केंद्रीय बजेटावर शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा घणाघात – “महाराष्ट्रावर अन्याय, शिर्डीची जाणीवपूर्वक उपेक्षा”
नवी दिल्ली
दि. 1/2/2026
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय बजेट 2026-27 वर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर महाराष्ट्राच्या हक्कांची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “देशाला सर्वाधिक महसूल देणारा महाराष्ट्र आज या बजेटमध्ये सर्वाधिक दुर्लक्षित राज्य ठरला आहे.,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
देशातील राज्यांना एकूण ₹3,94,183 कोटी रुपये हस्तांतरित करण्याची तरतूद असताना, त्यामधील महाराष्ट्राचा वाटा केवळ 6 ते 7 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 15 टक्क्यांहून अधिक योगदान देतो आणि केंद्र सरकारला सर्वाधिक कर महसूल देणाऱ्या राज्यांमध्ये अग्रस्थानी आहे. असे असताना महाराष्ट्राला मिळणारा निधी इतका अल्प का, असा गंभीर प्रश्न खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थित केला.
या बजेटमध्ये ग्रामीण विकासासाठी ₹1.97 लाख कोटी, जलशक्ती मंत्रालयासाठी ₹94,800 कोटी, कृषी मंत्रालयासाठी ₹1.40 लाख कोटी, रस्ते वाहतूक व महामार्गांसाठी ₹3.09 लाख कोटी आणि रेल्वेसाठी ₹2.81 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रासाठी कोणतीही विशेष किंवा अतिरिक्त ग्रँट जाहीर करण्यात आलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्यांचे वास्तव आणि पाणीटंचाईच्या समस्येकडे या बजेटमध्ये पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप करताना “ग्रामीण विकास, जलशक्ती आणि कृषी मंत्रालयांसाठी मोठे आकडे दाखवले जात आहेत, मात्र महाराष्ट्रासाठी स्वतंत्र किंवा विशेष पॅकेजचा उल्लेखही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* रेल्वेसाठी हजारो कोटींची तरतूद असतानाही मुंबई लोकलसाठी ठोस घोषणा नसल्याची टीका करत खासदार वाकचौरे म्हणाले, “दररोज 75 लाख प्रवाशांची वाहतूक करणारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लोकल ही देशाची आर्थिक जीवनरेषा आहे. मात्र या बजेटमध्ये ना नवीन लाईन्स, ना प्रवासी सुविधांसाठी विशेष निधी दिसतो. हा थेट महाराष्ट्रातील प्रवाशांवर अन्याय आहे.”
* शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना तर श्री वाकचौरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “शिर्डी हे केवळ शहरच नाही, तर कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था यात्रेवर अवलंबून आहे. तरीही बजेटमध्ये शिर्डीसाठी स्वतंत्र तीर्थ-पर्यटन क्षेत्र म्हणून विशेष लक्ष दिले नाही,” असे त्यांनी सांगितले.
तसेच आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीवर वाढणारा ताण लक्षात घेता रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांसाठी अतिरिक्त निधीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “कुंभमेळ्याची तयारी आणि शिर्डीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे,” अशी आग्रही मागणी ही त्यांनी केली.
यावेळी खासदार श्री वाकचौरे यांनी केन्द्र सरकार ला स्पष्ट इशारा दिला की, जर केंद्र सरकारने महाराष्ट्राचा हक्क दिला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही, शिवसेना संसदेत आणि रस्त्यावर उतरून हा लढा अधिक तीव्र करेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा