लोणी खुर्द येथे ११६ दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
ग्रामपंचायत लोणी खुर्दचा संवेदनशील व लोकहितकारी उपक्रम
ग्रामपंचायत लोणी खुर्द यांच्या वतीने लोणी खुर्द येथील ११६ दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या ५ टक्के दिव्यांग निधी अंतर्गत जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधान वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमास सरपंच श्री.जनार्दन घोगरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रभावती जनार्दन घोगरे, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौ.प्रभावती घोगरे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या,दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांचा सन्मान, सुरक्षितता व सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामपंचायत लोणी खुर्द ही केवळ प्रशासन करणारी संस्था नसून माणुसकी जपणारी व्यवस्था आहे. दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार व दैनंदिन गरजांसाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.
सरपंच श्री. जनार्दन घोगरे यांनी सांगितले की,ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५ टक्के निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा खर्च करण्यात येतो. आजवर करण्यात आलेल्या खर्चामधील ही सर्वाधिक रक्कम असून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उत्पन्न वाढीसोबतच लोककल्याणासाठी अधिकाधिक निधी खर्च करण्याचा आमचा संकल्प आहे.
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत लोणी खुर्द कटिबद्ध असून, भविष्यातही अशाच लोकहितकारी योजना व उपक्रम राबवले जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा