मंगळवार, २८ मे, २०२४

सात नंबर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास पिकांना मोठा फटका बसणार


सात नंबर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास पिकांना मोठा फटका बसणार

राहाता =
   गोदावरी कालव्याचे सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनाचे 800 दशलक्ष घनफूट पाणी कमी करून वैजापूर ,गंगापूर तालुक्यांसाठी असणाऱ्या जलद कालव्याच्या लाभक्षेत्राला देण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला असून या निर्णयामुळे गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तनाचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हक्काच्या पाण्याच्या घोषणा दिल्या. 

गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तनाचे सिंचन व बिगर सिंचनाच्या आवर्तन सुरू असून अचानकपणे गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी असलेल्या एक्सप्रेस कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिला असून त्या आदेशान्वये 800 दशलक्ष घनफूट पाणी हे गोदावरी कालव्याचे कमी करून जलद कालव्याला सोडले आहे. या निर्णयामुळे उन्हाळी हंगामात चारा पिके, फळबागा, ऊस या पिकांसाठी सात नंबर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास पिकांना मोठा फटका बसणार असून उभी पिके जळून जातील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कालव्यांचे हक्काचे पाणी कालव्याच्या मुखाशी मोजून द्या, एक्सप्रेस कॅनलला सोडलेल्या पाण्यात कपात करून ते पाणी गोदावरी कालव्यांना उपलब्ध करून द्या अशी मागणी यावेळी केली 

जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळामुळे विहिरीमध्ये पाणी राहिलेले नसून कालवा लाभ क्षेत्रातील चारा पिके, फळबागा जळत आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये कालवा परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून उन्हाळी हंगामात कमीत कमी एक शेती सिंचन आवर्तन होईल एवढे पाणी शिल्लक ठेवले होते. वैजापूर गंगापूर या तालुक्यांसाठी असलेल्या गोदावरी जलद कालवा अंतर्गत सिंचनासाठी व पिण्यासाठी मंजूर असलेले सर्व पाणी वापरलेले आहे असे असतानाही गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने गोदावरी कालव्यांचे उन्हाळी आवर्तन चालू असताना अचानकपणे आदेश काढून 800 दशलक्ष घनफूट पाणी जलद कालव्याला सोडण्याचा निर्णय घेऊन पाणी सोडले आहे त्यामुळे गोदावरी कालवा परिसरातील सिंचन व्यवस्था धोक्यात आलेली आहे. लाभक्षेत्रातील चारा पिके, फळबागा व ऊस पिके जळून खाक होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी घालून दिलेल्या नियमा
प्रमाणे पाणी वितरण होणे आवश्यक होते. परंतु गोदावरी कालव्यांच्या कोठ्याप्रमाणे कालव्यांना पाणी देण्यात आलेले नाही. एक्सप्रेस जलद कालव्याच्या वाटेचे पाणी खरीप रब्बी हंगामामध्ये उधळपट्टी करून वापरले गेले आहे. व आता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली गोदावरी कालव्याचे पाणी जलद कालव्यामध्ये सोडण्यात आले आहे. गोदावरी उजवा व डावा कालव्यासाठी मंजूर हक्काचे असलेले पाणी मुखाशी मोजून कालव्यांना देण्यात यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मंजूर झालेले हक्काचे पाणी मिळेल. तसेच नांदूर मधमेश्वर प्रकल्पावर गोदावरी नदीवर आणखी 9 वक्राकार दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे गोदावरी उजवा व डावा कालव्यांना खरीप हंगामामध्ये पाणी येणे दुरापास्त होणार आहे. गोदावरी नदीला पुर परिस्थिती असली तरी कालवे मात्र कोरडे ठणठणीत राहणार आहे. गोदावरी कालव्यांना खरीप हंगामामध्ये भर पावसाळ्यात पाणी उपलब्ध होणार नाही. या सर्व कारणांमुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला नऊ वक्राकार दरवाजे बसविण्यास लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. नगर नाशिक विभागीय सिंचन कार्यालय गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाला जोडलेले आहे. मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद येथे असल्याने नेहमीच निर्णय घेताना नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांना वेठीस धरून निर्णय घेतले जातात. त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे. याचा विचार करून नगर नाशिक विभागासाठी नाशिक येथे स्वतंत्र सिंचन विकास महामंडळ कार्यालय सुरू करण्यात यावे, गोदावरी कालवे रुंदीकरणाचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे कालव्याची वाहन क्षमता वाढवून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून आवर्तनाचा कालावधी कमी होऊन पाणी बचत होईल व त्याचा फायदा शेती सिंचनासाठी होईल असे निवेदनात म्हटले आहे 

यावेळी गणेश साखर कारखान्याची माजी अध्यक्ष एड. नारायणराव कारले, गणेशचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते , संचालक संपतराव चौधरी, संचालक नानासाहेब नळे, संचालक विष्णुपंत शेळके, संचालक भगवानराव टिळेकर, माजी संचालक मोहनराव सदाफळ, नानासाहेब बोठे, महेंद्र शेळके राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, डॉ. राजेंद्र पिपाडा, गणेशचे माजी कार्यकारी संचालक पांडुरंगराव भातोडे, अविनाश टिळेकर, राजेंद्र दंडवते, एड. पंकज लोंढे, नितीन सदाफळ, तसेच लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते 

चौकट 
गोदावरी कालव्यांच्या चालू उन्हाळी आवर्तनात 800 दशलक्ष घनफूट पाण्यात कपात करण्यात आल्यामुळे फक्त फळबागांनाच पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून आवर्तन सात ते आठ दिवस चालणार आहे. 3 जून पर्यंत आवर्तन पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. 
अरुण निकम 
उपविभागीय अभियंता, जलसंपदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...