गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक: पिंपळनेर मधील शिक्षकास अटक
शिर्डी । प्रतिनिधी संजय महाजन
गुंतवणुकीवर महिन्याला ७ ते २५ टक्के परतावा आणि वर्षभरात दुप्पट तिप्पट रक्कम मिळेल, अशा आमिषाने पिंपळनेरसह साक्री परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे १ कोटी ७६ लाख रुपये उकळणाऱ्या टोळीविरोधात पिंपळनेर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणुकीस प्रोत्साहीत करणाऱ्या एका जि.प.शाळेच्या शिक्षकास अटक केली आहे.
पिंपळनेरातील गोपाळनगर येथील शेतकरी ललीत राजेंद्र पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ङ्गग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.फ या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. त्याअंतर्गत दरमहा ७ ते २५ टक्के परतावा मिळेल किंवा गुंतवलेली रक्कम वर्षभरात दुप्पट तिप्पट होईल, अशा खोट्या आश्वासनांवर विश्वास बसवून अनेक शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. राजाराम भटू सावळे, भूपेंद्र राजाराम साळवे (दोघे रा. शिर्डी), सतीष पांडुरंग पाटील, प्रतिभा सतीष पाटील, दर्शन सतीष पाटील (त रा. पिंपळनेर, इंदिरा गांधी कन्या शाळेजवळ), अनिल पांडुरंग
पाटील (रा. घोडदे, ता. साक्री), अरुण रामदास नंदन, सीमा अरुण नंदन (रा. ताराहाबाद, ता. सटाणा, ह.मु. खुटवडनगर, नाशिक) या सर्वांनी मिळून फसवणुकीचा कट रचून ललित पगारे यांच्यासह इतर शेतकऱ्यांकडून आरटीजीएस व रोख स्वरूपात एकूण १ कोटी ७६ लाख रुपये हडपले. त्यांनी दिलेले परतावे काही काळासाठी होते, पण नंतर पैसे देणे थांबवले आणि गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही.या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जि. प शाळेतील शिक्षक सतीष पांडुरंग पाटील (रा. पिंपळनेर) यास अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पीएसआय अमोल देवढे, पीएसआय सविता गवांदे, पोलिस कर्मचारी रविंद्र माळी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून तपासाची सूत्रे पीएसआय सविता गवांदे यांच्या हातात आहेत. आणखी अटक होण्याची शक्यता असून फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा