बाभळेश्वरमध्ये ‘बाल आनंद बाजार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद — अनुभवाधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम
लोणी : ज्ञानेश्वर साबळे,
विद्या विकास पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंद मेळावा’ व ‘आनंद बाजार’ उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, अनुभवातून शिकण्यावर भर देणारा आणि स्वावलंबनाची पहिली पायरी ठरणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षणासोबत विविध जीवनकौशल्ये प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. शरद दुधाट व माणिकराव लहामगे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमांमध्ये व्यापारज्ञान, स्टॉल व्यवस्थापन, गणितीय व्यवहार, विक्रीकला, संवादकौशल्य, सहकार्यभाव, आर्थिक नियोजन अशा अनेक कौशल्यांचा सहभाग होता. शालेय जीवनात ही कौशल्ये अत्यंत उपयुक्त ठरत असून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसोबत नेतृत्वगुण, टीमवर्क, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढीस लागते, असेही अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांनी नमूद केले.
या विशेष उपक्रमावेळी मा. कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील आज वाढदिवस असणाऱ्या इयत्ता ४ वीचे सत्यम भोसले व इयत्ता २ रीतील सात्विक गोरे या विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिले गेलेले हे विशेष व्यासपीठ सर्वांच्याच दृष्टीने औत्सुक्याचा विषय ठरले.
विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, पालक प्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या मोठ्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्टॉल्सना मोठा प्रतिसाद मिळाला. खाद्यपदार्थांची स्टॉल्स, हस्तकला, चित्रकला, सजावट, घरगुती उत्पादनं, खेळणी, शैक्षणिक साहित्य अशा विविध विभागांनी संपूर्ण परिसराला उत्सवमय रूप दिले. लहानग्यांनी विक्रीदर ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे, पैशाचे व्यवस्थापन, परताव्याचे गणित, स्टॉलची मांडणी व सजावट या सर्व प्रक्रियेत प्रभावी सहभाग नोंदविला.
पालकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. "मुलांनी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्ष जीवनातही उपयुक्त ठरणार आहेत. शाळेने घेतलेला हा उपक्रम केवळ मनोरंजनात्मक नव्हे तर मुलांच्या समग्र विकासाचा मार्ग आहे," अशी प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त झाली. विद्यार्थ्यांनी दाखवलेली सर्जनशीलता, टीमवर्क आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित मान्यवरांनीही समाधान व्यक्त केले.
विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धतीचे हे यशस्वी उदाहरण असल्याचे मान्यवरांनी गौरविले. "अभ्यासक्रमाबाहेर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाची संधी देणे ही काळाची गरज आहे. ‘आनंद बाजार’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य प्रभावीपणे विकसित होत आहे," असे मनोगत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे सचिव अण्णासाहेब म्हस्के, नामदेवराव म्हस्के, माणिकराव लहामगे, माधवराव भोकनळ विलासराव टिळेकर, साहेबराव शिंदे, बापूसाहेब बेंद्रे, चौधरी साहेब, संजय दुबे, देवेश आहेर, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद व पालक यांची उपस्थिती लाभली.
विद्या विकास पब्लिक स्कूलचा ‘बाल आनंद मेळावा’ व ‘आनंद बाजार’ हा उपक्रम अनुभवाधारित शिक्षणाचा प्रभावी नमुना ठरला असून संपूर्ण परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली उत्सुकता, पालकांचा सहभाग आणि शाळेचे मार्गदर्शन यामुळेच हा उपक्रम केवळ शालेय कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या विकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा