शनिवार, ५ एप्रिल, २०२५

जोपर्यंत साईबाबांचं नाव राहील तोपर्यंत मनोज कुमार यांचंही नाव राहील, 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटातून साईबाबांची महती देशभर पसरवली

जोपर्यंत साईबाबांचं नाव राहील तोपर्यंत मनोज कुमार यांचंही नाव राहील, 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटातून साईबाबांची महती देशभर पसरवली

शिर्डी 

सुप्रसिद्ध अभिनेता आणि शिर्डी साईबाबांचे परमभक्त मनोज कुमार यांचं आज वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. मनोज कुमार यांच्या जाण्यानं शिर्डीसह साई भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र, शिर्डीच्या आणि भाविकांच्या हृदयात ते कायम स्वरुपी राहतील. अभिनेता मनोज कुमार हे आपल्या प्रखर देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याचबरोबरीनं शिर्डीच्या साईबाबांची महती त्यांनी देशभर "शिर्डी के साईबाबा" या चित्रपटाच्या माध्यमातून पोहचवली होती.

शिर्डी साईबाबांची महती देशभर पसरली : मनोज कुमार यांच्या 1977 सालच्या "शिर्डी के साईबाबा" या चित्रपटामुळं शिर्डी साईबाबांची महती देशभर पसरली. या चित्रपटानंतर भाविकांची रिघ शिर्डीत येण्यास सुरुवात झाली. 
साईबाबांच्या मंदिराच्या गेटला "मनोजकुमार गोस्वामी मार्ग" नाव : मनोज कुमार हे शिर्डी साईबाबांचे परमभक्त होते. ते 1957 सालापासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत होते. साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर ते बहुतांशवेळा साईंची प्रतिमा असलेला भगवा रुमाल आपल्या डोक्यावर बांधत असतं. मनोज कुमार यांच्या "शिर्डी के साईबाबा" या चित्रपटामुळं साईबाबांचा महिमा करोड भाविकांपर्यंत पोहोचल्यानं शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचा 2001 साली शिर्डीत नागरी सत्कार केला आणि शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. तसंच शिर्डी नगरपंचायतीच्या वतीनं साईबाबांच्या मंदिराच्या गेट क्रमांक 1 जवळील जुन्या पिंपळवाडी मार्गाला "मनोजकुमार गोस्वामी मार्ग" असं नाव देण्यात आलं.
शिर्डी ग्रामस्थांच्यावतीनं श्रद्धांजली : मनोज कुमार शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर कायम म्हणायचे "साईनाम मे जादू ऐसा साईधाम मन भाये रे" मन की शिर्डी तबतक सुनी जब तक साई न आये रे" ही आठवण शिर्डीकरांच्या नेहमी आठवणीत राहील. मनोजकुमार यांच्या जाण्यानं शिर्डीतूनही मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिर्डी ग्रामस्थांच्यावतीनं मनोजकुमार यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...