गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

श्रद्धा-भक्तीचा महासागर – लोणी खुर्दमध्ये ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन

श्रद्धा-भक्तीचा महासागर – लोणी खुर्दमध्ये ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन



दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिराचा भव्य जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव भक्तीभावाने संपन्न


लोणी खुर्द (ता. राहाता) – लोणी खुर्दच्या पवित्र भूमीत आज भक्ती, संस्कार आणि आनंदाचा महासागर उसळला. दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव ग्रामस्थांच्या अखंड सहभागाने, एकजुटीने आणि भक्तीभावाने उत्साहात पार पडला.

या मंगल सोहळ्यानिमित्त रामायणाचार्य, ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांचे जाहीर हरिकीर्तन रंगले. गोड, सुश्राव्य आणि ओजस्वी वाणीने श्रीराम-हनुमंताच्या भक्तीमय कथा त्यांनी सादर करत भाविकांची मने जिंकली. कीर्तनादरम्यान महाराजांनी स्व. आमदार चंद्रभान दादा घोगरे यांच्या कार्याची, गावाशी असलेल्या आत्मीयतेची हृदयस्पर्शी आठवण करून दिली.



महाराजांचा एक विचार विशेष लक्षवेधी ठरला –
"पूर्ण होत नाही ते घर असते, पूर्ण होते ते मंदिर असते, आणि पूर्ण झाल्यावर तो असतो आनंदाचा सोहळा!"
आज हे वचन प्रत्यक्षात साकार झाल्याचे ग्रामस्थांच्या भावनांतून उमटले.

सरपंच जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली, ग्रामस्थांच्या श्रमदानातून व सहकार्याने मंदिराचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. भव्य शिखर, आकर्षक कोरीवकाम, आणि तेजस्वी मूर्तीचे दर्शन घेताच प्रत्येक भाविकाच्या मनात समाधानाची लहर उमटली.

या सोहळ्याला पंचक्रोशीतील वारकरी, टाळकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक-युवती व बालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कीर्तनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


मंदिर उभारणीत श्रमदान करणारे गावकरी, तसेच बांधकाम व विद्युत काम करणारे कारागीर यांचा ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी एकमुखाने सरपंच जनार्दन घोगरे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्याचा अभिमान व्यक्त केला.

हा सोहळा केवळ मंदिरापुरता मर्यादित न राहता, लोणी खुर्दच्या एकतेचा, भक्तीचा आणि संस्कारांचा महोत्सव ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...