EVM मतमोजणीतून सत्याचा विजय – शिर्डी मतदारसंघातील पारदर्शकतेसाठी संघर्ष अखंड सुरूच : सौ. प्रभावती घोगरे
शिर्डी,
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुप्रीम कोर्टाने दिलेला अलीकडील आदेश हा पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठा टप्पा मानला जात आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी न्यायालयाने EVM मधील मतांची प्रत्यक्ष मोजणी करण्याचा आदेश दिला आणि त्यानुसार झालेल्या मतमोजणीत खरा निकाल देशासमोर आला.
“हा फक्त एका उमेदवाराचा विजय नाही, तर संपूर्ण लोकशाहीचा आणि मतदारांच्या हक्कांचा विजय आहे,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी ठामपणे सांगितले.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून सौ. घोगरे मैदानात उतरल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांनी बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महिला सक्षमीकरण, स्थानिक पायाभूत सुविधा आणि शिर्डी मतदारसंघातील भीतीचे वातावरण या गंभीर मुद्द्यांवर भर दिला.
मतदानानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र अनेक मतदारांनी बोगस मतदान, EVM मध्ये फेरफार आणि निकाल प्रक्रियेतील अपारदर्शकता याबाबत तक्रारी केल्या.
“लोकशाहीत प्रत्येक मत हे पवित्र असते. जनतेचा विश्वास हा निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. जर मतदारांना निकालाबाबत शंका वाटू लागली, तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच EVM मधील मतांची प्रत्यक्ष मोजणी होणे ही काळाची गरज आहे,” असे सौ. घोगरे म्हणाल्या.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेल्या EVM मतमोजणीतून निकालांमध्ये झालेले बदल हे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारीची नवी नोंद ठरल्याचे सौ. घोगरे यांनी नमूद केले.
“हा निकाल हे सिद्ध करतो की, संघर्ष केला तर सत्याचा विजय होतोच. न्यायालयीन लढ्याद्वारेही लोकशाही वाचवता येते,” असे त्यांनी सांगितले.
“हा निर्णय संपूर्ण देशासाठी संदेश आहे कोणतीही सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीचा आवाज दाबता येत नाही. मी शिर्डी मतदारसंघातील जनतेला विश्वास देते की, पारदर्शक आणि स्वच्छ निवडणूक प्रणालीसाठी माझा संघर्ष अखंड सुरू राहील. मतदारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विश्वासासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन,” असे सौ. प्रभावती घोगरे यांनी ठामपणे सांगितले.
या निर्णयामुळे शिर्डी मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंद व समाधानाची भावना निर्माण झाली आहे. “आमचे मत योग्य प्रकारे मोजले जावे, हीच आमची अपेक्षा आहे.”असे अनेक मतदारांनी सांगितले.
लोकशाहीच्या या विजयामुळे केवळ शिर्डीच नव्हे तर संपूर्ण राज्यातील आणि देशातील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या संघर्षाने एक संदेश दिला आहे“लोकशाही वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेच पाहिजे, कारण लोकशाही म्हणजेच जनता आणि जनता म्हणजेच लोकशाही.”असे सौ.घोगरे यांनी मत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा