बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

लोणी बुद्रुक येथे केंद्रीय मंत्री चौहान यांच्या उपस्थितीत ‘विशेष ग्रामसभे’चे आयोजन

लोणी बुद्रुक येथे केंद्रीय मंत्री चौहान यांच्या उपस्थितीत ‘विशेष ग्रामसभे’चे आयोजन


लोणी  

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान लोणी बुद्रुक येथे आयोजित ‘विशेष ग्रामसभे’ला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या 'विकसित भारत – जी राम जी' (VB-GRAM G)  विधेयकाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभी, अर्थात गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामविकासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर केंद्र सरकारने नुकत्याच संपन्न झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विकसित भारत जी राम जी विधेयक मंजूर केले आहे.केंद्र सरकारने नव्या स्वरूपात आणलेल्या योजनेची माहीती ग्रामीण भागात होण्याच्या दृष्टीने ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.सहकार चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या लोणी बुद्रुक गावातील विशेष ग्रामसभेत केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहून ग्रामसभेला संबोधित करणार आहेत.लोणी बुद्रुक गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असल्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

'विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन - ग्रामीण' अंतर्गत जुन्या मनरेगाच्या योजनेत बदल करून  १०० दिवसां ऐवजी आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवस रोजगाराची हमी व पेरणी-कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळावेत, यासाठी शासकीय कामात ६० दिवसांच्या 'हंगामी विरामाची' (Seasonal Pause) तरतूद, योजनेतील  पारदर्शकता आशा   महत्त्वपूर्ण विषयांवर या सभेत विचारमंथन होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
या ऐतिहासिक ग्रामसभेच्या नियोजनाचा आढावा  जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला.या ऐतिहासिक ग्रामसभेस उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी मंत्री चौहान संवाद साधून ग्रामीण विकासाच्या संकल्पना अधिक सविस्तरपणे विषद करतील.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष ग्रामसभेचे कामकाज व मान्यवरांचे मार्गदर्शन समाजमाध्यमाद्वारे  थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

लोकसहभागातुन गांव विकासाची चळवळ उभी रहाते- कासार

लोकसहभागातुन गांव विकासाची चळवळ उभी रहाते- कासार 

पानेगांव 
 लोकसहभागातुन गांव विकासाची चळवळ उभी राहते. असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीचे सह्हा. गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार पानेगांव (ता. नेवासे) येथे महादेव मंदिर सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दि.३१ रोजी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 



यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,पानेगांव हे वैभवशाली परंपरा असून तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्य शासनाने आयोजन केले होते.त्यावेळी पानेगांव सहभाग घेऊन एक नंबरचे पारितोषिक पटकाविलेले गांव आहे.हे शक्य झाले गांव एकोपा राजकीय जोडे रुसवे फुगवे बाजुला ठेवून झाले. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पुन्हा पानेगांवचा नंबर आला पाहिजे त्यासाठी अभियानाचे मुख्य सहा घटकाची अमंलबजावणी एकजुटीने केली पाहिजे.विविध शासनाचे दाखले,बचतगट, वृक्षारोपण, आरोग्य, स्वच्छ अभियान, प्लास्टिक बंदी, वनराई बंधारे, उपक्रम राबवून गावचा स्वतःचा विकासाबरोबरच आर्थिक बचत होणार असून नक्कीच समृद्ध गांव बनल्या शिवाय राहणार नाही. यासाठी आर्थिक सहभाग तसेच श्रमदान स्वयंस्फूर्तीने प्रत्येकाने चळवळीत सहभागी होवून शासनाने ५०% कर सवलत दिली असून त्याचा लाभ प्रत्यकाने घेतला पाहिजे असे कासार यांनी म्हटले . गावातील नावलौकिक मिळविलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आरोग्य शिबीर आयोजन करुन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ महिलांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. सोनई १८गांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय पाटील जंगले, शेतकरी प्रोड्युसर संस्थेचे कैलास शिंदे, पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जंगले,माजी उपसरपंच डॉ जयवंत गुडधे मनोगत व्यक्त केले. 

   यावेळी सोनई पोलीस ठाण्याचे सह्हा.फौजदार अंबादास दहिफळे, तालुका कृषी विस्तार अधिकारी रखमाजी लांडे, लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले/आंबेकर उपसरपंच सुरेश जंगले मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, नारायण जंगले भाऊसाहेब जंगले शिवाजी सचिव,प्रा.महेश जंगले, आबासाहेब काकडे, भाऊसाहेब काकडे,राजेंद्र जंगले, रमेश जंगले, भाऊसाहेब बोर्डे, बबनराव जंगले,रखमाजी जंगले, अरुण सोनवणे,तलाठी योगेश सोनार, कृषी सहायक रौंदळ, तालुका बचत गटाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर कांबळे, आरोग्य विभाग प्रज्ञा दराडे,दिवटे अंगणवाडी सेविका मंगल गुडधे,सविता जंगले,गोदाबाई चिंधे, बचतगट गटाच्या गिता जंगले, कल्याणी गायकवाड शिक्षक रमेश काकडे, प्रविण ढेरे, बाबासाहेब शेंडगे, सुनिल चिंधे, सुजित नवगिरे, शुभम जंगले, गणेश गायकवाड 
डॉ अनभुले मेडिकल फाउंडेशन डॉ राजेंद्र भालेराव, प्रसाद कापसे,ज्योती कापसे,सुरज गवळी,सारिका भालेराव 
प्रारंभी लोकनियुक्त सरपंच  यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची माहिती दिली. या अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाचा उल्लेख करत ग्रामपंचायतीने पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी क्यूआर कोड निर्माण केला असून ग्रामपंचायत पेपरलेसकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. 


प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी केले.
सुत्रसंचालन संदिप जंगले यांनी केले 
आभार डॉ जयवंत गुडधे यांनी मानले.

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती माती आणि माणसांच्या जगण्याची साक्ष असते : राजेंद्र फंड

कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती  माती आणि माणसांच्या जगण्याची साक्ष असते : राजेंद्र फंड
    

 कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती काळ, माती आणि माणसांच्या जगण्याची साक्ष असते. कवी सरकार यांचा " पैंजणाचा नाद प्रस्तुत कविता-संग्रह  हा अशाच साक्षीभावातून जन्माला आलेला आहे.असे प्रतिपादन कोल्हापूर येथील 26 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कवी सरकार यांच्या  पैंजणाचा नाद,मनास झोंबतो गारवा,कवी प्रकाश भोंगाळे यांच्या अपूर्वाई व कवयत्री निशा खरात/ शिंदे यांच्या मी भावनेला शब्द दिले या चार कवितासंग्रह व 26 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विशेषांक प्रकाशन प्रसंगी साहित्यिक राजेंद्र फंड यांनी काढले. 
        
      कवी सरकार यांच्या  कविता शहराच्या कोलाहलात घडलेल्या नसून, त्या पहाटेच्या धुक्यात, तांबड्या मातीत रुतलेल्या पावलांत, रानावनात घुमणाऱ्या पैंजणांच्या नादात आणि श्रमाने थकलेल्या देहांच्या श्वासात आकाराला आल्या आहेत.त्यांच्या प्रत्येक कवितासंग्रहातील कवितांचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामीण जीवन. शेत, शिवार, पानंद, नदीकाठ, बांध, वावर, झाडांची सावली, पाखरांचे थवे, सकाळचे किरण आणि सांजवेळचा गारवा या सर्व प्रतिमा त्यांच्या विविध कवितेतून दिसून येतात. त्याचप्रमाणे कवी प्रकाश भोंगाळे यांच्या अपूर्वाई व कवयत्री निशा खरात/ शिंदे यांच्या मी भावनेला शब्द दिले या कवितासंग्रहातील कविताही मनाला भुरळ घालतात. या प्रकाशन समारंभास इतर मान्यवरांमध्ये  संमेलनाचे  अध्यक्ष कवी गोविंद लहाने परभणी, उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिका (चिकोडी कर्नाटक), सौ डॉ रोहिणी दीक्षित ,प्रसिद्ध कांदबरीकर डॉ श्रीकांत पाटील , टीव्ही मालिका व अभिनेत्री .जीवीका सोनार , स्वागताध्यक्ष प्रा अमरनाथ कांबळे व आयोजक कवी सरकार व इतर अनेक साहित्यिक उपस्थित होते.

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

सुभाष विधाते यांची राज्य अध्यक्ष पदावर बढ़ती



राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी श्री. सुभाष विधाते यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना राहाता नगरपरिषदेचे भाजपा गटनेते हाजी मुन्नाभाई शहा, N S NEWS चे संपादक नवनाथ सदाफळ.

सामाजिक कामाचे महत्त्व जाणून आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मा. सुभाष विधाते..

चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी धोरणाविरोधात निवेदन,आंदोलन व उपोषण करुन व्यवस्थेला हादरवणारे सुभाष विधाते हे सर्वसामान्य व गरीब लोकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले..

मानवाधिकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष असताना अनेक गोरगरीब लोकांची कामे करुन देण्याच्या धडाकयामुळे समितीने सुभाष विधाते यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर बढती दिली.. यामुळे समिती कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे..*

गोरखनाथ एकनाथराव आहेर यांचे निधन.


राहाता तालुक्यातील लोणी खु! येथील  गोरखनाथ एकनाथराव आहेर (पाटबंधारे विभाग – सेवानिवृत्त)
(वय ६७ )यांचे  नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी. दोन मुले.एक बहिण.बंधु.पुतणे.सुना.भावजाई.असा मोठा परिवार आहे.रविंद्र आहेर यांचे बंधू  प्रविण व सचिन आहेर यांचे ते वडील होत.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यात विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श माॅडेल ठरेल

लोणी 
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने विकसित केलेला अत्याधुनिक  घनकचरा प्रकल्प राज्यात  विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श माॅडेल ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
गोगलगाव येथे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने कार्यान्वित केलेल्या  घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तहसिलदार अमोल मोरे गटविकास अधिकारी विवेक गुंड चेअरमन नंदूशेठ राठी व्हा चेअरमन सोपान शिरसाठ प्रवरा बँकेचे व्हा चेअरमन मच्छीद्र थेटे सरपंच कल्पना मैड दतात्रय राजभोज भाऊसाहेब खाडे अनिल विखे  यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेला अत्याधुनिक स्वरुपात निर्माण झालेला घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर उभारलेला पहीला प्रकल्प आहे.
ग्रामीण भागात केलेला पहीला यशस्वी प्रकल्प असून विकसित होत असलेल्या गावांसाठी एक आदर्श माॅडेल असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला.

ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रकल्प पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,,शहर आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या जशी वाढत आहे तशी कचर्याची समस्या आव्हान म्हणून उभी राहाणार आहे.परंतू आशा नव्या तंत्रज्ञानाची जोड देवून प्रकल्प साकार झाला असला तरी त्याला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न होतील.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने नेहमीच शासनाच्या सर्व धोरणांची योजनांची यशस्वी अंमलबजावणी माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारने केल्यामुळेच राज्य आति देश पातळीवरच्या पुरस्काराने या ग्रामपंचायतीचा सन्मान झाल्याची सर्वासाठी अभिमानाची असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

लोणी बुद्रुक गावात विकसित झालेले मटण मार्केट सर्व सुविधांनी परीपूर्ण झाले असून दोन एसटीपी प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाच्या उभारणीचा सविस्तर आढावा घेवून या प्रकल्पाचा कोणत्याही गावाला त्रास होणार नाही.नागरीकांकडे साठणारा कचरा उचलून प्रक्रीया केंद्रावर आणण्यापर्यत सर्वाना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.कचर्या पासून तयार होणारे खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी भावाने उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

त्रिशा फाउंडेशन तर्फे गणेशनगर केंद्र शाळेला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट

त्रिशा फाउंडेशन तर्फे गणेशनगर केंद्र शाळेला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट


जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणेशनगर तालुका राहता या शाळेत नेहमी उच्चांकी लोकसहभाग मिळत असतो, त्याप्रमाणे काल ठाणे येथील त्रिशा फाउंडेशन यांच्यातर्फे शाळेतील इयत्ता पहिली, दुसरीच्या मुलांना 50 स्कूल बॅग तसेच इयत्ता सातवीच्या मुलांना रायटिंग पॅड आणि उच्च प्राथमिक मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले, त्यावेळी त्रिशा फाउंडेशनचे सर्वेसर्वा जयेश बेहेडे, मिलन बेहेडे, आणि त्रिशा बेहेडे उपस्थित होते. आतापर्यंत त्रिशा फाउंडेशनने शिर्डीचे साईबाबा यांच्या श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेऊन परिसरातील अनेक शाळांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहेत. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रम देखील घेऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे.

 खेड्यातील असंख्य गोरगरीब मुलांना प्रत्यक्ष भेटून मदत करणे यात आम्हाला खरी साई सेवा दिसते ,असे कार्यक्रमाच्या वेळी जयेश बेहेडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती श्री कैलास चिंधे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी तर आभार रोशन धनवटे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुनीता गागरे ,मनीषा निर्मळ ,सोनल भावसार, व्हेरोणिका गायकवाड, सुनील गायकवाड यांनी प्रयत्न केले.
 शाळेतील या उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी राजेश पावसे, विस्तार अधिकारी विष्णू कांबळे व भाऊसाहेब घोरपडे आणि केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य तसेच गणेशनगर येथील सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

कोकमठाण येथे ६९ वी शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरू; देशभरातून २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग



कोकमठाण येथे ६९ वी शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरू; देशभरातून २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग


कोकमठाण 

खेळभावना, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर घडणारे आजचे खेळाडू हेच उद्याचे देशाचे खरे प्रतिनिधी असतात. क्रीडा क्षेत्रातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय बांधिलकीची घडण होते, असे प्रेरणादायी विचार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

कोकमठाण येथे आयोजित ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोकमठाण (ता.कोपरगाव) येथील आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले. आयोजक संस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मशाल फेरीद्वारे स्पर्धेची अधिकृत व जल्लोषात सुरुवात करण्यात आली.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, खेळातून संघभावना, परस्पर सन्मान, पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजय संयमाने पचवण्याची शिकवण मिळते. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अभिमानाची बाब असून, या संधीचे सोने करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या ६९ व्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत देशातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ५६० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे. विविध राज्यांतून आलेल्या संघांनी मान्यवरांना आपल्या राज्यांची ओळख करून दिल्याने या स्पर्धेत केवळ क्रीडात्मक नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक विविधतेचेही प्रभावी दर्शन घडत आहे.

पुढे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले साईबाबांच्या पावन भूमीत आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करताना, अशा राष्ट्रीय स्पर्धांमधून देशाला भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास  व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

या उद्घाटन सोहळ्यास एसीपी पंकज शिरसाठ (अर्जुन पुरस्कार विजेते), शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संत अजिंक्य परमानंद महाराज, नंदकुमार जोशी, बाळासाहेब गोरडे, विठ्ठलराव होन यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण


शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्‍ताने दि. ३० डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ अखेर ०३ दिवस विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. श्री. गाडीलकर म्‍हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. संस्‍थानकडे शिर्डी महोत्‍सवाकरीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ५३ पालख्‍यांनी नोंदणी केलीली आहे. या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी ४६ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. साईभक्‍तांकरीता सुमारे १२० क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकीटे व सुमारे ४०० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात येणार असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी नविन दर्शन रांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिरा शेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, गेट नंबर ०४ चे आतील बाजू, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी, दुध व मिनीरल वॉटर सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम भक्‍तनिवास, साईआश्रम धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५००रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शन रांग इमारत, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांग येथे अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याकालावधीत भक्‍तांच्‍या आरोग्‍य सुविधेसाठी विविध ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असुन तातडीचे सेवेसाठी रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच सुरक्षेकामी पोलिस निरिक्षक,  पोलिस उपनिरिक्षक, पोलिस कर्मचारी, एक शिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त  पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक,  पुरुष पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात येवून याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे पोलिस निरिक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकुण १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे.
बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍यामुळे या दिवशी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजीची पहाटे ०५.१५ वाजताची काकड आरती होणार नाही. नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांची रुपरेषा पुढिलप्रमाणे दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते ११.३० यावेळेत श्री. प्रविण महामुनी, शिर्डी यांचा एक शाम साई के नाम हा कार्यक्रम,  दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत भजन सम्राट, श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईंची भजने हा कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्री. लक्ष चावला, हरियाणा यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत साई सुमिरण वाद्य वृंद, बोरिवली (पुर्व) यांचा साई सुमिरन हा कार्यक्रम, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत श्री दासगणु महाराज जयंती निमित्‍त सामुहिक स्‍तवन मंजरी वाचन, दुपारी ०१.०० ते ०३.०० वा.सारेगमप ऑर्केस्‍ट्रा, संगमनेर यांचा साईभजन संध्‍या, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. साई स्‍वरांजली म्‍युझिकल ग्रुप, नागपुर यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम, सायं. ०७.०० ते ०९.०० यावेळेत ह.भ.प. सोनाली दिदी करपे, नांदेड यांचा किर्तन सेवा कार्यक्रम,  रात्रौ. १०.३० ते १२.०० यावेळेत जगदिश पाटील, ठाणे (वेस्‍ट) यांचा साई पालखीची भजने, तसेच दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० वा. श्री मिनू सचदेवा, साई आशिर्वाद ग्रुप, लखनऊ  यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. आर. डी. म्‍युझीक अकॅडमी, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. शुभम कुमार गुप्‍ता, मिर्झापुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम व सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री पारस जैन, शिर्डी यांचा साईंची भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार असल्‍याचे सांगुन शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या साईभजन संध्‍या कार्यक्रमांचा जास्‍तीत-जास्‍त साईभक्‍त व श्रोत्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन श्री गाडीलकर यांनी केले.

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

साईबाबा संस्थानला M11 इलेक्ट्रिक बग्गी देणगी स्वरूपात प्राप्त

 साईबाबा संस्थानला M11 इलेक्ट्रिक बग्गी देणगी स्वरूपात प्राप्त



बेंगळुरू येथील साईभक्त श्री. व्यंकट सुब्रमण्यम व्यंकटकृष्णन यांच्या देणगीतून अपंग व वृद्ध साईभक्तांच्या सोयीसाठी मैनी कंपनीची M11 इलेक्ट्रिक बग्गी श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे.

या नवीन वाहनाची देणगीदार साईभक्तांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आल्यानंतर त्यांनी सदर इलेक्ट्रिक बग्गीची चावी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले व श्री. अतुल वाघ आदी उपस्थित होते.
ही पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडी अपंग व वृद्ध साईभक्तांच्या सुविधेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून रेल्‍वे मार्गाच्‍या निर्माण झालेल्‍या प्रश्‍नावर सविस्‍तर चर्चा केली.


       पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे प्रकल्‍प जुन्‍या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्‍वित करावा ही लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्‍य  सरकारच्‍या माध्‍यमातून केंद्रीय रेल्‍वे  मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्‍यात अशी विनंती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. २०१९ साली संगमनेर अकोले मार्गे तयार करण्‍यात आलेल्‍या प्रकल्‍प अहवालावरच कार्यवाही करण्‍याचा आग्रही त्‍यांनी केला आहे.

       पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून रेल्‍वे मार्गाच्‍या निर्माण झालेल्‍या प्रश्‍नावर सविस्‍तर चर्चा केली. याबाबतची वस्‍तुस्थितीही त्‍यांनी पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली आहे.

       केंद्रीय रेल्‍वे विभागाने पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वेचा प्रस्‍ताव २०१९ साली नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्‍नर असा तयार केलेला आहे. याबाबत जमीनींचे अधिग्रहनही करण्‍यात आले होते. मात्र या प्रस्‍तावात बदल करुन, हा मार्ग आता अकोले तालुक्‍याला वगळून नारायणगाव, संगमनेर, नाशिक अशा पध्‍दतीने प्रस्‍तावित करण्‍याची बाब समोर आल्‍यामुळे नागरीकांच्‍या भावना तिव्र झाल्‍या आहेत. प्रकल्‍पामध्‍ये  बदल करताना कोणत्‍याही प्रकारे लोकप्रनिधींना विश्‍वासात घेण्‍यात आलेले नाही याकडेही मंत्री विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

       सद्य परिस्थितीत रेल्‍वे मार्गाच्‍या प्रकल्‍प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्‍येही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासकीय स्‍तरावर रेल्‍वे प्रकल्‍पाबाबतची कोणती कार्यवाही सुरु आहे याबाबतही माहीती उपलब्‍ध होत नाही. तसेच पुण्‍याहून नाशिककडे जाणा-या रेल्‍वे   मार्गात नारायणगाव येथील जेएमआरटी या रेडीओ टेलिस्‍कोप सेंटरची अडचण असल्‍याचे कारणही केंद्रीय रेल्‍वे मंत्र्यांनी लोकसभेमध्‍ये आपल्‍या निवेदनातून सांगितले आहे. ही सर्व वस्‍तुस्थिती लक्षात घेवून रेल्‍वे  मार्गाच्‍या प्रकल्‍पाबाबत वस्‍तुस्थिती समोर यावी यासाठी आपण सर्व लोकप्र‍तिनिधींची बैठक बोलवावी आणि प्रकल्‍पाच्‍या मार्गाबाबत असलेलया भावना समजून घ्‍याव्‍यात. २०१९ मध्‍ये तयार केलेल्‍या प्रकल्‍प  अहवालाची अंमलबजावणी होण्‍यासाठी राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून लोकप्रनिधी आणि जनतेच्‍या भावना केंद्रीय रेल्‍वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्‍यात अशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांशी चर्चे दरम्‍यान केली आहे.

*कोट –*
       राज्‍यात नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या नगरपालिका निवडणूकांमध्‍ये  भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्‍या यशाबद्दल मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी भेटी दरम्‍यान  अभिनंदन केले.

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

भंडारदरा धरणावर 'शताब्दी वर्षात' जागतिक पर्यटन स्थळे विकसित करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भंडारदरा धरणावर 'शताब्दी वर्षात' जागतिक पर्यटन स्थळे विकसित करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखड्याचा घेतला आढावा

अकोले  

 उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, या निमित्ताने हे धरण शाश्वत व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले पाहिजे. यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन वास्तूंचे जतन, वॉटर टुरिझम आणि स्थानिकांना रोजगार देणारा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पर्यटन विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी निळवंडे धरण विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी सभापती मारुती मेंगाळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व सोनल शहाणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, २०२६ पासून धरणाचे १०० वे वर्ष सुरू होत आहे. त्यादृष्टीने 'डॅम रिहॅबिलिटेशन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट' (DRIP) अंतर्गत निधी व राज्य शासनाचा विशेष निधी वापरून कामे केली जातील. या महोत्सवाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग, वन विभाग व एमटीडीसी यांनी समन्वय साधून १५ दिवसांत अंतिम 'मास्टर प्लॅन' तयार करावा, जेणेकरून त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करता येईल.
काय आहेत

 प्रमुख आकर्षणे व योजना:
लेझर शो आणि डॉक्युमेंटरी : पर्यटकांच्या आकर्षणासाठी धरणाच्या भिंतीवर इतिहासाचा उलगडा करणारा भव्य 'लेझर शो' व डिजिटल डॉक्युमेंटरी दाखवली जाईल. तसेच, हा शो पाहण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचे ॲम्फीथिएटर विकसित केले जाईल.

वॉटर टुरिझम आणि अम्ब्रेला फॉल : पाण्याचा पुनर्वापर करून सुट्टीच्या दिवशी 'अम्ब्रेला फॉल' सुरू ठेवण्याचे नियोजन करावे. तसेच, अधिकृत 'बोटिंग क्लब' स्थापन करून लाईफ जॅकेट वापरणे सक्तीचे करावे आणि रेस्क्यू बोटची उपलब्धता अनिवार्य करावी.

🔹चित्रपट आठवणी व निसर्ग : या परिसरात चित्रीकरण झालेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी जागवण्यासाठी विशेष म्युझियम, जुन्या नकाशांचे प्रदर्शन आणि शताब्दी स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.

स्थानिकांना रोजगार जलसंपदा विभागाने धरण परिसरातील अतिक्रमण हटवून सुमारे १७ ते १८ हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. या जागेवर पर्यटनाचे प्रकल्प उभारले जातील. प्रदूषण टाळण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्सची सुविधा सुरू केल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तसेच, आदिवासी भागातील उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ, गाईड व्यवसाय आणि रिसॉर्ट्सच्या माध्यमातून स्थानिकांना संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचे श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड आणि रतनगड या परिसरातील ट्रेकिंग पॉईंट्सवरही पर्यटकांना सुविधा पुरवण्याबाबत विचार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या


रविवार, २१ डिसेंबर, २०२५

पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात महायुती मजबूत!

पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात महायुती मजबूत!




 नगरपालिका निवडणूकीत अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या  नेतृत्‍वाखाली जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रचाराच्‍या निमित्‍ताने महायुती मजबूत ठेवून मिळविलेले यश लक्षवेधी ठरले आहे. यामध्‍ये ९ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला  मिळालेले यश महत्‍वपूर्ण मानले जात आहे.

       भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना पालिका निवडणूकीचे प्रभारी म्‍हणून जबाबदारी सोपविण्‍यात आली होती. निवडणूकीच्‍या सुरुवाती पासूनच मंत्री विखे पाटील यांनी महायुतीमध्‍ये योग्‍य समन्वय राखून प्रचाराचे नियोजन केले. शिर्डी, राहाता या दोन्‍हीही नगर परिषदांच्‍या बरोबरीने पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी पाथर्डी, देवळाली प्रवरा, कोपरगाव, या ठिकाणी प्रचाराच्‍या निमित्‍ताने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत जाहीर सभा घेतल्‍या. ठिकठिकाणी कार्यकर्त्‍यां समवेत त्‍यांनी पदयात्रेत सहभाग आणि प्रभागांमध्‍ये कॉर्नर बैठका घेवून नागरीकांशी संवाद साधला. डॉक्‍टर, वकील, व्‍यापारी अशा सर्वच घटकांना त्‍यांनी प्रचाराच्‍या माध्‍यमातून महायुतीशी जोडून घेतले.

महायुती सरकारच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यामध्‍ये विकासाची प्रक्रीया वेगाने सुरु आहे. जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेला केंद्र आणि राज्‍य सरकारचे सहकार्य मिळत आहे. जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाला मिळत असलेली गती या मुद्यांवर मंत्री विखे पाटील यांनी प्रचारामध्‍ये भर दिला. विरोधी उमेदवारांवर टिका न करता अतिशय संयमाने आणि विकासाचा अजेंडा घेवून मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्‍या प्रचाराचे योग्‍य नियोजन कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून केले. याचे फलित म्‍हणून जिल्‍ह्यात सात ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्‍यक्ष निवडून आणण्‍यात यश आले असून, नेवासे येथे महायुती मधील घटक पक्ष असलेल्‍या एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेचे नगराध्‍यक्ष निवडून आणण्‍यात यश आले आहे.

