अस्तगाव ग्रामपंचायत व गायकवाड शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने योग व मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शासकीय योजनांची माहिती
शिर्डी प्रतिनिधी :
गायकवाड शैक्षणिक संकुल अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कला गुणांना जोपासत आहे. सायबर सुरक्षा, चित्रकला, संगणक अशा विविध क्षेत्रात विद्यार्थी घडवीत आहे. अस्तगाव येथील गायकवाड संकुलाच्या वतीने व अस्तगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक व नागरिक यांना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळावा व सारथी महामंडळ व इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गाव पातळीवर दर्जेदार कोर्स करता यावेत व त्यातून मुलांना नोकरीची संधी मिळावी यासाठी उपक्रम राबविले जात आहेत. शासकीय योजना लोकांना माहिती व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायत अस्तगाव व गावातील जागरूक ज्येष्ठ प्रतिनिधी, समाजसेवक यांनी या कार्यात पुढाकार घेतल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अभ्यासाबरोबरच योग व मैदानी खेळ यांचे जीवनातील महत्व सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासह सर्वांना परिचित व्हावे यासाठी आज अस्तगाव येथील मारोती मंदिरात बाल विद्यार्थ्यांचे विशेष हनुमान चालीसा गीतावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याचसोबत मुलांना मैदानी खेळ व त्याचे महत्व लक्षात यावे यासाठी शिवकालीन कलेचा वारसा जपणारे व नुकतेच अयोध्या नगरीत महाराष्ट्राचे नावलौकिक गाजविणारे विद्यार्थी यांचे अंगावर शहारे आणणारे लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार व इतर साहित्यांसोबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
योग व मर्दानी खेळ यांच्या माध्यमातून अस्तगाव विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, कोणत्याही वयातील व्यक्तींनी योग केला पाहिजे व निरोगी आयुष्य जगले पाहिजे असे विचार घेऊन या कार्यक्रमासाठी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री नंदकुमार गव्हाणे पा., राहाता बाजार समितीचे संचालक श्री संतोष लक्ष्मणराव गोर्डे पा., तंटामुक्ती गाव समिती अस्तगावचे अध्यक्ष श्री अनिलराव नळे पा., ग्रामपंचायत अस्तगावचे सरपंच श्री संजयराव चोळके पा., श्री बाबुराव लोंढे, ह.भ.प. भाऊसाहेब तांबे महाराज, भाऊसाहेब कारभारी नळे पा., देवराम जेजुरकर, साईनाथ गाडेकर, सुनील कांदळकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्यदेव गायकवाड सर, गायकवाड क्लासेसच्या संचालिका सौ. सुषमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वृंद व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. योग कला प्रात्यक्षिकासाठी श्रीमती रेखा जेजुरकर, डिंपल मोरे, आरती त्रीभान या शिक्षिकांनी नियोजन केले. मर्दानी खेळांसाठी प्रशिक्षक विजय मोगले सर यांनी विशेष सहकार्य दिले, प्रशिक्षक भावना निमसे यांनी मार्गदर्शन केले तर श्रावणी निमसे, कृष्णा निमसे, प्राची निमसे, सुजय वाघमारे, आयुष निमसे या विद्यार्थ्यांनी आकर्षक कला सादरीकरण केले.
अस्तगाव मध्ये झालेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा