शिर्डीतील लाईट व सबस्टेशनच्या तांत्रिक अडचणी दूर करू - केंद्रीय ऊर्जामंत्री नाईक
शिर्डी
केंद्रीय ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी शिर्डीला भेट दिली असता साई दर्शनानंतर जैन काच मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी येथील जैन समाजाचे अध्यक्ष सतीश गंगवाल, उद्योजक दीपक निकम, प्रतीक गंगवाल, नीरज महाजन, विकी भोसले यांच्या हस्ते त्यांचा साई प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सतीश गंगवाल यांनी सांगितले की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असून येथे नेहमीच साईभक्तांची गर्दी असते. मोठ्या प्रमाणावर हॉटेल इंडस्ट्री असल्याने वारंवार होणाऱ्या लाईट येजा-जाण्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर साईभक्तांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीला प्रतिसाद देताना केंद्रीय ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या कामाबाबत येणारा खर्च व निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या. "हा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
शिर्डीत सबस्टेशन उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असूनही आर्थिक निधी व तांत्रिक अडचणींमुळे शहरातील व्यावसायिक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. "हा महत्त्वाचा प्रश्न असून साईबाबांच्या भूमीतील ही समस्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून या तांत्रिक अडचणी दूर करू," असे श्रीपाद नाईक म्हणाले.
"माझी साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. काही दिवसांपूर्वी माझा अपघात झाला होता. त्या अपघातातून आम्ही साईबाबांच्या आशीर्वादामुळेच सहीसलामत बाहेर पडलो. त्यामुळे शिर्डीकरांची अडचण तातडीने सोडवली जाईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्वरित प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले आहे," असेही ते म्हणाले.
शिर्डी येथील काच मंदिरात केंद्रीय ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांचा सन्मान करताना मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा