शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

भटकंती कास पठारची

भटकंती कास पठारची


राहता
बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य असलेले व २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश असलेले कास पठार हे एक पर्यटन स्थळ पाहण्याचा योग दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी आला. ऑनलाईन प्रत्येकी 150 रुपयाचे तिकीट रविवारी  सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतचां कास पठार भ्रमंतीचा आमचा स्लॉट असल्याने भल्या पहाटे आमची फॅमिली पुणे येथील आमच्या लोहगांव  येथील घरून  मार्गस्थ झालो.  वाटेत खंबाटकी घाटातच धुके आणि ढगाच्या गराड्यातच आणि पावसाच्या बारीक सरी  अंधारातच आमच्या स्वागताला हजर होत्या. साताऱ्यात सूर्यदेवाने आम्हाला मुखदर्शन दिले. साताऱ्यातून घाट रस्त्यात नाश्ता करून आम्ही जमिनीपासून 1200 मिटर उंचीवरील कास पठार पार्किंगमध्ये गाडी लावून वनविभागाने पर्यटकांसाठीच्या  गाडीमध्ये पावसातच बसलो. गार वारा, थंडीची चाहूल, पावसाची रिमझिम आणि निसर्गातील रंगीबेरंगी फुले पाहण्याचा मोह आम्हाला पुढे जाण्यास खुणावत होता. पाच मिनिटातच आम्ही चार नंबर पॉइंटला आलो. आमचा नातू अदविक खाली उतरताच जाकीट घालूनही पावसात कुडकुडत होता. परंतु त्याचा उत्साह आमच्यासारखाच ही सृष्टी नजरेत सामावण्यासाठी  आतुर झाली होती. येथे आकाशातील ढग आम्हाला स्पर्शून आणि आम्ही ढगात लपेटून पुढे चालत होतो. लाल दगडाची चिऱ्याची पायवाट आम्हाला  रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत घेवून जात होती. प्रत्येक 15-20 फुटावर  ओळीत गार्ड पर्यटकांना लांबून फोटो काढा फुलझाडे तुडवू नका म्हणून सूचना करत होते. परंतु या मोहक विविध रंगी रानफुलातील  जवळीक पर्यटकांना आकर्षित करत सूचनेकडे दुर्लक्ष करीत फोटोसेशन करत होती.  काही ठिकाणी गर्द फुलांच्या ताटव्यात मुद्दामहुन मोकळी जागा ठेवून तिथे फोटो पॉइंट बनविले होते. चार तासात आम्हाला 10 चौरस मैलाचे कास पठार पादाक्रांत करायचे होते. परंतु वाटेतील गार्ड  यांनी सांगितलेली मोठी सोनकी,वायतुरा, पांढरा सापकांदा,सोमाडा,कंदील पुष्प/कंदील खर्चुडी, मुसळी ,आभाळी, भारंगी, डुक्कर कंद, दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा,टूथब्रश ऑर्किड,छावर,उंद्री, अंजनी,कुमुदिनी, काळी निसुर्डी,पिंड,पानेर,छोटीसोनकीसोनकी,कवळा,कोंडल,सीतेची आसवें,हालुंडा,काटे रिंगणी हे विविधरंगी फुले आम्हाला रस्ता काटूच देत नव्हती.  पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.  त्याचबरोबर येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची प्रामुख्याने  २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती येथे  आढळतात.  तसेच येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. असे गार्ड आम्हाला माहिती पुरवीत होते. हे चालू असतांना आमचे लेक जावई एकीकडे, तर इकडे आमची जोडी  मोठा मुलगा आमचे  दोन्ही जोड्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होता. तर नातू कधी आमच्यात तर कधी त्याच्या पप्पा मम्मीसोबत फोटो काढण्यात दंग होता. वातावरण कधी धुक्याचे, कधी ढग स्पर्शून जाणारे, क्षणात पावसाची बुरबूर तर लगेच उन असे बहुरंगी होते. त्यामुळे फोटोसेशनही अगदी बहुरंगी झाले. दोन तासात फक्त चार नंबर पॉइंट पाहून झाला.  त्यानंतर एक नंबर पॉईंटच्या गेटवर वाफाळलेला चहा पिवून आम्ही दोन्ही बाजूने कुंपण घातलेल्या  रस्त्यातून  फुलांचे दृश्य पाहू लागलो. इथे अथांग रंगीबेरंगी फुलांनी कास पठार बहरून गेले होते. इथे एखादा अरसिक ही या फुलांच्या प्रेमात सहजच पडेल असे दृश्य होते. पुढे तलावाच्या काठावर सुरक्षेची तटबंदी हटल्याने येथे फोटोसेशन सुरू झाले. स्थानिक गावकरी महिला ठिकठिकाणी नाचणीची भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, पिठले घेवून पर्यटकांना हा पठारी मेन्यू खाण्यासाठी आग्रह करत होती. प्रत्येकाला हा पठारी आहार खाण्याचे आकर्षण झाले. चार तास फिरल्यावर पोटात कावळे कोकावणारच ना. आम्ही सर्वांनी या मेव्यावर मस्त ताव मारला. खाता खाता आम्हाला दिसले की काही फुले मुरझायला लागली. गार्डला  विचारले तर त्याने सांगितले की काही फुले सकाळी 6 वाजता उमलतात आणि दुपारी 12 वाजता परत मिटतात. त्यामुळे आम्हाला सकाळी 7 ते 11 ची वेळ फायदेशीर वाटली.  या पठारावर सगळीकडे खडक असल्याने  पावसाने चिखल फारसा दिसला नाही. परंतु आता खडक ही काही ठिकाणी निसरडे झाले आहेत. अनेक जण घसरतांना आम्ही पाहिलेत. त्यामुळे निसर्ग सौंदर्य पाहताना प्रत्येक पाऊल जपून टाकण्याच्या सूचना आपोआप मिळत होत्या. एकंदर एका चार तासाच्या भटकंतीत पूर्ण कास पठार पाहून होत नाही तर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा वेळ तरी सर्व पॉइंट पहायला हवाच. 
                 कास पठार जरी हेरिटेज असेल तरी येथून  जवळच 3 किलोमिटर अंतरावर जगातले सर्वात मोठे भाबवली पुष्प पठार आहे. पहावे तिकडे फुलेच फुले. हा पठार पर्यटक यांचे वावरपासून दूर असल्याने निसर्गाची मुक्त रंग उधळण आहे. परंतु हा अतिशय निसरडा , अतिशय थंडगार,आणि जंगली श्वापदांचा वावर असलेला भाग असल्याने इकडे कुणी  जावयास धजत नाही.
                  सातारा परिसरात  अनेक तलाव, अनेक धबधब्यांच्या रांगा,  वासोटा किल्ल्याच्या परिसर, कोयना धरण, नद्यांचे त्रिवेणी संगम, सज्जनगड आणि जावळीचे खोरे,  मोठमोठाले कडे, सुळके, छोटा काश्मीर आणि सर्वात महत्त्वाचे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित आणि निसर्गाचा परिपूर्ण आनंद देणारे कास पठार असा हा सातारा परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना सतत येण्यास खुणवीत असतो. 
                              ला .राजेंद्र फंड, राहाता, 
                                   मो. 9881085671.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...