*शेतक-यांनी कृषिविषयक योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ*
शिर्डी( संजय महाजन)
कृषी
विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 व्या जयंतीचे निमित्ताने खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी 17 जून ते 01 जुलै 2024 असा कृषी संजीवनी पंधरवाडा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांमध्ये कृषी विभाग व कृषी संलग्न यंत्रणा यांचेकडून कृषी विषयक तंत्रज्ञान त्यासोबतच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन दि.26/05/2024 रोजी तुर व इतर कडधान्य तंत्रज्ञान प्रसार दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय साक्री अंतर्गत पिंपळनेर मंडळ कार्यक्षेत्रात मौजे वार्सा व मौजे काळंबा ता.साक्री जि. धुळे येथे कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कैलास शिरसाट साहेब तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र धुळे चे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे त्याचबरोबर कृषी शास्त्रज्ञ डॉ आतिश पाटील सर, डॉ. चौधरी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर, हरिदास पवार यांचे समवेत कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणावर परिसरातील शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगामातील विविध पिकांच्या बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, एस आर टी पद्धतीने भात लागवड, मूलस्थानी जलसंधारण, उताराला आडवी पेरणी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. कृषी विभागाशी संलग्न होऊन कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कृषी विज्ञान केंद्र चे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती दिली व उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण केले. मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी प्रणाली तसेच महाडीबीटी प्रणाली द्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना विषयी माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री पिक विमा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, यामध्ये सलग क्षेत्रावर फळबाग लागवड व बांबू लागवड याविषयी कृषी पर्यवेक्षक पुंडलिक महाले यांनी मार्गदर्शन केले. साक्री तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जात असल्याने येथील शेतकऱ्यांनी भात पिकामध्ये एस आर टी पद्धतीने भात लागवडीचे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, त्याचप्रमाणे साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात फळबाग लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने पारंपारिक पिकाऐवजी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळून कृषी विभागाच्या मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवड करावी असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट यांचे कडून करण्यात आले. कृषी पर्यवेक्षक शिवाजी राऊत यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही यावेळी करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा