राहाता तालुका विधी सेवा समिती व राहाता तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा गौरव दिन" राहाता न्यायालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधिश गुप्ता साहेब होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक सर्जेराव मते उपस्थित होते. तसेच या समारंभास वरिष्ठ स्तर न्यायाधिश शेख साहेब, जोशी मॅडम रजपुत साहेब, तट साहेब, तसेच फुलारी साहेब, भरड साहेब, गिरगावकर साहेब हे सर्व उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना सर्जेराव मते म्हणाले की, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जेष्ठ कवी वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. भाषा म्हणजे जीवंत लोकांचे व तेजस्वीपणाचे लक्षण आहे. भाषा म्हणजे लोकसमुहाला एक बनविण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. भाषेमध्ये बोलीभाषेलाही महत्व असुन मराठीमध्ये कोकणी, मराठवाडी, वज्हाडी, खान्देशी, अशा विविध बोलीभाषा सामावलेल्या आहेत. जपान, चीन सारख्या देशांनी आपल्या भाषेतूनच प्रगती केलेली पहावयास मिळते. तसेच आपणाकडेही न्यायदान, व्यावसायिक, या क्षेत्रातही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्यास सामान्यांना त्यांचा फायदा होईल. मराठीला पुरातन परंपरा असुन संत,कवी, लेखक, शाहीर, ग्रंथकार, यांनी ती समृध्द केलेली पहावयास मिळते. साता समुद्रापारही मराठी भाषेचा डंका असुन केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. शब्दांचा क्रम, शब्द वापरण्याचे ठिकाण, शब्द उच्चारतानाचे चढ उतार तसेच त्यांचा योग्य वापर केल्यास होणारा अर्थबदल या विषयीचे विविध किस्से सांगुन त्यांनी सर्वांना खिळवून ठेवले. आपण सर्वांनी सर्वच क्षेत्रात मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास मराठीला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त होईल असेही ते म्हणाले.
या अगोदर न्यायमुर्ती गुप्ता साहेब यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजी चौधरी यांनी पाहूण्यांचा परिचय करुन दिला तर अॅड. अनिल शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. शेवटी अॅड. सागर जपे यांनी आभार मानले. या समारंभास सर्व न्यायाधिश, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा