२६

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील 

दाढ बुद्रुक 
आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची मर्यादित परंपरा नसून सर्व धर्मांना एकत्र आणणारा उत्सव आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. दाढ बुद्रुक येथे आदन मदन बाबा यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना त्यांनी सामाजिक सलोखा, संयम आणि एकात्मतेचा संदेश दिला.

अनेक वर्षे खंडित झालेली ही यात्रा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पुन्हा सुरू झाली असून यंदा तिचे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि परस्पर सहकार्यामुळे यात्रा अत्यंत शांततेत व भव्य स्वरूपात पार पडली होती. त्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले.

यावेळी प्रवरा उद्योग समूहाचे पदाधिकारी, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, यात्रा उत्सव समितीचे सदस्य तसेच सर्व समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विखे परिवाराच्या वतीनेही या तीन दिवसांमध्ये कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रवरा परिसराची ओळख ही सर्व धर्मीय एकात्मतेची आहे. येथे धर्माच्या नावावर भेदभाव कधीच होऊ दिला जाणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचे सण-उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासोबत इतरांच्या भावनांचा आदर राखणे तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, माफी करणारा माणूस हा चूक करणाऱ्यापेक्षा मोठा असतो. त्यामुळे यात्रेदरम्यान संयम राखून, शांतता टिकवून ही परंपरा अधिक भक्कम करावी, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.

यात्रेच्या निमित्ताने गावाच्या विकासासंदर्भातही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आदन मदन बाबा प्रांगणात नियोजनबद्ध पद्धतीने नवीन वास्तू उभारण्याचा मानस व्यक्त करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी, स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे व संरक्षक भिंत उभारणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पुढील वर्षी अधिक सुसज्ज आणि नियोजनबद्ध स्वरूपात यात्रा साजरी करण्याचा आपला संकल्प आहे,असेही त्यांनी सांगितले.

शेवटी, आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. ही एकात्मता अबाधित ठेवणे हीच आदन मदन बाबा यात्रेची खरी परंपरा आहे,असे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना एकतेचा संदेश दिला.

बुधवार, १८ मार्च, २०२६

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.*

*रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.*

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.


राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह  कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता  रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, १७ मार्च, २०२६

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा - - शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा - 
- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या  प्रमुख पदाधिकारी यांनी आज नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची कार्यालयात भेट घेऊन जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिमपणे निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करण्याची मागणी केली, याची गंभीर दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयानी तात्काळ माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून माहिती मागवली आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात.
शिवसेना नेते तथा अध्यक्ष खा.अनिल भाऊ देसाई आणि सरचिटणीस विजय मालणकर यांच्या सुचनेवरून शिर्डी येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कांही ग्राहकांच्या लेखी तक्रारी आल्याने त्याची दखल घेत सर्वं पदाधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांची तात्काळ भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, एका बाजूला राज्यकर्ते सांगतात की भारत देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे आणि वास्तविकतेत आपण साधा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेवर करू शकत नाही, हे भीषण सत्य आहे. यातच शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असून आपल्या जिल्ह्यातील गॅस वितरणामध्ये मोठा काळाबाजार सुरु असल्याचे आमच्याकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट जाणवते आहे. अनेक गॅस एजन्सी कृत्रीम तुटवडा भासवून ऑनलाईन बुकिंग बंद करणे, बुकिंग नसेल तर वाढीव पैसे आकारणे, घरगुती गॅस वाढीव दराने व्यावसायिकांना देणे असे प्रकार सुरु आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आमच्या जवळच्या कार्यालयात अथवा संबंधित शाखा संघटक यांच्याशी संपर्क साधून लेखी तक्रार देणेबाबत आवाहन करत सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सतत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले यांनी शासनाच्या परिपत्रकाची माहिती देत कायदेशीर मार्गाने प्रत्येक ग्राहकाला न्याय मागण्याचा अधिकार असून चुकीचा प्रकार दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. 

यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, जिल्हा कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जावळे, तालुका संघटक रिंकेश जाधव, उपतालुका संघटक श्रीराम कदम, कक्ष शहर संघटक रवि सोनवणे, कक्ष उपशहर संघटक हृषीकेश भोळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

डॉक्टर च्या रुपाने साक्षात देवच आले मदतीला

आज आम्ही पुणे येथून येवला येथे लग्नासाठी शिर्डी मार्गे जात असताना कवठे कमलेश्वर जवळ एका वळणावर आमची गाडी घसरून नाल्यात कोसळली. त्या वेळी आम्ही पती-पत्नी दोघेही गाडीत अडकून पडलो होतो आणि परिस्थिती अत्यंत धोकादायक होती.

अशा वेळी डॉ. योगेश गेठे यांनी देवदूतासारखे येऊन स्वतःची गाडी थांबवली आणि तात्काळ आमच्या मदतीला धावून आले. त्यांनी आम्हाला गाडीतून सुरक्षित बाहेर काढले, आमची विचारपूस केली तसेच आमचे प्राथमिक उपचार (First Aid) देखील केले.

याशिवाय त्यांनी क्रेन सर्व्हिसची व्यवस्था केली, इन्शुरन्स क्लेम प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले आणि संबंधित लोकांचे संपर्क (contacts) देखील आमच्याशी शेअर केले. संपूर्ण प्रसंगात त्यांनी अतिशय शांतपणे, निस्वार्थ भावनेने आणि माणुसकी जपत आम्हाला सर्वतोपरी मदत केली.

यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीत बसवून शिर्डी बसस्टँडपर्यंत सुरक्षित सोडले. इतकेच नव्हे तर आमच्यासाठी चहा-नाश्त्याचीही व्यवस्था करून आमची मनापासून काळजी घेतली.

नंतर आम्हाला समजले की डॉ. योगेश गेठे हे शिर्डी संस्थानमध्ये ENT स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेली ही निस्वार्थ मदत, दाखवलेली माणुसकी आणि सेवाभाव आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.

आजच्या काळात अशी निस्वार्थ सेवा आणि माणुसकी दुर्मिळ झाली आहे. शिर्डी संस्थानमध्ये अशा सेवाभावी आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती कार्यरत आहेत, याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. आपल्या संस्थान मध्ये अशा व्यक्ती कार्यरत आहेत ही खरोखरच संस्थानची प्रतिष्ठा वाढवणारी बाब आहे

सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड:

सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड:
   
                   मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे गांव  असणाऱ्या तरवडी येथे घेण्यात येणाऱ्या सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड झाल्याची घोषणा या संमेलनाचे अध्यक्ष साही. सायमन भारस्कर यांनी केली आहे. 
              साही. राजेंद्र फंड  हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या 15 वर्षापासून  ते " ग्रामसेवा संदेश " हा दिवाळी अंक प्रकाशित करतात. महाराष्ट्रभर त्यांचा दिवाळी अंकामुळे खूप मोठा  साहित्यिक परिवार आहे.  यांची या वर्षात महाराष्ट्रातील पुणे , कोल्हापूर, सातारा, भंडारा, वडाळा, निमगाव वाघा , श्रीरामपूर, दाभे मोहन, शिर्डी, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात व  ठिकाणी 4 वेळा संमेलनाध्यक्ष, एक वेळा स्वागताध्यक्ष, 4 वेळा कविसंमेलनाध्यक्ष, एक वेळा विशेष अतिथी, एक वेळा पुस्तक प्रकाशन समारोह अध्यक्ष, 14 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजक सदस्य होते. 
               संमेलनाचे अध्यक्षपदी कवी,गितकार बाबासाहेब पवार हे असुन उदघाटक ॲड.देसाई देशमुख.(व्हा.चे.ज्ञा.स.सा.का.) असणार आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सो., आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आदर्श ग्रा.पं.सौंदाळाचे सरपंच  शरद पा.अरगडे, , ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत, आला बाबुराव फेम सुरेश कांबळे,  वरिष्ठ पत्रकार डॉ.शाम जाधव नाशिक.अब्दुल भय्या शेख.आदी उपस्थित राहणार आहेत.
               या एकदिवसीय साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद,कवी संमेलन व पुरस्कार वितरण समारोह आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            साही. राजेंद्र फंड यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव साही. सुनील गोसावी, राज्य संघटक प्राध्या. डॉ. अशोक कानडे, शर्मिला गोसावी, राहाता शाखेचे कवयत्री वैष्णवी निर्मळ , सुमेध ब्राम्हणे, नरेंद्र पवार, शब्दगंध नेवासा शाखेचे दिगंबर गोंधळी, कोपरगांव शाखेचे   ऐश्वर्याताई सातभाई, , प्राध्या. संजय दवंगे, पत्रकार हेमचंद्र भवर,  विष्णू तांबे, प्राध्या. संजय दरवडे, मेजर रामचंद्र पाठक, कवी संदीप नांगरे, रज्जाक शेख, मच्छिंद्र जाधव, बाळकिसन धूत,  पत्रकार सुधीर चव्हाण,  लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट तथा सह्याद्री ट्रेकिंग ग्रूपचे अध्यक्ष ला. विनोद गाडेकर व सर्व टीम, झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे, बाळासाहेब कचरे, लक्ष्मण कचरे, अंबादास कचरे, बाजीराव कचरे, आप्पासाहेब कावरे, रामकृष्ण गरड, राजेंद्र राऊत , शकूर इनामदार आदींनी अभिनंदन केले आहे.

गुरुवार, १२ मार्च, २०२६

महागाई व गॅस दरवाढीविरोधात राहाता तहसीलवर महाविकास आघाडीचा एल्गार

महागाई व गॅस दरवाढीविरोधात राहाता तहसीलवर महाविकास आघाडीचा एल्गार

राहाता  
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढत्या महागाईचा व गॅस दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी, कामगार तसेच महिला वर्गावर या महागाईचा मोठा आर्थिक बोजा पडत असून केंद्र सरकारने यावर तात्काळ नियंत्रण आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे घरगुती अर्थकारण कोलमडल्याचे नमूद करण्यात आले. तसेच गॅस ऑनलाइन बुकिंग करताना ओटीपी वेळेत न मिळणे, बुकिंग प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येणे तसेच बुकिंग करूनही गॅस वेळेत उपलब्ध न होणे अशा समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे जनतेवर अन्याय होत असून सरकारने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, सचिन चौगुले, शशिकांत लोळगे, उत्तमराव घोरपडे, सौ. नीलम ताई सोळंकी, रणजीत बोठे, गणेश सोमवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात सुधीर म्हस्के, अनिल बोठे, उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, राजेंद्र अग्रवाल, पुंडलिक बावके, अमोल गायके,सदाशिव गाडेकर, मुन्ना फिटर, जयसिंग सातव,शिवप्रसाद आहेर सह महिला प्रतिनिधी लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्या सौ.आशाताई आहेर, सौ. सुनिताताई कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, ११ मार्च, २०२६

आचार्य आनंद ऋषीजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

आचार्य आनंद ऋषीजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

 लोणी 
पिंपरी चिंचवड,येथील आचार्य आनंद ऋषीजी माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच हॉटेल कृष्णा पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने या सोहळ्यात जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मणी नारायण अय्यर मॅडम यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या मंगल प्रसंगी शाळेचे जुने शिक्षक आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या शीर्षक गीताचे सुप्रसिद्ध गायक संदीप उबाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. उबाळे सरांनी आपल्या सुमधुर आवाजात काही लोकप्रिय गाणी सादर करून या दुपारच्या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मंत्रमुग्ध झाले, ज्यामुळे या स्नेहमेळाव्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

कार्यक्रमास शाळेच्या प्रगतीचे आधारस्तंभ असलेले शालेय समितीचे पदाधिकारी अशोक पागारिया, नयन भंडारी, किरण भंडारी, अनिल कटारिया आणि कल्पेश पागारिया प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आणि आयुष्यात शाळेने दिलेले संस्कार सदैव जपावेत, असा मोलाचा संदेश दिला. मुख्याध्यापिका रुक्मणी नारायण अय्यर मॅडम यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत या सोहळ्याचे यशस्वी नेतृत्व केले.

मुख्याध्यापिका रुक्मणी नारायण अय्यर मॅडम यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. सात वर्षांच्या कालखंडातील विद्यार्थी एकाच छताखाली आल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपल्या लाडक्या शिक्षकांशी संवाद साधताना अनेक विद्यार्थी भावूक झाले होते, तर काही जण आपल्या प्रगतीचा अहवाल देताना उत्साहात दिसत होते.
हॉटेल कृष्णा पॅलेसचा परिसर या मेळाव्यामुळे आनंदाने न्हाऊन निघाला होता. सकाळपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात गप्पा-गोष्टी, अनुभव कथन आणि शालेय जीवनातील मजेच्या आठवणींनी रंगत आणली. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधून आपल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट केले. शालेय जीवनानंतरचा हा मेळावा सर्वांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला.

कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली आणि लवकरच पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थी प्रतिनिधींनी आणि कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे शाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि मैत्रीचा ओलावा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

मंगळवार, १० मार्च, २०२६

साई संस्थान कामगारांचा वनवास संपला; सेवा प्रवेश नियम व आश्वासित प्रगती योजना अखेर मार्गी!तदर्थ समिती अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे यांचा एम्प्लॉईज सोसायटीतर्फे विशेष सत्कार

साई संस्थान कामगारांचा वनवास संपला; सेवा प्रवेश नियम व आश्वासित प्रगती योजना अखेर मार्गी!

तदर्थ समिती अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे यांचा एम्प्लॉईज सोसायटीतर्फे विशेष सत्कार

नगर 
श्री साईबाबा संस्थानमधील कामगारांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवा प्रवेश नियम, तसेच १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संस्थानच्या कामगारांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानच्या कामगारांचे सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या विशेष प्रयत्नांना यश आले असून, कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
तसेच, प्रशासकीय पातळीवर हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा अहमदनगरच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने श्रीमती अंजू शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याबद्दल श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी मनस्वी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या सत्कार प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. संदिपकुमार भोसले, सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक रामजी गागरे आणि अनिल थोरात, यांच्यासह इतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.

सोमवार, ९ मार्च, २०२६

जागतिक महिला दिनानिमित प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे महिला डॉक्टर. नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला

जागतिक महिला दिनानिमित प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे महिला डॉक्टर. नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष ॲड संतोष घोडके, लायन्स क्लब चे उपाध्यक्ष लायन डॉ संजय गायकवाड, मा. अध्यक्ष लायन इंजि प्रकाश सदाफळ, लायन अंजली उबाळे, सहसचिव लायन सरला तायडे,रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भगत मॅडम, तालुका पर्यवेक्षक श्री. संदीप भिंगारदिवे ,सर्व नर्सिंग स्टाफ. उपस्थिती 
झोन चेअरमन डॉ संजय उबाळे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित महिलाना जागतिक महिला दिनानिमित मार्गदर्शन केले,क्लब मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र डोऱ्हाळे येथे खोकल्याचे औषध ., व मेडिसिन दिले .
या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भगत मॅडम यांनी सर्वांचे आभार  मानले.व लायन्स क्लब ने आमच्या कामाची दखल घेऊन महिला दिनानिमित सत्कार केला त्याबद्दल आभार मानून उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले,उपाध्यक्ष डॉ संजय गायकवाड, अध्यक्ष ॲड संतोष घोडके,यांनी महिला दिनानिमित आपले विचार मांडले.
या प्रसंगी अश्विनी गायकवाड,सुनीता चव्हाण,वर्षाराणी रोकडे,रेखा महानुर ,स्वाती क्षीरसागर,स्वाती गरगडे,सुरेख शिंदे,वैशाली नेमाडे, संगीता विधाते,सोनाली सोनवणे,कल्याणी दिवे,प्रतिभा संसारे, भाग्यश्री मोरेवार, व सर्व स्टाफ उपस्थितीत होते 
लायन सरला तायडे यांनी आभार मानले

रविवार, ८ मार्च, २०२६

महिलांसाठी ग्रामपंचायत पानेगांव प्रभावी योजनेची अंमलबजावणी करणार - सरपंच भोसले

महिलांसाठी ग्रामपंचायत पानेगांव प्रभावी योजनेची अंमलबजावणी करणार -
 सरपंच भोसले 

पानेगांव 
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विविध विषयांवर मंथन तसेच शासन स्तरावरून येणाऱ्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावातील प्रत्येक महिलेला सोबत घेणार असल्याचे पानेगांव (ता. नेवासे) ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले/आंबेकर शासन स्तरावरून विशेष आयोजित केलेल्या ग्रामसभेत 
अध्यक्षस्थानावरून बोलतं होत्या.
 सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन वंदन करण्यात आले. वरिष्ठ महिला मार्गदर्शनपर मोलाचा सहभाग घेऊन माहिती दिली तसेच सरपंच भोसले यांनी ग्रामपंचायत मार्फत महिलांसाठी विविध स्वरूपाच्या योजना माहिती देण्यात आली. उपसरपंच सुरेश जंगले यांनी सामूहिक विवाह सोहळा साठी ग्रामपंचायत विशेष तरतूद करणार असून गावातील इच्छुकांनी ग्रामपंचायतकडे मागणी करावी असे आवाहन करण्यात आले
 ग्रामविकासअधिकारी गणेश पाखरे यांनी महिला संदर्भात असणाऱ्या संपूर्ण कायद्याची माहिती व मार्गदर्शन केले तसेच विविध अडचणी समजून घेतल्या व सांगितले
विषय पत्रिका बालविवाह कायदा२००६ मार्गदर्शन 
 हुंडा प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन 
 कौटुंबिक हिंसाचार महिला चे संरक्षण कायदा २००५ महिला शासकीय योजना लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा बॉक्स कायदा विशाखा मार्गदर्शन तत्त्वे कायदा घरगुती हिंजेदार प्रतिबंध कायदा २००५ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

विधानपरिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ना श्री राम शिंदे साहेब यांनी श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले

मा. ना. श्री. राम शिंदे, विधानपरिषद अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्‍कार केला.

केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री रामदास आठवले साहेब यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले

मा. ना. श्री. रामदास आठवले, केंद्रीय राज्‍य मंत्री, सामाजिक न्‍याय तथा सशक्‍तीकरण, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांनी त्यांचा सत्‍कार केला.

शनिवार, ७ मार्च, २०२६

पायाभूत विकासा बरोबर रस्ते, रेल्वे, संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्राचा प्रश्न संसदेत मांडणार खासदार वाकचौरे

पायाभूत विकासा बरोबर रस्ते, रेल्वे, संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्राचा प्रश्न संसदेत मांडणार  
खासदार वाकचौरे

नेवासा 
 नेवासा तालुक्यातुन अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्ग व रेल्वे,अंतर्गत रस्ते बरोबरच जगाला ज्ञानाचा
संदेश देणारा व अखंड विश्वात असलेल्या वारकरी संप्रदायाला पूजनीय असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झालेल्या नेवासे भूमीत केंद्र सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास करिता आवश्यक बाबी मिळाव्यात याकरिता संसदेत लवकरच प्रश्न उपस्थित करून संबंधित मंत्री व विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
नेवासे येथील पत्रकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) जिल्हा समन्वयक मुकुंद शिनगर, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब तनपुरे, 
तालुका उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण, नितीन जगताप आदी उपस्थित होते.
वाकचौरे म्हणाले, सध्या लोकसभेत विरोधी बाकावर असलो तरी आतापर्यंत संसदेत ११८ प्रश्न मांडलेले आहे. मतदार संघातील रस्ते, रेल्वेमार्ग व दळणवळण प्रश्न सुटला की सर्वांचा आर्थिकस्तर आपोआप उंचावत असल्याने या प्रश्नासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. साईंबाबांचा आशिर्वाद आणि जनतेचं आसणारे प्रेम त्यामुळे दिल्ली दरबारी अधिकाऱ्यांकडून काम मार्गी लागत असतात.माझी ओळख "आपला माणूस आपल्यासाठी" झाली असल्याने हा शब्दप्रयोग नंतर इतरही आमदार, खासदार व इतर पदाधिकारी जोडून त्या त्या मतदार संघात काम करीत आहेत. ओळख निर्माण करून देणाऱ्या नेवासे तालुक्यास कधीच विसरणार नाही.  असे वाकचौरे यांनी सांगून पत्रकार भवनासाठी लवकरच निधीची तरतूद करुन मतदार संघातील पत्रकारांसाठी संसद अभ्यास दौरा आयोजन करण्यात येणार असल्याचे खासदार वाकचौरे यांनी सांगितले. 
यावेळी नेवासे प्रेस क्लबचे उपाध्यक्ष कैलास शिंदे,सचिव सुहास पठाडे नेवासे तालुका एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर, जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले,बन्सी एडके, चंद्रकांत दरंदले, अशोक डहाळे ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकरराव नाबदे, सतिश उदावंत,सुनिल पंडीत,मोहन गायकवाड,बाळकृष्ण पुरोहित,राजेंद्र वाघमारे,अशोक तुवर रमेश शिंदे,दिलीप शिंदे, गणेश बेल्हेकर, संतोष टेमक,अशोक पेहरकर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, युसूफ पठाण,मोहन शेगर, रविंद्र शेटे रमेश पाडळे, विठ्ठल उदावंत,आदीं पत्रकार उपस्थित होते.
प्रस्ताविक सुधिर चव्हाण यांनी केले सुत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे आभार नेवासे एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी मानले.

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

संत तुकाराम महाराज बीज निमित्त साडी वस्त्रदान वाटप

संत तुकाराम महाराज बीज निमित्त  साडी वस्त्रदान वाटप
राहता येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीज निमित्त  गुरुवार दि.५/३/२०२६ रोजी सालाबाद प्रमाणे ह.भ.प.  जगन्नाथ महाराज चौधरी यांच्या वतीने साडी वस्त्रदान करण्यात आले .  यावेळी
 मुकुंदराव दादासाहेब सदाफळ 
माजी चेअरमन , गणेश सहकारी साखर कारखाना .
गणेश नगर 
राजेंद्र राधुजी निकाळे
राजेंद्र धुमसे 
संचालक , कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता 
दादासाहेब गंगाधर बोठे 
चेअरमन ,  राहाता विविध कार्यकारी कार्य सोसायटी  अर्जुन तुकाराम जोशी 
माजी सरपंच 
 बाबासाहेब गणपत पाळंदे 
संचालक,  राहाता विविध कार्यकारी सोसायटी राहाता 
 शशिकांत बोठे यावेळी उपस्थित होते

गुरुवार, ५ मार्च, २०२६

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी


ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

         प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. जिद्द, कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवत सैनिक स्कूल साठी पात्रता मिळवली आहे. यंदाच्या ऑल इंडिया सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत शाळेतील आदर्श उनवणे, मनिष कानडे, अनुराग डोंगरे, पवन गोरे, अथर्व गोल्हार व आदित्य वाघमारे हे सहा विद्यार्थी* सैनिक स्कूल साठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील मर्यादित साधन सामग्री असूनही विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या जिद्दीचा व गुणवत्तेचा प्रत्यय दिला आहे, त्यांच्या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.  
              या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री नामदेव फटांगरे तसेच श्रीम. मनिषा गावडे, श्रीम. मनिषा सपकाळे व श्री. महादेव कानडे या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विशेषतः परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनी 15 मे पासून वर्षभर सुट्टी न घेता सातत्याने *भरपूर सराव चाचण्या, अतिरिक्त वर्ग घेऊन, QR कोड - गुणवत्ता उपक्रम राबवून आणि वैयक्तिक मार्गदर्शन करून* विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली आहे, यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.  
        शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांनी विशेष अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे जि. प. मार्फत राबविला जाणाऱ्या *'मिशन आरंभ'* या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या नियमित सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल *मान. जलसंपदा मंत्री नामदार डॉ. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील  तसेच मा. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील* यांनी अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे विशेष कौतुक केले आहे. 
          या यशामध्ये राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजेश पावसे यांचे प्रेरणादायी प्रोत्साहन, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख श्री. कानिफनाथ कोळेकर
यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मोलाचे ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेत सध्या आनंदाचे वातावरण असून हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

राहात्यातील कातनाल्यावर होणार जापनीज टेक्नाँलाँजीतुन अप्परग्राऊंड बाजारतळ - डॉ सुजय विखे पाटील

राहात्यातील कातनाल्यावर होणार जापनीज टेक्नाँलाँजीतुन अप्परग्राऊंड बाजारतळ - डॉ सुजय विखे पाटील 


राहाता

राहाता शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी रुपये खर्चून आणि हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून, असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

राहात्यातील आठवडे बाजारचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. हा बाजार विरभद्र मंदीरासमोरील मैदानात भरत असल्याने, पसिररातील शाँपिंग काँम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय हे मैदान बाजारसाठी कमी पडत असल्याने शेतकरी व व्यापारी नगर-मनमाड महामार्ग व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते. 

त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. हिच समस्या सोडविण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय. 
यावेळी कातनाल्याची स्वच्छता व इस्टीमेंट तयार करण्याच्या  सूचना दिल्या आहेत कातनाल्यावर झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटीसा देऊन कातनाला मोकळा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

गुरुवारी डाँ. सुजय विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वतः कातनाल्यात उतरत पाहणी केली. कातनाला अंडरग्राऊंड केल्यास त्यावर बाजारतळ विकसीत करता येईल, असा मानस त्यांनी बोलून दाखवला. कातनाल्यातील दुर्गंधीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मटण मार्केटमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर (Incinerator) बसविण्याची योजना करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे मटण मार्केटमधील जैविक कचरा जाळून नष्ट केला जाणार असल्यामुळे तो नाल्यात किंवा परिसरात साचणार नाही. त्यामुळे कचऱ्यामुळे होणारे पाणी प्रदूषण टाळण्यास मदत होणार असून परिसर स्वच्छ ठेवण्यासही मोठी मदत मिळणार आहे.

जापनीज टेक्नाँलाँजीतून उभारण्यात येणारा हा हायटेक बाजारतळाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असणार आहे. त्यासाठी तब्बल सात कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबत माहिती देताना डाँ. सुजय विखे पाटील म्हणाले की, राहाता शहराचा बाजार वर्षानुवर्षे विरभद्र मंदीरासमोर भरतो. परंतु या बाजारामुळे मंदीरातील भावीक व परिसरातील व्यावसायिकांना अडचण होते. शिवाय साकुरी व नगर-मनमाड रस्त्यावरील वाहनांनाही अडथळा येतो.

जर कातनाला अंडरग्राऊंड केला, तर सुमारे एक ते दीड एकर जागा वापरायला मिळते. या कातनाल्याच्या पुराचे भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करुन आराखडा तयार केला जाणार आहे. जापनिज टेक्नाँलाँजीने कातनाला अंडरग्राऊंड करुन, त्यावर भव्य बाजारतळ उभारण्यात येणार आहे. 

राहात्यातील मटन मार्केटचा कचराही कायमस्वरुपी नष्ट करण्याचा प्लॅन करण्यात येणार असून, सध्याचे मटन मार्केटला स्थलांतरीत करण्यात येईल, असेही डाँ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. येत्या 1 एप्रिलपासून या कामाला प्रारंभ करण्यात येईल व पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा मानसही डाँ. विखे यांनी व्यक्त केला. यावेळी राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डाँ. स्वाधिन गाडेकर व इतर नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बुधवार, ४ मार्च, २०२६

साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने श्री साईबाबांच्या चरणी ३०९.५०० ग्रॅम वजनाचे नक्षीकाम असलेले ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण केले.

शिर्डी :
देश-विदेशातील लाखो साईभक्तांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध प्रकारे दान अर्पण करीत असतात.
याच श्रद्धेपोटी श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने श्री साईबाबांच्या चरणी ३०९.५०० ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण केले. या सुंदर व कलात्मक सुवर्ण दानाची एकूण किंमत रु. ४६,०९,०७४/- इतकी आहे.
सदर सुवर्ण ‘ॐ’ अक्षरे श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात श्रींच्या मूर्तीमागील भिंतीवर विधीवत बसविण्यात आली आहेत.
या देणगीनंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्त डॉ. सुरेश हावरे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नगरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांच्या अर्जांचा स्वीकार, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नगरमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांच्या अर्जांचा स्वीकार, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अहिल्यानगर 
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर शहरात जनता दरबार घेऊन नागरिकांच्या विविध समस्या व मागण्यांबाबतचे अर्ज स्वीकारले. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहिले असून जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या अडचणी, सूचना आणि निवेदने त्यांच्या समोर मांडली.

विळद घाट येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या जनता दरबाराला जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांबाबत लेखी अर्ज सादर केले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक अर्ज काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित विषयांबाबत योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.

प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नगरमध्ये आगमन झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले तसेच घोषणाबाजी करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत संकेत दिले. १० ते १२ मार्च दरम्यान राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बंगाल, तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील निवडणुकांसोबत महाराष्ट्रातील बारामती व राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील भाजप संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणे आणि त्यांना योग्य स्थान मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून आगामी काळात संघटनात्मक काम अधिक गतिमान करण्यावर भर दिला जाईल.

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले. सर्वांच्या विश्वासामुळेच ही जबाबदारी मिळाली असून त्याबद्दल आपण सर्वांचे ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सोमवार, २ मार्च, २०२६

महाराष्ट्रभर आरोग्य अदालतीची गरज कर्मचारी वर्गाची अपेक्षा। डॉ संजय उबाळे

महाराष्ट्रभर आरोग्य अदालतीची गरज  कर्मचारी वर्गाची अपेक्षा।    डॉ संजय उबाळे


पुणे परिमंडळाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा विषयक अडचणी सोडवण्यासाठी सुरू केलेली “आरोग्य अदालती” ही एक अत्यंत सकारात्मक आणि लोकाभिमुख पहल ठरली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्चपर्यंत तक्रारी, निवृत्तीवेतन, पदोन्नती तसेच इतर प्रलंबित सेवा विषयक बाबी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकरणांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागातील कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेत कार्यरत असतात. रुग्णांची काळजी घेत असताना त्यांनाही विविध सेवा विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. निवृत्तीवेतन प्रकरणे वेळेवर पूर्ण न होणे, १०, २०, ३० वर्षांनंतरच्या वेतनश्रेणी सुधारणा प्रलंबित राहणे, पदोन्नती संदर्भातील अडथळे, भरती प्रक्रियेत झालेल्या तक्रारी, काही ठिकाणी मानसिक ताण, तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट अडचणी अशा अनेक बाबी दीर्घकाळ प्रलंबित राहतात. यामुळे कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण होते.

पुणे परिमंडळाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून सहानुभूती आणि मदतीच्या भावनेतून उचललेले पाऊल आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून प्रश्न मांडण्याची आणि त्यावर त्वरित कार्यवाही होण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये विश्वास आणि समाधानाची भावना वाढीस लागली आहे.

प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग समितीचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशीच आरोग्य अदालतीची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते, सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी वेळेवर सोडवल्या गेल्या तर त्यांच्या कार्यक्षमतेत आणि मनोबलात निश्चितच वाढ होईल.

महाराष्ट्रातील इतर सर्व उपसंचालक कार्यालयांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांसाठी अशा प्रकारचा पुढाकार घ्यावा. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक होईल, प्रकरणांचा जलद निपटारा होईल आणि कर्मचारी वर्गामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

पुणे परिमंडळाने दाखवलेला हा आदर्श संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. सहानुभूती आणि मदतीची भावना जपून प्रशासन पुढे सरकले, तर आरोग्य विभाग अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ संजय उबाळे यांनी व्यक्त केली आहे

३ मार्च २०२६ रोजी खग्रास चंद्रग्रहणानिमित्त दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल

३ मार्च २०२६ रोजी खग्रास चंद्रग्रहणानिमित्त दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल

शिर्डी :

 श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्यामार्फत जाहीर करण्यात येते की,  दि. ०३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने श्री साईबाबा समाधी मंदिर तसेच संस्थान अंतर्गत सर्व मंदिरांमध्ये दुपारी ०३.२० वा. ते सायंकाळी ०६.४८ वा. या कालावधीत दर्शन व्यवस्था बंद राहील.
सदर कालावधीत मंदिरामध्ये धार्मिक मंत्रोच्चार विधी सुरू राहतील.
सायंकाळी ०७.०० वा. मंगलस्नान, “शिर्डी माझे पंढरपूर” आरती व धुपारती संपन्न झाल्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू होऊन रात्री १०.०० वा. नियमित शेजारती होईल.
भाविकांनी वरील बदलांची नोंद घ्यावी व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.),  यांनी केले आहे.

परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क -ना.विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

परदेशात अडकलेल्या नागरिकांशी  प्रशासनाकडून संपर्क -ना.विखे पाटील 


जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन 

​अहिल्यानगर, 

 मध्यपूर्व व आखाती प्रदेशात  निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अडकलेल्या नागरीकांशी संपर्क साधण्यात आला असून, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या  मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


परदेशात अडकलेल्या नागरीकांच्या नातेबाईकांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा   उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकार्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या  सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.राज्य सरकारने केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनूसार चोवीस तास हेल्पलाईन नंबर देण्यात आले असून संपर्कासाठी ०२२-२२०२७९९० असा क्रमांक देण्यात आला आहे.
अहील्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील  ०२४१-२३२३८४४. व २३५६९४० क्रमांकावर  संपर्क साधण्याचे आवाहन नंबर  मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

​ अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत त्यांना विमानसेवा बंद असल्याने थांबण्याची वेळ आली आहे.या सर्वाशी जिल्हाधिकारी कार्यालयाने संपर्क केला असून काही नागरीकांशी व्यक्तिगत आपणही संपर्क करून दिलासा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात  संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

​​विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४x ७ आपत्कालीन क्रमांक उपलब्ध 
तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

रविवार, १ मार्च, २०२६

साहित्यिकांनी प्रतिभेचा वापर समाजासाठी करावा – कॉ.सुरेश पानसरे

साहित्यिकांनी प्रतिभेचा वापर समाजासाठी करावा – कॉ.सुरेश पानसरे

शब्दगंधची राहाता तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर

कोल्हार




साहित्यिकांनी गटतटाचे राजकारण वगळून साहित्याशी प्रामाणिक राहून कार्यरत राहावे, सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर लेखन करावे आणि आपल्या प्रतिभेचा वापर समाजहितासाठी करावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.सुरेश पानसरे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राहाता तालुका शाखा कार्यकारी मंडळाच्या निवड प्रसंगी लोणी येथील संकल्प मंगल कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सोपानराव विखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, नियोजन समिती प्रमुख बबनराव गिरी व शर्मिला गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता, शिर्डी व लोणी परिसरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत राहाता तालुका शाखेच्या अध्यक्षपदी साहेबराव तुपे, सचिवपदी सुमेध ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. संदीप तपासे, उपाध्यक्षपदी सुयश वाघमारे, खजिनदारपदी विजय तांबे यांची निवड झाली. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सोपानराव विखे, भास्कर दादा लगड, संतोष ब्राह्मणे, भास्करराव निर्मळ तसेच कॉ.सुरेश पानसरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी साहेबराव तुपे यांनी नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शिर्डी येथे तालुकास्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
प्रा. सोपानराव विखे म्हणाले की, कोणत्याही सोयी-सुविधा नसताना शब्दगंधने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. या कार्यातून अनेक नवोदित लेखक घडले असून ही चळवळ विस्तारत असल्याचे पाहून समाधान वाटते.
शब्दगंधच्या विविध उपक्रमांची माहिती सुनील गोसावी यांनी दिली, तर सुमेध ब्राह्मणे यांनी आभार प्रदर्शन केले.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, कार्यवाह भारत गाडेकर ,खजिनदार भगवान राऊत व मुंबई जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ.रमेश वाघमारे यांनी विशेष अभिनंदन केले.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...