बहुचर्चित अशा कोपरगाव मध्‍येही भाजपाचे नगराध्‍यक्ष निवडून आल्‍याने त्‍या विजयाची चर्चाही विखे पाटील यांच्‍या भवतीच केंद्रीत झाली आहे. संगमनेरात महायुतीचा पराभव झाला असला तरी, अतिशय सामान्‍य उमेदवाराच्‍या प्रचाराला विखे पाटील यांनी उपस्थिती दाखवून कार्यकर्त्‍यांना पाठबळ दिले.  श्रीरामपूर मध्ये भाजपाचे नगरसेवक निवडणून आणण्यात यश मिळवले.

विधानसभा निवडणुकीत एक वर्षापुर्वी जिल्ह्यातील जनतेन असाच महायुतीच्या बाजूने कौल दिला होता.त्याचीच परीणीती नगरपालिका निवडणुकीच्या निकालात मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पुन्हा दिसून आली.

मागील एक वर्षाच्या वाटचालीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या विकास प्रक्रीयेला महायुती सरकारच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी गती दिली आहे.गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सिंचन प्रकल्पांचे प्रश्न मार्गी लागत आहेत.औद्यगिक विकासातून रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

भाजपाचे संघटन मजबूत करतानाच महायुती मधील घटक पक्ष कुठे दुखावणार नाहीत याची काळजी पालकमंत्री विखे पाटील प्रामुख्याने घेत असल्याने नगरपालिका निवडणुकीत महायुती भक्कमपणे उभी असल्याचे दिसून आले.आगामी अहील्यानगर  महापालिकेची निवडणुक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची वाटचाल आशीच राहाण्यासाठी प्रयत्न पालकमंत्री विखे पाटील यांनी सुरू केले आहेत.

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

साईबाबा हॉस्पिटलसाठी १ कोटी ०४ लाख रुपयांचे अत्याधुनिक 2D ECHO EPIQ CVX अल्ट्रासाऊंड मशिन देणगी स्वरूपात प्राप्त

श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी १ कोटी ०४ लाख रुपयांचे अत्याधुनिक 2D ECHO EPIQ CVX अल्ट्रासाऊंड मशिन देणगी स्वरूपात प्राप्त


“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या श्री साईबाबांच्या शिकवणीनुसार कार्यरत असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये भाविकांच्या सेवाभावातून वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते. मुंबई येथील साईभक्त डॉ. श्रीराम अय्यर यांनी त्यांच्या प्रिज्मा ग्लोबल लिमिटेड, मुंबई या कंपनीमार्फत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी १ कोटी ०४ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक 2D ECHO EPIQ CVX अल्ट्रासाऊंड मशिन देणगी स्वरूपात प्रदान केले आहे

. या मशिनमुळे हृदयविकाराशी संबंधित तपासण्या अधिक अचूक, जलद व परिणामकारकपणे करता येणार असून रुग्णसेवेत मोठी मदत होणार आहे. सदर मशिनचे लोकार्पण व पूजन समारंभ आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी देणगीदार साईभक्तांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या प्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल (नि.) डॉ. शैलेश ओक, प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप देवरे, डॉ. निलेश जाधव, बायोमेडिकल इंजिनिअर श्रद्धा कोते, जनसंपर्क अधिकारी श्री. सुरेश टोलमारे, परिचारिका, परिसेविका तसेच मयूर दाभाडे, प्रभाकर डांगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

लोणी खुर्द येथे ११६ दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोणी खुर्द येथे ११६ दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


ग्रामपंचायत लोणी खुर्दचा संवेदनशील व लोकहितकारी उपक्रम

ग्रामपंचायत लोणी खुर्द यांच्या वतीने लोणी खुर्द येथील ११६ दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या ५ टक्के दिव्यांग निधी अंतर्गत जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधान वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमास सरपंच श्री.जनार्दन घोगरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रभावती जनार्दन घोगरे, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौ.प्रभावती घोगरे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या,दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांचा सन्मान, सुरक्षितता व सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामपंचायत लोणी खुर्द ही केवळ प्रशासन करणारी संस्था नसून माणुसकी जपणारी व्यवस्था आहे. दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार व दैनंदिन गरजांसाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.

सरपंच श्री. जनार्दन घोगरे यांनी सांगितले की,ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५ टक्के निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा खर्च करण्यात येतो. आजवर करण्यात आलेल्या खर्चामधील ही सर्वाधिक रक्कम असून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उत्पन्न वाढीसोबतच लोककल्याणासाठी अधिकाधिक निधी खर्च करण्याचा आमचा संकल्प आहे.
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत लोणी खुर्द कटिबद्ध असून, भविष्यातही अशाच लोकहितकारी योजना व उपक्रम राबवले जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लोणी खुर्द ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक बांधिलकी जपत व सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करत असल्याचे यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन!

पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन!


अहील्यानगर, शिर्डी पाठोपाठ संगमनेरला प्राधान्य


लोणी 

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याचे काम पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून गतीने सुरू झाले आहे. अहील्यानगर, शिर्डी पाठोपाठ संगमनेर येथेही औद्यगिक वसाहत निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या प्रशासनाच्या हालचाली औद्यगिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन प्रकल्पाचे  प्रश्न मार्गी लावतानाच  जिल्ह्यातील युवकांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले.महसूल मंत्री पदाच्या कार्यकाळात शिर्डी येथे शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहती करीता उपलब्ध करून औद्यगिक वसाहती मध्ये अनेक मोठे उद्योग येवू लागले विशेष म्हणजे देशाच्या संरक्षण व्यवस्थेत आवश्यकता असलेली साधन सामुग्रीची उत्पादकता शिर्डी येथील औद्योगिक वसाहती मध्ये होणार असून भविष्यात अहील्यानगर जिल्हा डिफेन्स क्लस्टर म्हणून ओळखला जाईल असे नियोजन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यामातून करण्यात येत आहे.

संगमनेर तालुक्यात औद्यगिक वसाहत व्हावी आशी मागणी सातत्याने होत होती.आ.अमोल खताळ यांच्या यासाठी पाठपुरावा सुरू होता.पालकमंत्री या नात्याने संगमनेरच्या औद्यगिक वसाहती करीता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठका घेवून संगमनेरच्या औद्यगिक वसाहतीला मूर्त स्वरूप देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचा राहीलेला पुढाकार सुध्दा महत्वपूर्ण ठरणार आहे.

अहील्यानगर किंवा सुपा येथील औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेतला.उद्योजकांमध्ये असलेले भीतीचे दहशतीचे वातावरण कमी करण्यात  यामुळे यश आले आहे.

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिकचे पाठबळ मिळावे म्हणून यापुर्वीच शिर्डी येथील विमानतळाचा विकास आणि विस्तार करण्यात येत आहे.विमानतळाच्या टर्मिनल इमारती करीता निधी मंजूर झाला असून,शेजारून जाणारा समृध्दी महामार्ग सुध्दा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरणार असल्याचे दिसून येते.

औद्यगिक क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शिर्डी येथे टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने कौशल्यवर्धिनी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात ही औद्यगिक वसाहती करीता जमेची बाजू ठरली आहे.सदर केंद्रातून उपयुक्त असे प्रशिक्षण मिळणार असल्याने स्थानिक युवकांना त्याचा निश्चितच फायदा होईल.

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची निवड

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची निवड


लोणी 
 स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने तालुका राहता येथे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या निवडीत तालुका कार्याध्यक्ष पदी श्री संपत डी. निर्मळ (आबा) यांची, तर उपाध्यक्ष पदी श्री ज्ञानेश्वर साबळे व कार्यकारणी सदस्य पदी श्रीपाद बोकंद  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

श्री संपत निर्मळ (आबा) आणि श्री ज्ञानेश्वर साबळे श्रीपाद बोकंद  यांना समाजकार्याची आवड, सामाजिक प्रश्नांबाबतची जाणीव व सामान्य जनतेसाठी काहीतरी करण्याची तळमळ यासाठी परिचित आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडीबद्दल तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून पोलीस, पत्रकार आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत सामाजिक हिताची कामे अधिक प्रभावीपणे होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीही संघटनेच्या उद्दिष्टांनुसार प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

मध्यप्रदेश राज्यातील हरदासपुर येथिल साईंभक्त तेज़ बहादुर सिंह यांनी साई बाबा चरणी 200 ग्राम वज़नाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला


देश-विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून, भक्त मोठ्या भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण करत असतात.
आज दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मध्य प्रदेश राज्यातील हरदासपूर येथील साईभक्त श्री. तेज बहादुर सिंह यांनी श्री साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा आकर्षक व सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. या  कलात्मक सुवर्ण मुकुटाची किंमत अंदाजे रु. २० लाख १६ हजार इतकी आहे.

सदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून तो श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्त श्री. तेज बहादुर सिंह यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...