सोमवार, ८ जुलै, २०२४

शासनाने राहाता तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा - गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ऍड. नारायण कार्ले पाटील

शासनाने राहाता तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा - गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ऍड. नारायण कार्ले पाटील 

राहाता प्रतिनिधी =
शासनाने राहाता तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ऍड. नारायण कार्ले पाटील यांनी केली आहे.

राहाता तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटातही पाऊस नाही. जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपला असून अद्याप गोदावरी कालवे लाभक्षेत्रात व तालुक्यात दोन ते अडीच इंचापेक्षा जास्त पाऊस नाही. शेतकऱ्यांनी अल्प - पावसावर पेरण्या केल्या, ते उगवूनही आले. परंतु पावसाने महिन्यापासून उघडीप दिल्याने त्यातच कडक ऊन व वारा यामुळे सोयाबीन, मका, कपाशी अन्य खरिपाची पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीतही खरिपाची पिके उभी केली आहेत. परंतु तीही पावसाअभावी जळून चालली आहेत. हीच परिस्थिती पेरु व इतर फळबागांची आहे.तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प असल्याने जो पाऊस झाला तो कमी प्रमाणात झाला. या पावसाने विहिरींना पाणी उतरले नाही. विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. 'परिणामी विहिरींवर तसेच विंधन 'विहिरींवर अवलंबून असणारी पिकेही धोक्यात आहेत.
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती लाभ मिळणार याची खात्री नाही. त्यामुळे शासनाने त्वरित दुष्काळी परिस्थितीवर विचार विनीमय करून शासनाच्या धोरणानुसार राहाता तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याबरोबरच शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांना मदत करावी. अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्या शिवाय राहणार नाही. खरे तर शेतकऱ्यांना विविध स्वरुपाची अनुदाने देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे चारा पिके अडचणीत आहेत. पावसाने असाच कानाडोळा केला तर जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याची वेळ येईल. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दुधाला भाव नाही. कांदा, सोयाबीनला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळ जाहीर करून सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार द्यावा, गोदावरी कालव्यांचे अपुरे पाणी, यामुळे बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने राहता तालु का दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ऍड. कार्ले पाटील यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...